22 July 2019

News Flash

भक्तांनो, हे करून पाहा..

काही सार्वजनिक उत्सवमंडपांत या वर्षांपासून जुगार खेळण्यास पोलिसांनी मनाई केल्याचे वृत्त आहे.

चिंचपोकळी येथील चिंतामणी गणपतीचे शनिवारी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. पण काही अतिउत्साही तरूणांमुळे या मिरवणुकीला गालबोट लागल्याचे दिसून आले.

भक्तगणहो, (ही गणेशभक्तांना उद्देशून घातलेली साद आहे..) येत्या संपूर्ण उत्सवकाळाकरिता तुम्हास अगोदरच शुभेच्छा! खरे म्हणजे, केवळ शुभेच्छांच्या जोरावर सणासुदीचा आनंद द्विगुणित व्हावा असे दिवस आजकाल राहिलेले नाहीत. तुम्ही कोणत्या शहरात राहता, त्यावरही या दिवसांच्या ‘आनंदाची घनता’ अवलंबून असते. जर तुम्ही मुंबईसारख्या महानगरात राहत असाल, तर सणांच्या निमित्ताने साजऱ्या होणाऱ्या सार्वजनिक धांगडिधग्यापासून स्वत:चा बचाव करण्याची सावधगिरी तुम्ही बाळगली नाहीत, तर तुमचा सण आनंदात कसा जातो हे पाहणेच औत्सुक्याचे ठरेल. त्यामुळे, पुढील काही दिवस संकटाचे आहेत असे समजून वागलात, तर सणासुदीचा आनंद उपभोगता येईल, अशी सावधगिरीची सूचना भक्तांना (पक्षी- गणेशभक्तांना) अगोदरच देऊन ठेवण्याचे धाडस नाइलाजाने करावे लागत आहे. ही सूचना तीन दिवस अगोदरच का दिली अशी शंकादेखील भक्तांना येऊ नये यासाठीची रंगीत तालीम रविवारीच मुंबईत लालबाग-परळसारख्या गजबजलेल्या बाजारपेठांच्या ठिकाणी पार पडली आहे, हे एव्हाना भक्तांना (पक्षी- गणेशभक्तांना) समजलेच असेल. या परिसरातील एका सार्वजनिक गणेशोत्सवातील विघ्नहर्त्यांच्या आगमनप्रसंगी भक्तिमय वातावरणाने एवढी परिसीमा गाठली, की त्या उन्मादात न्हाऊन निघणाऱ्या भक्तांना परिसरातील सुशोभीकरणाच्या भौतिक अस्तित्वाचे जरादेखील भान राहिलेच नाही. त्यामुळे परिसरातील शोभिवंत झाडांची नासधूस झाली, काही भक्तांनी बसगाडय़ांवर चढून उंचावरून आपल्या भक्तिभावनेला वाट करून दिली, तर काही भक्तांकडून परिसरातील शिल्पांची नासधूस घडली.. गेल्या वर्षीदेखील असेच घडल्याने, या परिसरात सुरक्षा जाळ्या बसविल्या होत्या, पण भक्तीचा महापूरच एवढा अनावर होता, की त्या जाळ्यांनी अखेर त्यापुढे मान टाकली.. तर भक्तहो, ही तर आपल्या सार्वजनिक उत्सवप्रियतेची केवळ सुरुवातीची चुणूक होती. खरा सार्वजनिक सोहळा तर आता तोंडावर येऊन ठेपला आहे. या काळात आपापल्या घराची खिडक्या-दारे मजबूत आहेत ना, भक्तिभाराने जडावलेल्या ध्वनिलहरींचे धडाडते डेसिबल आपल्या घरात घुसू पाहत असतील, तर त्याची तीव्रता रोखण्याची क्षमता दरवाजांमध्ये आहे ना, याची अगोदरच खात्री करून घ्या. ध्वनिसंकटापासून स्वत:चा बचाव करायचा तर अगदीच महत्त्वाचे काम नसल्यास शक्यतो घराबाहेरच पडू नका, आणि घराबाहेर पडणे अपरिहार्यच असेल, तर कर्णसंपुटे शाबूत राहतील अशा आवरणाखाली त्यांना झाकून ठेवण्याची खबरदारी घ्या. येत्या काही दिवसांत भक्तीचा व पर्यायाने भक्तगणांच्या गर्दीचा महापूर सार्वजनिक उत्सवमंडपांच्या दिशेने लोटण्याची चिन्हे असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, असेही सुचवावेसे वाटते. पुण्यामुंबईतील नागरिकांना चारचाकी वाहनांतून प्रवास करण्याची कितीही हौस असली, तरी आपली वाहने वाटेतच कुठे तरी सोडून पायपीट करावी लागेल याची जाणीव ठेवून शक्यतो वाहने रस्त्यावर आणणेच टाळावे. याचा दुसरा फायदा म्हणजे, चालण्याचा व्यायामदेखील होऊ शकेल. अशी आणखीही काही पथ्ये आहेत, पण ती आपापल्या कुवतीनुसार आचरणात आणावी लागतील. काही सार्वजनिक उत्सवमंडपांत या वर्षांपासून जुगार खेळण्यास पोलिसांनी मनाई केल्याचे वृत्त आहे. त्याऐवजी, मूर्तीच्या मंचाखालील तळघरात कॅरम आणि बुद्धिबळाचे डाव मांडावेत असे पोलिसांनी सुचविले आहे. आपली मुलेबाळे मंडपात फार वेळ रमत असतील, तर ते बुद्धिबळ खेळत बसले असतील, असे समजून त्यांना होणाऱ्या उशिराकडे दुर्लक्ष करा.. एवढी काही पथ्ये पाळलीत, तर सणासुदीच्या दिवसांतील शुभेच्छा सार्थकी लागतील, याची खात्री बाळगा..

First Published on September 11, 2018 12:51 am

Web Title: devotee damages ornamental works during chintamani ganesh idol procession