‘राजकारण हे ऋतुचक्रासारखे असते. राजकारणातल्या प्रत्येकाच्या वाटय़ाला कायमची वसंतबहार येतच नाही. थोडे ग्रीष्माचे चटकेही सोसावे लागतात!’ .. मित्रहो, हा सुविचार आम्हाला अचानक सुचलेला नाही. पाच वर्षांपूर्वी, जून २०१३ मध्ये भाजपने लालकृष्ण अडवाणी यांची रवानगी सल्लागार मंडळात केली, तेव्हा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे तेव्हाचे दिग्गज नेते दिग्विजय सिंह यांनी अडवाणी यांच्या राजकीय अवस्थेविषयी करुणा व्यक्त केली होती. तेव्हाही आम्हाला हा सुविचार सुचला होता. पण त्याला आता पाच वर्षे झाली. या बदलाची चाहूल त्यांच्या पक्षातील काहींना अगोदरच लागली असावी, कारण बदलाची चिन्हे भूतकाळात दडलेली आहेतच. अडवाणी यांच्या भवितव्याविषयी कणव व्यक्त केल्याने प्रसिद्धीच्या झोतात असतानाच दिग्विजय सिंह यांना राहुलबाबांच्या नेतृत्वाविषयी नवा साक्षात्कार झाला होता. ‘राहुल गांधी हे अन्यायाच्या विरोधात लढणारे नेते असले तरी त्यांच्यात सत्ताधारी नेतृत्वाचे गुण नाहीत,’ असे दिग्विजय सिंह बोलले, तेव्हाच खरे तर त्यांच्या वसंताचा अस्त होण्याची सुरुवात ठरली असणार, हे अनेक काँग्रेसजनांनी जाणलेही असावे. आता स्वत: दिग्विजय सिंहांनाच ग्रीष्माची जाणीव सतावू लागली आहे. मध्य प्रदेशात निवडणुकांचे वारे वाहू लागले, आणि राहुलजींच्या भोपाळमधील सभेच्या मंचावरून आपले कटआऊट हद्दपार करण्यात आले, तेव्हाच, भाजपने अडवाणींना जेथे ठेवले तेथे जाऊन बसण्याची वेळ आली, हे त्यांच्यासारख्या चाणक्याच्या ध्यानात आले असणार, हेही काँग्रेसजनांनी जाणले असावे. मध्य प्रदेशातील निवडणुकांच्या आखणी समितीचे नेतृत्व काँग्रेसने त्यांच्याकडे सोपविले असले, तरी जे काही करायचे ते पडद्याआडूनच, हा संदेश मिळाल्याने दिग्विजय सिंह यांनी जिभेला लगाम घातला असावा. ज्यांनी केवळ जिभेच्या जोरावरच स्वत:स आणि पक्षास चर्चेत राखले, त्या दिग्विजय सिंहांवरच अशी वेळ आल्याने, ‘आपला अडवाणी झाला’ हे ओळखण्याएवढे शहाणपण त्यांच्याकडे आहे, हे काल सिद्ध झाले. ‘मी बोललो तर काँग्रेसचे नुकसान होते, म्हणून आता गप्प बसणार, पण कार्यकर्त्यांनी पक्षाच्या उमेदवारास निवडून आणण्यासाठी जिवाचे रान करावे. तो शत्रू असला तरी त्याच्या विजयासाठी झटावे,’ असा संदेश दिग्विजय सिंहांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला, आणि म्यान केलेल्या जिभेलाही धार कायम आहे, हेही त्यांनी दाखवून दिले. दिग्विजय सिंहांनी गप्प राहणे पथ्यावर पडेल असे वाटणारे केवळ काँग्रेसमध्येच असतील असे नाही. भाजपलाही तसे वाटत असावे, म्हणूनच शिवराजसिंहांनी त्यांच्या या वक्तव्याला दाद दिली असणार.. अशा प्रकारे दिग्विजयसिंहांच्या मौनाचा फायदा भाजपला मिळणार असेल, तर ते कुणासाठी काम करताहेत, अशा शंकेची पाल सोडण्याचे काम मायावतींनी चोख बजावले आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर टीका करून काँग्रेसच्या महाआघाडीला मायावतींनी धक्का दिला, तेव्हा मायावती या भाजपची ‘बी टीम’ आहे, असे वाटू लागले असतानाच मायावतींनीच दिग्विजयसिंहांना भाजपची ‘बी टीम’ ठरवावे, यात एक गंमत सामावलेली आहे. नाटकाचा पडदा आत्ताच उघडला आहे, आणि पहिला प्रवेश सुरू झाला आहे. खरे नाटक पुढेच आहे.