04 June 2020

News Flash

अवघे जगणे व्हावे नाटक!

महाराष्ट्राला दोन गोष्टींचं मोठं वेड आहे. त्यापकी एक म्हणजे, नाटक!

महाराष्ट्राला दोन गोष्टींचं मोठं वेड आहे. त्यापकी एक म्हणजे, नाटक! मराठी माणसाचं सांस्कृतिक पोषण गेल्या शतकभरापासून नाटकांनीच केलं आहे. मराठी रंगभूमी हा महाराष्ट्राचा मानबिंदू आहे. नाटकाशी नातं असलेलं जे काही कोणत्याही क्षेत्रात घडत असतं, त्याची चर्चा तर चवीने होतच असते. आणि समजा, एखाद्या क्षेत्रात तसे काहीच घडत नसेल, तर निदान काहीतरी घडत असल्याचे नाटक तरी संबंधितांना करत राहावेच लागते. वास्तवात काहीच घडत नसले, तरी मराठी मनाला रिझविण्यासाठी आसपासच्या हरेक क्षेत्रात अशा पायंडय़ामुळे नाटय़मय घडामोडी घडत असताना, आणि राजकारणासारखे क्षेत्रच नेहमी त्यामध्ये बाजी मारत असताना, ज्यांच्या खांद्यावर नाटक घडविण्याची खरी जबाबदारी असते, त्यांनी मागे राहणे हा नाटय़कलेचा उपमर्द नव्हे काय?..अलीकडे सर्वच क्षेत्रांवर राजकारणाची पकड बसू लागल्याने, नाटक कोणते आणि वास्तव कोणते हे ओळखणेही कठीण होत असताना, खरे नाटक जिवंत ठेवण्याची जबाबदारी नाटय़कर्मीवर असणार हे ओघानेच आले. पण खरे नाटक हा विरोधाभासच झाला. नाटक हे नाटकच असते, अशी मराठी रसिकाची समजूत असल्यामुळे, नाटय़कर्मीच्या जगातही घडणारे सारे काही नाटकच असावे, असा भाबडा समज मराठी मनात रुळलेला असतो. पडदा पडला की नाटक संपते आणि नाटके करणारे सारे वास्तवाच्या जगात वावरू लागतात, नाटक आणि वास्तव यांच्यामध्ये पडद्याचा अंतरपाट असतो, अशी आपली आमची समजूत होती. पण सच्च्या नाटय़कर्मीना मात्र, नाटक जिवंत ठेवायचे असेल, तर वास्तव आणि नाटक यांच्यात पडदे असणे बहुधा मान्य नसावे. नाटकासाठी जगणे आणि अवघे जगणेही नाटक करून सोडावे, हा त्यांचा व्रतस्थ बाणा असावा. तो जपण्यासाठी वास्तवाचेही नाटक करून सोडायचे असेल, तर त्यासाठी अभिनयाची जोड हवी. आणि अभिनय कसदार हवा असेल, तर त्यासाठी भरपूर तालीमही हवी. तालीम न करताच रंगमंचावर उतरणारा अभिनेता हा सुस्तावलेल्या पलवानाने आयत्या वेळी कुस्तीला आखाडय़ात उतरणाऱ्या उस्तादासारखा असतो. नाटक आणि आखाडा यांमध्ये एक गोष्ट सामाईक असते, ती म्हणजे तालीम!.. आखाडय़ात उतरून शड्ड ठोकत कुस्तीची दंगल गाजविणे असो, किंवा रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना अभिवादन करून रंगमंचावर सादर करावयाचा अभिनय असो, दोन्हीसाठी तालीम आवश्यकच असते. संमेलनाचे वारे वाहू लागल्यावर मराठी नाटय़ परिषदेने ठाण्यातील कार्यालयात तालमीला टाळे लावल्यावर एका नव्या नाटकाची नांदी सुरू झाली आहे. तसेही निवडणुकीच्या आणि नाटय़ संमेलनाच्या अगोदर काही दिवस, नाटय़ परिषदेच्या मंचावर नाटकांचा सुकाळ नेहमीच सुरू असतो. ठाण्याच्या आगामी संमेलनाआधी तालमीच्या निमित्ताने सुरू होणारे नवे नाटक आपल्या कसदार अभिनयाने कोण अधिक चांगले वठवतो, त्याकडे आम्ही चष्मा सरसावून नजर लावली आहे..

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2016 4:34 am

Web Title: drama festival in maharashtra
टॅग Drama
Next Stories
1 हा ‘गौरव’ महाराष्ट्राचा!
2 नव्या कृषिक्रांतीकडे..
3 खरे ‘काँग्रेस दर्शन’!
Just Now!
X