एक आटपाट गाव.. ट्रम्पगाव त्याचं नाव! अमेरिकेत ट्रम्पतात्यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ अशी घोषणा दिली, तेव्हा सुलभवाल्या बिन्देश्वरीदादांनी एका गावाला ट्रम्पगाव असं नाव दिलं. तसं आपल्याही गावाचं नाव ट्रम्पगाव ठेवावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं. या ट्रम्पगावात सारे रहिवासी कष्टकरी.. पण ट्रम्पतात्यांचं नाव गावाला दिल्यावर आपलं नशीब बदलणार असं त्यांना वाटू लागलं. गावात एक जण थोडासा शिकलेला होता. त्याचं नाव काही वेगळंच होतं, पण लोक त्याला गप्पू म्हणायचे. त्याला गप्पा मारायचा छंद होता, म्हणून त्याचं नाव गप्पू.. परवा गप्पूनं गावात दवंडी पिटवली. ‘उद्या ट्रम्पतात्या राष्ट्र संघाच्या आमसभेत बोलणार आहे. भाषणाला समद्या गावकऱ्यांनी चावडीवर यावे!’ ठरलेल्या वेळी गाव चावडीवर गोळा झाले. आता थोडय़ाच वेळात ट्रम्पतात्याचं भाषण सुरू झालं, की तो काय बोलतो, ते त्यांच्या भाषेत गप्पू समजावून सांगणार होता.. आणि ट्रम्पतात्या पडद्यावर दिसला. त्याने हात उंचावताच गावकऱ्यांनी शिट्टय़ा वाजवून त्याला प्रतिसाद दिला, आणि ट्रम्पतात्याचं भाषण सुरू झालं. पहिल्या काही वाक्यांतच सभागृहातले सारे सूटबूटवाले पाहुणे जोरजोरात हसताना दिसले, म्हणून गावकरीही हसू लागले, आणि गप्पूने डोळे वटारले. ‘गप बसा. ट्रम्पतात्या सीरियसली बोलतोय..’ गप्पू म्हणाला, आणि गावकरी हसायचं थांबले. तिकडे ट्रम्पतात्याचा चेहरा उगीचच ओशाळल्यागत दिसत होता. तरीही गप्पू मात्र खूश होता. ट्रम्पतात्याच्या पुढच्या वाक्यावर त्याचे कान खिळले होते. ‘आज मी संयुक्त राष्ट्र संघाच्या आमसभेसमोर अमेरिकेची अद्वितीय यशोगाथा सांगण्यासाठी उभा आहे. अमेरिकेने आजपर्यंतच्या इतिहासात कधीच केली नव्हती, तेवढी प्रगती आम्ही गेल्या दोन वर्षांत केली आहे’.. ट्रम्पतात्या जोशात म्हणाले, आणि पुन्हा आमसभेत हास्याचे फवारे फुटले. काही तरी विनोद झाला, असे वाटून ट्रम्पगावातले गावकरीही जोरात हसू लागले.  ‘ही तर ट्रम्पतात्याची मन की बात हाय’.. कुणी तरी गावकरी मागच्या गर्दीतून ओरडला आणि सगळ्यांनी त्याला जोरात हसून दाद दिली.. गप्पूने पुन्हा तात्याच्या पुढच्या वाक्याकडे कान लावले.. आपल्या वाक्यानंतर आमसभेत हसू फुटेल असे तात्यांना वाटले नव्हते. ‘पण ठीक आहे’.. तात्यांनी पुन्हा आपला चेहरा गंभीर केला. आता गप्पूही गंभीर झाला होता. तात्याचे पुढचे वाक्य ऐकून त्याने गावकऱ्यांना त्याचा अर्थ सांगायला सुरुवात केली. ‘बघा, अमेरिकेच्या शेअर बाजाराने ऐतिहासिक उसळी घेतली आहे.. बेकारीचा आलेख कमालीचा खाली आला आहे. चाळीस लाख नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. सीमेवरच्या सुरक्षेला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे, आणि सीमेवर भिंत बांधण्याचा आमचा विचार आहे. थोडक्यात, अमेरिका पूर्वी कधीच नव्हता एवढा शक्तिमान, श्रीमंत आणि सुरक्षित देश झाला आहे!’.. गावकऱ्यांनी ट्रम्पतात्याच्या या भाषणावर जोरदार टाळ्या वाजविल्या. गप्पूने अभिमानाने ट्रम्पतात्याकडे पाहिले, आणि तेवढय़ात टीव्हीचा सिग्नल गेला. ‘आम्ही ही मन की बात आधीच ऐकली आहे’..  गर्दीतून कुणी तरी ओरडला, आणि ट्रम्पगावातील आमसभेत जोरदार खसखस पिकली. गप्पूने टीव्ही बंद करून टाकला होता!