दिवस बरा गेल्याच्या आनंदात चिंतू अंथरुणावर पहुडला. लगेचच त्याचा डोळा लागला. काही वेळातच बंगल्यावर बैठक सुरू झाली. मोदी जाकीट अंगावर चढवतच तो बाहेर येऊन गाडीत बसला. गाडी मंत्रालयात पोचली. घाईने बाहेर येऊन जिना चढतच चिंतूने सहाव्या मजल्यावरील आपले दालन गाठले. महत्त्वाचे अधिकारी आणि काही विश्वासू मंत्री अगोदरच येऊन बसले होते. लगेचच मीटिंग सुरू झाली. सचिवाने एक फाईल उघडून काही कागद चिंतूच्या समोर ठेवले. चिंतू ते चाळत असतानाच सचिव बोलू लागला, ‘‘राज्याच्या तिजोरीत निधी नाही. विकासकामे खोळंबली आहेत. महागाईमुळे जनता अगोदरच त्रस्त आहे. नव्या अर्थसंकल्पात करवाढ केली तर अधिकच अडचणीचे होईल, आणि विकासकामे रखडली तर विरोधक टीका करतील. शिवाय निवडणुकाही तोंडावर आहेत..’’ एवढे बोलून सचिवाने सभोवार पाहिले. साऱ्यांच्या चिंतित नजरा आता चिंतूकडे लागल्या होत्या. समिती कक्षात शांतता पसरली होती. चिंतूने समोरची फाईल बंद करून बाजूला ठेवली आणि तो बोलू लागला.. ‘‘सचिव म्हणतात ती परिस्थिती आहे हे खरेच, पण त्यामुळे विकासकामे थांबविता येणार नाहीत. सध्याच्या परिस्थितीत नवे कर लादल्यास जनता करवादेल व ते परवडणारे नाही हेही खरेच असल्याने जनतेच्या खिशात हात घालून कराच्या रूपाने पसा उभारणे योग्यही नाही. पण घाबरण्याचे कारण नाही. कर नाही, तरी डर नाही! निधी उभारणीचा एक नवा मार्ग आपल्याकडे आहे’’ .. आता सगळ्यांचे कान चिंतू पुढे काय सांगतो याकडे लागले होते. ‘‘राज्यातील सारी देवस्थाने त्यांच्या तिजोरीसह सरकारने ताब्यात घ्यावीत व त्यांचा पसा विकासकामांसाठी वापरावा..  असे केल्यास, करवाढ न करतादेखील जनतेचा पसा विकासकामांसाठी वापरता येईल. देवस्थानांच्या तिजोरीत प्रामुख्याने धनदांडग्यांचा पसा जमा होत असल्याने सामान्य जनतेवर बोजाही पडणार नाही आणि आपल्याला निधी मिळेल!’’ .. चिंतू थांबला. त्याने पुन्हा सगळ्यांकडे पाहिले.  दालनात शांतता पसरली होती, पण पुढच्याच क्षणाला टाळ्यांचा कडकडाट झाला. सचिवाने तर कागद समोर ओढून आदेशाचा मसुदाही तयार करून टाकला. तेवढय़ात एका अधिकाऱ्याने हात उंचावला.  चिंतूने इशारा करता तो बोलू लागला, ‘यासोबतच गावोगावी नवी मंदिरे उभारण्यास प्रोत्साहन देणारे एक र्सवकष धोरणही आखले जावे.. शिवाय, प्रतिपंढरपूर, प्रतिशिर्डी, प्रतिबालाजी, अशी आकर्षक मंदिरेही उभारल्यास भाविकांना जवळच्या जवळ अशी देवस्थाने उपलब्ध होऊन त्यांच्याकडे जमा होणारा निधीही सरकारला वापरता येईल, असे सुचवावेसे वाटते!’ .. काहीसे चाचरतच अधिकाऱ्याने आपले बोलणे संपविले व चिंतूकडे पाहिले. चिंतूचे डोळे चमकले होते. ही कल्पनाही त्याला पसंत पडली होती. ‘अशा तऱ्हेने राज्यातच नव्हे, तर देशातही मंदिरे उभारल्यास, कर न लादताही देश चालवता येईल..’ चिंतू स्वत:शीच पुटपुटला आणि बैठक संपल्याची खूण करीत त्याने जोरजोरात   मान हलविली. त्या झटक्याने चिंतू अचानक  जागा झाला. आपण मुख्यमंत्री झालो ते स्वप्नच होते हे लक्षात येऊन चिंतू पुन्हा झोपी गेला!