ज्याचा मसुदा आम्हांस लख्ख दिसतो आहे, ते हे पत्र कोणी लिहिले माहीत नाही. बहुधा ते अनौपचारिक असावे आणि दिल्लीतूनच आले असावे. तो मसुदा असा..

सर्व राज्यांचे शिक्षणमंत्री, सचिव, सल्लागार इ.,

भारत ही ज्ञानाची भूमी आहे, विज्ञानाचीही आहे. या भूमीतील संस्कृती, परंपरा वगैरे हेच एक विज्ञान आहे. महाभारत हे काव्य नसून ते वैज्ञानिक शोधांचे एक संकलन आहे. मात्र जगास या मुद्दय़ाची किंमत नाही, त्याचे कारण शोधणे गरजेचे आहे. मुळात ही भूमी संशोधनप्रिय आहे. त्याबाबतचे अनेक दाखले तोंडातील तांबुलाने रस्ता रंगवावा इतक्या लीलया देता येतील. संशोधनाचे मूळ हे प्रयोगात असते. त्यामुळे प्रयोगशीलता वाढवणे शासनाच्या विचाराधीन आहे.

ही भूमी जशी संशोधनप्रिय तशी एका बाणात अनेक पक्षी टिपणारी. (हे महाभारतापासून संशोधन केल्यामुळे मिळालेले यश आहे.) त्यामुळे समाज, विज्ञान, मानसशास्त्र, भाषा, संस्कृती या सर्वाचा संगम असलेल्या शिक्षण विभागातून प्रयोगशीलता जोपासण्यात यावी. शाळांमध्ये प्रयोगशाळा नसल्या तरी शाळांच्याच प्रयोगशाळा करण्यात याव्यात. केंद्रीय स्तरावर परीक्षा बंद करण्याचा प्रयोग बंद करून परीक्षा सुरू करण्याचा यशस्वी प्रयोग आखण्यात आला आहे. (आपण यशस्वी प्रयोग करतो. मात्र प्रयोगांना मिळणारे यश हे आपल्या हाती नसते. त्यामुळे आपल्या प्रयोगांची प्रायोगिक नाटकांच्या दिशेने वाटचाल होत असल्याचा शेरा कुणी मारल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे.)

‘सब का साथ, सब का विकास’ हा नारा स्मरून राज्यांनीही प्रयोगशील होण्यास साथ देणे आवश्यक आहे. काही राज्यांनी तसे प्रयोग सुरू केले आहेत.

चेन्नईमध्ये मुलांना गृहपाठ न देण्यावर प्रयोग सुरू आहे. लोकमान्य टिळकांना दहशतवादी म्हणून त्याबाबतचे सामाजिक पडसाद टिपण्याचा प्रयोग राजस्थानमध्ये पाठय़पुस्तकांतून नुकताच करण्यात आला. गुजरातनेही रामाने सीतेला पळवल्याचा उल्लेख पाठय़पुस्तकातूनच केला, तेव्हा तर प्रयोगाने माणूस कृतिशील होतो हेच सिद्ध झाले. सीतेस नेमके कोणी पळवले हे शोधण्यासाठी विद्यार्थी, शिक्षकांनी हाती मोबाइल धरले. (डिजिटल इंडियाची हीच ती पावले!) गुजरातमध्येच पाठय़पुस्तकातून एड्सबद्दल जागृती करणाऱ्या पाठातही प्रयोग करण्यात आला आहे. परिणामी किशोरवयीन मुले कृतिशील होऊन इंटरनेटच्या साहाय्याने पाठातील शब्दार्थ शोधतील. महाराष्ट्र हे शिक्षणातील आघाडीचे राज्य आहे. मुळात महाराष्ट्राच्या बहुतेक योजना या केंद्र स्तरावर किंवा इतर राज्यांमध्ये लागू करण्यात येतात. त्यानुसार प्रयोगशीलता वाढवण्याच्या योजनेचे उगमस्थानही महाराष्ट्र आहे. नव्या नव्या चाचण्या घेण्याची आवड असलेल्या महाराष्ट्रात सध्या सामाजिक, मानसशास्त्रीय, शिक्षणशास्त्रीय असा एक प्रयोग करण्यात येत आहे. प्रयोग शिक्षकांच्या बदल्यांचाच, पण नवे करण्यासाठी जुने सर्व पूर्णपणे विस्कटणे आवश्यक असते हे तत्त्व त्यामागे दिसते. यातून शिक्षकांनी सध्या विकसित केलेल्या, पटसंख्या वाढवलेल्या शाळांचे नवे शिक्षक आल्यावर काय होते, शाळेला शिक्षक मिळालेच नाहीत किंवा शिक्षकांना शाळाच मिळाल्या नाहीत तर काय होते, अशा शिक्षणशास्त्रीय चाचण्याही आपोआप होतील. त्याचप्रमाणे शिक्षक किती प्रमाणात तणाव झेलू शकतात याची मानसशास्त्रीय चाचणी आणि गाव, पालक यांच्या प्रतिक्रियेची समाजशास्त्रीय चाचणी होईल. स्थानिक भाषा माध्यमातून आंतरराष्ट्रीय शिक्षणसंस्था सुरू करण्याचा प्रयोग सुरू आहे. त्याचप्रमाणे नावात काय आहे, या प्रश्नाच्या उत्तरादाखल महाराष्ट्राने नवा प्रयोगच केला. एससीआरटी या केंद्राच्या योजनेनुसार सुरू असलेल्या संस्थेचे नाव परस्पर बदलून विद्याप्राधिकरण करण्याचा हा प्रयोग होता. त्यानंतर नावात निधी आहे, असा निष्कर्ष निघालेला असल्याचे राज्याने नुकतेच जाहीर केले. सर्व राज्यांनी प्रयोगांची गती वाढवणे आवश्यक आहे. उपरोक्त सूचनेनुसार विकासवाटेवर चालणाऱ्या राज्यांचे बाकीच्या सर्व राज्यांनी अनुकरण करून कार्यवाहीचा औपचारिक अहवाल पाठवावा.