सत्ता संपादनाचे उद्दिष्ट सफल झाले की संवेदनशीलता संपुष्टात येते असे म्हणतात. पण महाराष्ट्रातील फडणवीस सरकारवर मात्र तसा ठपका ठेवता येणार नाही. विरोधी पक्षात असताना देवेंद्रभाऊ  जेवढे संवेदनशील होते, तेवढेच ते आजही आहेत. तत्त्वाशी तडजोड नाही म्हणजे नाही हा बाणा जपणाऱ्या देवेंद्रभाऊंचा बाणेदारपणा एकनाथ खडसेंवरील आरोपांच्या वेळीच दिसून आला होता. पण उगीचच विरोधक आरोप करतात म्हणून तत्त्वाशी तडजोड करणे हे केवळ कातडीबचाऊ  राजकारण झाले. सारे काही रीतीनुसारच पार पडावे, म्हणजे तत्त्वाला मुरड घालावयाची वेळच येऊ  नये, याचे शहाणपण त्यांना खडसे यांच्यावरील कारवाईनंतर सुचले, म्हणूनच सुभाष देसाई वाचले आणि देसाई वाचले म्हणून प्रकाश मेहताही बचावले.. नाही तर काल दोघा मंत्र्यांचा त्रिफळा निश्चित होता. मुख्यमंत्री फडणवीस हा लहान वयातच कसलेला खेळाडू आहे. ते फक्त फलंदाजी करत नाहीत. ते गोलंदाजीही करतात आणि प्रसंगी क्षेत्ररक्षणही करतात. यातील फलंदाजी स्वपक्षासाठी करावयाची असते, तर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातून विरोधकांना नामोहरम करायचे असते. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी फलंदाजी केली आणि अधिवेशन काळात स्वपक्षाचे काही खेळाडू केवळ विपक्षाच्या माऱ्यामुळे मैदानाबाहेर जाणार असा अंदाज येताच ते स्वत: क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले. त्याआधी विरोधी पक्षाच्या फलंदाजांना फिरकी गोलंदाजीही करून झाली. इतकेच नव्हे, तर फुटबॉलच्या सामन्याच्या निमित्ताने चेंडू टोलविण्याच्या आपल्या कौशल्याची चुणूकही त्यांनी दाखवून दिली. एवढे झाल्यानंतरही, सामना सोडून न देता और भी लडेंगे असा पवित्रा विरोधकांनी घेतल्यावर मुख्यमंत्र्यांनी थेट आखाडय़ातच उतरून शड्डू ठोकला. महाराष्ट्राला असा बहुपेडी खेळाडू लाभल्याने, त्याच्या संघातील कोणी गारद होण्याआधीच त्याचे क्षेत्ररक्षण होणार आणि खेळाडू मैदानातच राहणार हे एव्हाना समजून चुकायला हवे. विरोधकांनी ते लक्षातच घेतले नाही, म्हणूनच देसाईंना पाठीशी घालण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कृतीचे वेगवेगळे अर्थ त्यांच्या तंबूतील समालोचकांकडून लावले जाताहेत. मुख्यमंत्र्यांनी देसाईंचा राजीनामा स्वीकारला असता, तर मेहतांचाही राजीनामा स्वीकारावा लागला असता आणि शिवाय शिवसेनेचाही रोष पत्करावा लागला असता, असे तर्कशास्त्र आता विरोधी संघाकडून मांडले जात असले, तरी हरलेल्या संघाची ती पराभवाची मीमांसा म्हणूनच त्याकडे पाहिले पाहिजे. देसाई आणि मेहता यांना पाठीशी घालून मुख्यमंत्र्यांनी केलेली खेळी पुढे सर्वानाच तोंडात बोट घालायला लावेल, अशी सत्ताधारी पक्षाच्या मातृसंस्थेतील कुजबुज आघाडीत चर्चा आहे. देसाई आणि मेहतांना आधीच बाहेर काढण्यापेक्षा, चौकशी व्हावी, ठपका निश्चित करावा आणि मगच बाहेर काढावे, म्हणजे विरोधकही गप्प, मेहतांचाही काटा काढला आणि सेनेचीही मान खाली, असा त्रिफळा उडविण्याचा तर डाव नसेल ना, असे या कुजबुज आघाडीला वाटते. खरे काय ते मुख्यमंत्रीच जाणोत!