21 February 2019

News Flash

सत्यपालांची शास्त्रवाणी

महाभारतकाळी तर आपल्याकडे टीव्हीसुद्धा होता व संजय हा टीव्हीवरचा पहिला ‘अँकर’ होता.

सत्यपाल सिंह

आमचे लाडके मोदीमंत्री वेद-शास्त्रसंपन्न डॉ. सत्यपाल सिंह यांनी मनुष्यजन्माबद्दल त्यांचा अभ्यासपूर्ण व चिंतनगर्भ सिद्धांत मांडला काय आणि तत्काल त्यांच्याविरोधात मूठभर मूढजनांनी टीकेच्या मर्कटलीला सुरू केल्या काय, सारेच वेदनादायी आहे. त्याहून अधिक खेदजनक काही असेल, तर या मूढजनांमध्ये असलेला काही वैज्ञानिकांचा समावेश. सत्यवचनी सत्यपालांकडून त्यांनी क्षमायाचनेची मागणी केली आहे.  आपला सांप्रतचा समाज नवविचारांप्रति, नववैज्ञानिक शोधांप्रति किती असहिष्णू आहे याचेच हे प्रतीक असून, त्याबद्दल या मूढ वैज्ञानिकांची केवळ अनुदानेच रद्द करून चालणार नाही, तर त्यांवर टाडा, पोटा, मोक्का यांचेही प्रयोग करावयास हवेत, अशी आमची तर्कशुद्ध मागणी आहे. आपले डॉक्टरसाहेब हे स्वत: वैज्ञानिकच आहेत. दादरी ही छोटी घटना असल्याचा त्याचा अधिभौतिकशास्त्रीय शोध समस्त विज्ञानविश्वात ख्यातकीर्त आहे. शिवाय त्यांचा देववाणी संस्कृतचा गाढा अभ्यास असल्यामुळे ते सुसंस्कृतही आहेत व म्हणूनच केवळ ते वैज्ञानिकांवर अशी तृतीयअंशी (पक्षी-थर्ड डिग्री) कारवाई करणार नाहीत. परंतु त्यांनी तातडीने कायदा करून, आर्यावर्तातील सर्व वैज्ञानिकांस भारतीय विज्ञान परिषदेतील महामहीम नरेंद्रजी मोदीजी यांची सशास्त्रीय भाषणे मुखोद्गत करणे अनिवार्य केले पाहिजे. त्याशिवाय या पवित्र भारतभूमध्ये विज्ञानसहिष्णू वातावरण निर्माण होणार नाही. काय चुकले होते सत्यपालांचे? ते एवढेच म्हणाले ना, की त्या मूढमती डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत चुकीचा आहे. माकड माणसाचे पूर्वज आहे हे चूक आहे. बरोबरच आहे ते. डॉक्टर सांगतात, की वेदशास्त्रात तसे कुठेही म्हटलेले नाही. जंगलात माकडांपासून मानवाची उत्क्रांती झाल्याचे कोणीही पाहिलेले नाही.  आता एवढे शास्त्रीय पुरावे दिल्यानंतर डार्विनचा सिद्धांत खरा कसा मानता येईल?  आजही जर शाळेत डार्विन वगैरेंच्या फालतू सिद्धांताऐवजी वेद, पुराणे शिकविण्यास सुरुवात केली, तर येत्या काही वर्षांतच आपण अणुबॉम्ब, संगणक, मोबाइल फोन, झालेच तर फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यांचे शोध लावू शकू. कारण हे सारे वेदांमध्ये आहेच. महाभारतकाळी तर आपल्याकडे टीव्हीसुद्धा होता व संजय हा टीव्हीवरचा पहिला ‘अँकर’ होता. हे लवकरच ‘नासा’ मान्य करणार असून, व्हॉट्सअ‍ॅप विद्यापीठातर्फे तसे प्रयत्न सुरू आहेत. असे असताना आपले पूर्वज माकडापासून उत्क्रांत झाले असे कसे म्हणता येईल? डॉक्टर सांगतात, आजचा माणूस हा पूर्वीपासून माणूसच होता व माणूसच राहील. पूर्वीपासून माणूस होता हे तर सिद्धच झाले आहे. कारण आपल्या सर्वाचा पिता हा मनू आहे.  मात्र डॉक्टरांचे उत्क्रांतीबाबतचे एक मत मात्र विवादास्पद आहे. ते म्हणतात माणूस हा माणूसच राहील. परंतु अमेझॉन खोऱ्यातील एका चालू संशोधनानुसार माणसातून मर्कट तयार होत असून, अलीकडे वेगाने ही उत्क्रांती होत आहे. सत्यपालांनी या संशोधनास तन-मनाने साह्य केल्यास ते त्यांच्या विज्ञाननिष्ठेस शोभून दिसेल व त्यायोगे त्यांच्यावरील मूढ टीकेलाही परस्पर उत्तर मिळेल.

First Published on January 22, 2018 1:21 am

Web Title: dr satyapal singh refused darwin theory of evolution