अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार आणि महान बिल्डर डोनाल्डभाई ट्रम्प यांनी त्यांच्या निकटतम प्रतिद्वंद्वी हिलरी क्लिंटन यांना दिलेल्या गर्भित धमकीवरून जगभरात जो कल्लोळ निर्माण झाला आहे त्याची आम्हांस भारीच मौज वाटत आहे. खरे तर डोनाल्डभाई हे असे वेगळे आणि विचित्र काय बोलले हेच आमच्या अल्पमतीस उमगेनासे झाले आहे. ते जे म्हणाले व जे सर्वानी ऐकले ते असे, की हिलरी क्लिंटन या अध्यक्ष झाल्यास त्या देशामधील बंदूकधारकांचे हक्क चिरडतील. तेव्हा त्याबद्दल जे काही करायचे असेल, ते हे बंदूकधारकच करतील. आता यामध्ये छुपी धमकी आहे हे तर कोणासही कळेल. अगदी एखादा मनुष्य ट्रम्पभक्त परिवारातील असला तरी त्यालाही त्यातील छुपा इशारा समजल्याशिवाय राहणार नाही. कारण भक्त परिवारातील असला तरी तो माणूसच असतो व त्याला त्याच्या वयाच्या मानाने विकसित झालेला नसला, तरी मोठा मेंदू असतोच असतो. तेव्हा जे ट्रम्पभक्त परिवाराला समजते ते इतरांना समजणार नाही असे नाही. तेव्हा आमच्यासमोर उभे ठाकलेले सवालिया निशान असे आहे, की ही हिलरी यांना दिलेली जिवे मारण्याची धमकी असली, तरी त्यावरून आजच एकदम भौचक्के होण्याचे मुदलात कारणच काय? डोनाल्डभाई जेव्हा रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीकरिता उभे ठाकले तेव्हाच संपूर्ण जगास एक धमकी प्राप्त झाली होती, हे आपण कसे काय बरे विसरू शकतो? येथे काही विसरभोळे विचारतील की कोणती बरे ती धमकी? तर डोनाल्डभाई हीच एक धमकी आहे! डोनाल्डभाई यांना बोलण्याचा छंद आहे. काही लोकांना स्वतचा आवाज ऐकण्यास खूप खूप आवडते, त्यास कोण बरे काय करणार? तेव्हा डोनाल्डभाई खूप बोलतात. त्यावरून काही लोक त्यांना वाचाळवीर म्हणतात, तर काही लोक केजरीवाल. तर भारताचे पंतप्रधान न. दा. मोदी हे आपणांस ठार मारू शकतील असे आपले आजन्म लोकपाल अरविंद केजरीवाल जेव्हा म्हणतात तेव्हा लोकांपुढती मौज वाटण्याखेरीज अन्य काही पर्याय असतो का? डोनाल्डभाईंचे जरा निराळे आहे. ते जेव्हा दहशतवाद, बेरोजगारी, अमेरिकेला तिचे गतवैभव प्राप्त करून देणे अशा गोष्टींबाबत अर्णब गोस्वामींसही पैजा जिंकू अशा आविर्भावात बोलतात तेव्हा मात्र शहाण्या लोकांपुढती भयशंकित होण्याखेरीज पर्यायच नसतो. तर हे सर्व लोकांनी याआधीच पाहिलेले, अनुभवलेले, जाणलेले असल्याकारणाने आता त्यांनी दिलेल्या गर्भित धमकीने कोणास हादरा, धक्का वा तत्सम काही भावना होत असेल, तर तो गृहस्थ एक तर डोनाल्डभाईंचा भक्त तरी असेल किंवा गेल्या काही महिन्यांपासून च्यानेल-विपश्यना तरी करीत असेल. एक मात्र खरे, की डोनाल्ड ट्रम्प हे स्वत जरी हलती-बोलती धमकी असले तरी त्याने कोणीही फार बावरून जाण्याचे कारण नाही. कारण अशा धमक्यांमध्ये अंगभूतच स्वनाशाची यंत्रणा असते व सध्या ती सुरू झाल्याचे दिसते आहेच.