24 February 2019

News Flash

क्षमामूर्ती डोनाल्डजी!

तुमच्या ज्ञानेंद्रियांना भिडणार नाही.

डोनाल्ड ट्रम्प (संग्रहित छायाचित्र)

सुजनहो, रोजच्या वृत्तजंजाळातून बाहेर या. नेमेचि घडणाऱ्या त्याच त्या घटना घडामोडींच्या मायामोहापासून बाजूला व्हा आणि परिसा.. परिसा ही ट्रम्पकथा. ही कहाणी आहे एका महामानवाची. योगायोग समजा किंवा कसेही, परंतु ही कथा आहे एका महायोग्याची. होय होय सुजनहो, महायोगीच ते. त्यांची साधना तुमच्या चर्मचक्षूंना कदाचित दिसणार नाही. तुमच्या ज्ञानेंद्रियांना भिडणार नाही. कारण.. कारण सुजनहो, तुम्ही तर साधे मर्त्यमानव! डोनाल्डजी ट्रम्प यांच्यासारख्या दैवी पुरुषांची महत्ता तुम्हांस कशी समजणार? दैवीच म्हणावयाचे त्यांना. अमेरिकेला मिळालेली दैवी देणगीच ती. आता आम्हांस नक्की सांगता येणार नाही. किंतु आमची ही प्रगाढ श्रद्धा आहे की, डोनाल्डजी म्हणजे आकाशातल्या कुठल्या तरी बाप्पाचे तंतोतंत अवतारच आहेत. सूर्यदेवाच्या रथअश्वाच्या आयाळीप्रमाणे उडणारा त्यांचा तो सुवर्णकेशसांभार, डॉलरी तेजाने झळाळणारी त्यांची ती सोनेरी कांती, सौदीतले, रशियातले, अमेरिकेतले उत्तुंग ट्रम्पटॉवरही ज्यापुढे खुजे वाटावेत अशी त्यांची ती स्वतच्या थोरवीबद्दलची खात्री.. असे ते अंगठा आणि तर्जनीची चिमटी करून बोलावयास लागले, की वाटते येथे बिगबिग ग्रेटग्रेट असा कोणी महापुरुषच टेकडीवरील प्रवचने देऊ लागला आहे. सुजनहो, विचार करा.. हे सारे आले कुठून? हे आले डोनाल्डजींच्या क्षमाशील वृत्तीतून. अहाहा, क्षमाशीलता! हे वीरांचे आभूषण! पण हे वीरही क्षमा कुणास करतात, अभय कुणास देतात तर इतरांस. परंतु डोनाल्डजींचे वैशिष्टय़ असे की, ते स्वत:स क्षमा करू शकतात. साधे कर्म नाही हे. स्वत:वर कोणतीही गोष्ट आली की भले भले मागे सरतात. परंतु डोनाल्डजींचे तसे नाही. आता हेच पाहा ना. तेथे एक खटला सुरू आहे, की अध्यक्षीय निवडणुकीत रशियानामक देशाशी डोनाल्डजींच्या कारभाऱ्यांनी संधान साधले. निवडणुकीत भ्रष्ट आचार केले. यात डोनाल्डजींवर नाही नाही ते आरोप झाले. आता डोनाल्डजींना विचाराल, तर ते आकाश पाठीवर घेणाऱ्या हत्तींवर चढून सांगतील की तो खटला म्हणजे फेक फेक न्यूज आहे. परंतु तरीही डोनाल्डजी खटल्याची अग्निपरीक्षा देत आहेत. तेथील न्याययंत्रणेपुढे ते ‘आलिया भोगासी असावे सादर’ म्हणून उभे आहेत. परंतु त्यांचे मन त्यांना खात होते. की आपल्यावर असे आरोप व्हावेत? अखेर त्यांनी आपले हृदय विशाल केले. हाती मोबाइल घेतला आणि मानवजातीच्या इतिहासात आजवर कोणी केले नसेल, असे धाडसी कृत्य केले. त्यांनी मानवजमातीस जाहीर केले : होय, लोकहो, होय, स्वत:ला क्षमा करण्याचा नितांत हक्कमजकडे आहे. त्यांचे ते ट्वीट आले आणि काय सांगावे महाराजा, आकाशातून चक्क पुष्पवृष्टी झाली डोनाल्डजींच्या धवलगृहावर. साधु: साधु करीत जो तो एकमेकांस विचारू लागला, की कोठून आले हे धैर्य डोनाल्डजींकडे? कोणी म्हणाले, स्वत:च्या आत्म्यास अशी क्षमा करणे हे महायोग्याचेच काम. डोनाल्डजी हे महायोगीच. यापूर्वी या अवनीतलावर असे कृत्य कोणी केले नाही, यापुढेही असे होणार नाही असेही काही म्हणू लागले. परंतु ते तेवढे खरे नाही हं सुजनहो. स्वत:स स्वत:च्या अधिकारात क्षमा करणारे, स्वत:वरील खटले मागे घेणारे अतियोगी यापूर्वी होऊन गेले आहेत. जगातील सर्व गोष्टींचा शोध ज्याप्रमाणे पंचसिंधूंच्या परिसरातच लागला, त्याप्रमाणेच हे न्यायप्रिय अतियोगीही त्याच परिसरातून आले आहेत. काय सांगावे, कदाचित एखाद्या दैवी योगायोगाने आपले हे क्षमामूर्तीही त्याच अतियोग्याच्या कुळातील असावेत. नव्हे, नव्हे, आहेतच. म्हणून तर सुजनहो, ही ट्रम्पकथा देशोदेशी घडत आहे..

First Published on June 6, 2018 1:14 am

Web Title: donald trump 27