03 June 2020

News Flash

ट्रम्पतात्याची ‘तुतारी’..!

खरे म्हणजे, या प्राण्यास ‘कुत्रा’ म्हणणे योग्यच नाही.

खरे म्हणजे, या प्राण्यास ‘कुत्रा’ म्हणणे योग्यच नाही. ते एक ‘प्रवृत्तीवाचक सर्वनाम’ आहे, आणि ते बहुतांश वेळा माणसासाठीच वापरले जाते. तरीही, याच नावाची एक प्राणीजमात, तो मानापमानाचा मुद्दा न करता माणसावर निरपेक्ष प्रेम करते, हा त्या प्राण्याच्या मनाचा मोठेपणा म्हणावयास हवा. त्यामुळे, आपण त्याला कुत्रा न म्हणता, श्वान म्हणू!.. श्वान हा चतुर, आज्ञाधारक, हुशार, धैर्यवान आणि माणसाचा सच्चा मित्र असला तरीही, माणसाकडून त्याला कोणत्याही परतफेडीची अपेक्षा नसते, हे वारंवार सिद्ध झाले आहे. म्हणूनच, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कॅनॉन’च्या नावाने (हे अमेरिकेच्या सैन्यदलातील एक श्वान!) कौतुकाच्या कितीही ‘तुताऱ्या’ फुंकल्या असल्या, कितीही खोटी छायाचित्रे समाजमाध्यमांवर ‘शेअर’ केली असली, तरीही त्यामुळे फुशारून न जाता त्या श्वानाचे पाय ‘जमिनीवरच’ राहणार यात सुज्ञांस तसूभरही शंका असणार नाही आणि आपल्या कामगिरीचा लाभ स्वत:च्या प्रसिद्धीसाठी उपटण्याकरिता ट्रम्पतात्या तुताऱ्या फुंकत असतील तर त्याचेही त्याला कोणतेच सोयरसुतक असणार नाही. कुत्रा- श्वान- या प्राण्याची स्वभाववैशिष्टय़े जे ओळखतात, त्या माणसांस हे शंभर टक्के माहीत असल्याने, ट्रम्पतात्याने ‘शेअर’ केलेल्या त्या ‘फोटोशॉप’ केलेल्या स्वत:सोबतच्या छायाचित्रामुळे श्वानाचाच मान वाढला आहे. याच बहादूर श्वानाने- कॅनॉनने- ‘इस्लामिक स्टेट’चा म्होरक्या, अबुबकर अल बगदादी या दहशतवादी म्होरक्यास शोधून काढण्याच्या मोहिमेत आपले कर्तव्य बजावले. मग अवघ्या अमेरिकन राष्ट्रवादाची छाती त्या श्वानाच्या कर्तबगारीने छप्पन इंचांपर्यंत फुगली. असे काही झाले, की अशा प्रसिद्धीचा आपला वाटा उचलावा असे वाटणाऱ्यांना योग्य वेळेची प्रतीक्षा करावी लागते. ट्रम्पतात्यांसमोर ती संधी चालून आली.. कॅनॉनच्या बहादुरीचे पुरस्कारचिन्ह त्याच्या गळ्यात अडकविणारे ट्रम्पतात्यांचे बनावट छायाचित्र कुणा ‘डेली वायर’ या ‘जालनिशी’ने प्रसिद्ध केले. ट्रम्पतात्यांनी ही संधी साधली आणि ते बनावट चित्रदेखील ‘ट्विटर’वर ‘शेअर’ केले. पुढे काय झाले, हे ट्विटरवर वावरणाऱ्या अवघ्या जगास माहीत आहे. ट्रम्पतात्यांच्या प्रसिद्धीलोलुपतेची खिल्ली उडविणाऱ्या हजारो ‘ट्विप्पण्या’ धो धो सुरू झाल्या. ट्रम्पतात्यांचा अगोदरच लालेलाल असलेला चेहरा त्यानंतर अधिकच लाल झाला असला, तरी त्या कॅनॉनच्या चेहऱ्यावरची रेषादेखील हललेली नाही, हे ते बनावट छायाचित्र न्याहाळणाऱ्या प्रत्येकाच्याच लक्षात आले असेल. आपल्यावर जगभरात समाजमाध्यमांवरून कौतुकाचा वर्षांव होत आहे, याचा त्याला कोणताही आनंद नाही, आणि आपल्या छायाचित्राचा वापर करून ट्रम्पतात्यासोबत प्रसिद्ध झालेले बनावट छायाचित्र कुचेष्टेचा विषय झाल्याबद्दल त्याच्या चेहऱ्यावर कोणतीही खंत वा दु:खही नाही. ‘कॅनॉन’ हा तमाम श्वानजगताच्या निरपेक्ष कर्तव्यभावनेचा आदर्श प्रतिनिधी ठरला आहे. त्याच्या मनातील विचार अशा वेळी कोणासही वाचता येत नसतील. त्यामुळे जगाने कौतुक करावे अशी काही कर्तबगारी आपण बजावली आहे याचीही त्याला जाण नसावी. तो आपल्या जन्मजात स्वभावास जागला आणि त्याने कर्तव्यभावनेचे पालन केले, एवढेच!..

कॅनॉन हा अमेरिकेच्या सैन्यदलाचा सदस्य आहे. गुन्हेगारांना शोधून काढण्याचे प्रशिक्षण त्याला मिळाले आहे. त्याने बगदादीला शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली, हे खरेच..

‘गुन्हेगारांना शोधण्याचे प्रशिक्षण त्याला मिळाले आहे, हे ट्रम्पतात्यांना माहीत असूनही त्यांनी त्याच्या जवळ जायला नको होते’, हा तात्यांच्या एका चाहत्याने ट्विटरवर दिलेला सल्ला त्याला वाचता आला असता, तर जीभ बाहेर काढलेल्या त्याच्या तोंडावर स्मितहास्याची एक रेषादेखील उमटलेली दिसली असती, एवढे नक्की!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 1, 2019 2:53 am

Web Title: donland trup dog clever obedient akp 94
Next Stories
1 वर्तले काय संजया..
2 काळजीवाहू ‘सरकार’!
3 कोण कर्ता, कोण करविता..
Just Now!
X