‘ढोल’ हे जाड, निबर कातडीपासून बनविलेले एक तालवाद्य असले तरी एखाद्या कसलेल्या ढोलवादकाची तालकाठी त्या कातडीवर पडली की त्यातून निघणाऱ्या तालावर नाचण्याचा मोह भल्याभल्यांना आवरता येत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ फर्डे वक्तेच नव्हे, तर कसलेले ढोलवादकही आहेत. आजवर जगभरातील अनेक देशांच्या दौऱ्यात ढोल वाजवून त्यांनी आपली ही कलादेखील सिद्ध केली आहे. आपण ढोल बडविला की समोरचे कुणीही त्याच्या तालावर नाचलेच पाहिजेत, असा एक अदम्य आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर त्या वेळी विलसत असतो. अशा या ढोलाची महती राजकारणाला पटल्यामुळे, बाहेर कुठेही गेले की ढोल बडविणे ही राजकारणाची एक जुनी संस्कृतीच होऊन गेली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या घोष पथकातून ढोल बडविण्याचे धडे पंतप्रधान होण्याच्या कितीतरी अगोदरच  घेतलेले असून देशाच्या अन्य कोणत्याही राजकीय नेत्याहून मोदी हे ढोल बडविण्यात निष्णात नेते आहेत, हे त्यांनी सिद्धच केले आहे. आफ्रिकी देशांच्या दौऱ्यात, टांझानियातील दार-एस्सलाम या शहरातील एका कार्यक्रमात त्यांनी धरलेल्या  तालावर ठेका धरण्याचा मोह टांझानियाच्या अध्यक्षांसही आवरता आला नाही. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी यांनी परदेश दौरे सुरू केले, तेव्हाच त्यांची  ढोल वाजविण्याची ही कला जगासमोर आली   होती, आणि ढोल बडविण्यात कोणत्याही व्यावसायिक ढोलवादकाहून मोदी काकणभरही  कमी नाहीत, हे जगाने ओळखले होते. सुमारे दोन वर्षांपूर्वी, सप्टेंबर २०१४ मध्ये पंतप्रधानपदाच्या कारकीर्दीतील आपल्या पहिल्याच परदेश दौऱ्यात नरेंद्र मोदी यांनी तेथील व्यावसायिक ढोलवादकांच्याच तालाची नक्कल करीत ढोल बडविला. बासरीचे सूरही त्यांनी सफाईदारपणे आळविले. अगदी अलीकडे, फेब्रुवारी २०१६ मध्ये आसामातील निवडणूक प्रचारादरम्यान आणि मे २०१६ मध्ये ईशान्य भारतीय राज्य परिषदेच्या वेळी मेघालयात  मोदी यांच्या ढोलाचा ताल घुमला. आफ्रिका दौऱ्यातील ढोलवादनाने, मोदी यांच्या या नैपुण्यावर शिक्कामोर्तब झाले. ढोल वाजविण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य मोदी यांनी परिश्रमपूर्वक प्राप्त  केले  आहे, याविषयी कोणासही आता शंका राहणार नाही. मोदी यांच्या पहिल्यावहिल्या जपान दौऱ्यातील ढोलवादनानंतर राहुल गांधी यांनी नाके मुरडली  होती, पण विरोधकांनी तसे करायचेच असते. परवा टांझानियात मोदी यांनी ढोल वाजविला तेव्हाही विरोधकांनी पुन्हा टीकेचा सूर लावलाच होता. पण असे देशोदेशी ढोल बडविले नाहीत, तर आपले गुण जगापुढे येणार तरी कसे?