कोण काय बोलिले, कोण काय प्रवचले, हवे तेवढेची घ्यावे, हुशारीने.

जगात या गलबला, थोर असे केवढा, वदणाऱ्याचे वदन धरावे कैसे आम्ही.

वदणाऱ्याने वदावे, ऐकणाऱ्याने ऐकावे, हवे त्यातील ऐसे, सूत्र आमचे.

देवोत दाखले काय, बोलिले समक्ष आमुचे, नाही आम्हास देणेघेणे, देवेंद्र म्हणे.

असोत कुणी महाराज, वा असोत स्वामी, वा असोत बुवा, कुणी अंतज्र्ञानी.

मंचावरी बोलती, झडझड सूत्रे सांगती, जगावे कैसे उपदेशती, त्यांच्या परी.

कुणी म्हणे आपुले जन, संख्या त्यांची रोड, इतरांचे बळ पहा, चंद्रामाजी वाढे.

आपुली ही भूमी, आपुला हा देश, आपुल्याच ठायी, अल्प आपणच.

ऐसे नाही बरे, कैसे होईल भले, घरटी दोनच पिले, अपुरीच.

सोडा दोनाचा हिशेब, पाडा दहाचा उजेड, घर कैसे बघा मग, लखलखेल.

हा तो त्यांचा हिशेब, हे तो त्यांचे गणित, सूत्र हे त्यांच्या मनीचे, देवेंद्र म्हणे.

दुसरे आचार्य ऐका, काय सांगती कथा, जाणून घ्याव्या त्या खोल, मनोभावे.

मुखी नाम, हाती माळ, ओळख जरी आपली, पुरी नाही पडणार, आता जाणा.

माळओढणी जारी ठेवा, मुखी नाम सदा ठेवा, रिक्त नका ठेवू मात्र, हात दुजा.

एका हाती माला, दुसरे हाती भाला, ऐसे सूत्र आजचे, मनाशी गाठ बांधा.

हाती भाला कशासाठी, काय आम्हा माहिती, ते तो सूत्र त्यांचे, देवेंद्र म्हणे.

मागे एके दिवशी, अशीच आली प्रचीती, धर्मसत्ता-राजसत्ता समोरासमोरी साची.

त्यांचा तो धर्मदंड, आमुचा तो राजदंड, त्यांच्यापुढे आमची, काय गणती.

महाराजांचे नाम, आम्हांसाठी पावन, साधम्र्याचे रहस्य, काय सांगावे तुम्हा.

धर्माने दावावी, राजसत्तेला वाट, बोलिलो होतो आम्ही, तेव्हा ऐसे.

तव काही जन कोपले, आम्हासी ताडीले, लेखणीने त्यांच्या, देवेंद्र म्हणे.

ऐशा वेळी आठवण, येते खाशी फार, आदल्या पंतांची एक, नेमेची.

पंत फार हुशार, तसा त्यांचा कारभार, उठती बसती जैसे, कळसूत्र मागे.

कोणी म्हणती रिमोट, कुणी आणि कंट्रोल, खरे काय मनोहर, तेची जाणे.

एके दिनी ऐसे, कानावरोनी गेले काही, पंतांच्या त्या समयी, मंचावरी.

म्हणणारे थोर थोर, कैसे लावावे बोल, उगा जीवाला घोर, सत्तेच्या.

झाली अडचण भारी, कोंडीत आली स्वारी, काय करावे कळेना, त्या समयी.

सुचला एक उपाय, साधा तरीही थोर, जैसा की कोहिनूर, हिरा जैसा.

कानावरी हात, ठेवियले दोन्ही, म्हणे आमुचे कानी काही, पडले नाही.

हसले जन पोट धरून, सारे घटिकाभर, पंतही सुटले हसत, देवेंद्र स्मरे.

हेची सूत्र उत्तम, कानांवरी ठेवावे हात, सांगावे ऐकले नाही, आम्ही काही.

नको कुठला तंटा, नको आणि बखेडा, कुणास काही मग, उत्तराया नको.

हाचि उचित उपाय, ध्यानी ठेवूया सदा, स्मरूनी सदाकदा, पंतांचिया.