News Flash

कर हा करी..

व्हॉट्सअ‍ॅप संदेश अजून प्रसारित झाले

समस्त विश्वातील अत्यंत गरीब बिच्चारा प्राणी म्हणून ‘युनेस्को’ने नवरा या प्राण्याची निवड केल्याचे व्हॉट्सअ‍ॅप संदेश अजून प्रसारित झाले नसले म्हणून काय झाले? जी वस्तुस्थिती आहे ती आहेच! ‘नासा’ने संशोधनांती त्यावर अद्याप शिक्कामोर्तब केले नसले तरी तमाम नवऱ्यांनी ते केव्हाच मान्य केले आहे. नवरा हा मग कोणीही असो, कोणत्याही पदावरील असो, बायकोच्या लेखी त्याची किंमत नवरा एवढीच असते. हे जे त्रिकालाबाधित सत्य आहे त्यापासून खुद्द अमेरिकेच्या अध्यक्षालाही सुटका नाही. परवा इस्रायलच्या दौऱ्यात डोनाल्ड ट्रम्प यांना नक्कीच त्याची प्रचीती – अर्थातच नव्याने – आली असेल. आता ट्रम्प यांच्या मनात एकंदरच स्त्रीजातीविषयी जो आदर आहे, त्यास तुलना नाही. त्यांनी वेळोवेळी तो आदर व्यक्त केला आहे. महिलांना वागविण्याची त्यांची म्हणून जी पद्धत आहे तिचा अवलंब तर तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य मर्त्य मानवांना स्वप्नातही करता येणार नाही. काही अमेरिकी नागरिक म्हणतात की ते महिलांबाबत वाह्य़ात आहेत. पण फेक न्यूज म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावे हेच बरे. तर अशा या थोर विभूतीलाही त्यांची पत्नी, श्रीमती मेलिना यांनी चारचौघात कस्पटासमान वागणूक दिली असे काही लोक म्हणत आहेत. म्हणजे झाले असे की इस्रायलमधील बेन गुरिअन विमानतळावर उतरत असताना डोनाल्डजी हे असे पुढे चालले होते. दोन पावले मागून मेलिना येत होत्या. हे रिवाजानुसारच. तर त्या वेळी डोनाल्डजींनी त्यांचा कर हा करी धरू पाहिला. तर त्या शुभांगीने तो चक्क झिडकारला. सर्वासमक्ष झाले हे. या आधीही एकदा त्यांनी असेच केले होते. डोनाल्डजी त्यांचा हात धरू गेले, तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. ते त्यांनी जाणूनबुजून केले की कसे हे त्याच सांगू शकतील. परंतु यामुळे लोकांसमोर डोनाल्डजींची केवढी पंचाईत झाली. सर्वानाच समजले ना, की डोनाल्डजींची ही त्यांची काय किंमत करते ते? हे पाहून बाकी अनेक सर्वसामान्य नवरोबांना बरेही वाटले असेल. म्हणजे एकटय़ा आपलीच सौभाग्यवती नको तेव्हा, नको तेथे आपली किंमत करीत नाही ही भावना तशी सर्वासाठी सुखदच म्हणायची. अमेरिकेतील अनेक नागरिक मात्र हे पाहून खूप हळहळले म्हणतात. डोनाल्डजींचा हात आपल्यालाही असाच झिडकारता आला तर किती बरे, असे एक त्यांना वाटून गेले असावे. मेलिना यांच्याबद्दल तेथील नागरिकांच्या मनात कोणत्या भावना आहेत हे सारेच जाणतात. त्यात या प्रसंगानंतर त्यात आणखी एका भावनेचा समावेश झाल्याचेही सांगण्यात येते. ती म्हणजे हेवा..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2017 3:45 am

Web Title: donald trump unesco marathi articles
Next Stories
1 बांधिलकीची गोष्ट
2 राजनाथजी.. मनापासून दंडवत
3 वाघाची औलाद आहे आमची..
Just Now!
X