कुठे असलेला महाराष्ट्र शिक्षणात कुठे नेऊन ठेवण्यासाठी लागणारी नजरच लोकांकडे नाही. म्हणूनच शिक्षण विभागाच्या कारभाराला नेहमी नजर लागत असावी. निर्णयसुद्धा कसे विद्यार्थिभिमुख, शिक्षकांसाठी प्रेरणादायी.. पण लक्षात कोण घेतो? तरीही निर्णयांची टिंगल होते. मुळात एखाद्या निर्णयामागील भूमिका समजून घेण्यासाठीचा सखोल, अतिखोल अभ्यास करण्याची, मनोव्यापार समजून घेण्याची वृत्तीच राहिली नसावी. त्यामुळे होते असे की, दुसरीचे गणित न येणाऱ्या मुलाला दहावीचे गणित सोडवण्याची वेळ आल्यावर त्याची जशी कमकुवत मानसिक स्थिती होईल तशा स्थितीस शिक्षण विभागासच तोंड द्यावे लागते.  एखादी गोष्ट मिळणार नाही, असे पालकांनी सांगून नंतर ती गोष्ट दिल्यास मुलांना जो अतुलनीय आनंद मिळतो, तोच देण्याचा एक प्रयत्न शिक्षण विभागाने केला. सुट्टी रद्द असे सांगून नंतर यंदापुरती का होईना ती मिळणार असल्याचे सांगून मुलांना निखळ आनंद देण्याचा प्रयोग विभागाने केला. आता हा आनंदीआनंद नेमेचि येणाऱ्या सुट्टीच्या आनंदापेक्षा काकणभर अधिकच असणार. तरीही टिंगल झाली, कारण हेतू समजून घेण्याची तयारीच नाही. या विद्यार्थिभिमुख निर्णयातून त्रागा, चिडचिड, निराशा, गोंधळ, आनंद अशा विविध भावनांची ओळख मुलांना झाली. शाळेत जायचे तर तेथे पाणी नसणार या जाणिवेमुळेच तर, शेततळी खोदूनही आटणाऱ्या पाण्याचे महत्त्व मुलांना समजले. उन्हातून शाळेत जावे लागणार या जाणिवेतून, हवामान बदलाचे गांभीर्य मुलांना जाणवले. उन्हाळी शिबीर म्हणजे काय रे भाऊ , असे विचारणाऱ्या ग्रामीण भागातील मुलांना, शहरी संस्कृतीची जाणीव झाली. आता या सर्वात शिक्षकांवर अन्याय झाला थोडा; पण शिक्षकांपेक्षा शिक्षण अधिक महत्त्वाचे. तरीही शिक्षकांवरील अन्यायाचीही भरपाई होणार आहे. महाराष्ट्र अति, अति अति जलद प्रगत करण्यासाठी ते गरजेचेच आहे. सध्या प्रोत्साहनपर कीर्तने ऐकू अति अति अति जलद प्रगतीसाठी शिक्षकांचे बाहू फुरफुरू लागले आहेत. आता महिनाभर मुलेच समोर नाहीत तर काय करावे, अशा प्रश्नाने शिक्षकांमध्ये निराशा दाटून येऊ  शकते (परिणामांचा विचार न करणे ही तल्लख विनोदबुद्धी असणाऱ्यांची दुसरी खोड असल्याचे यातून सिद्ध होते.) यावर उपाय म्हणून अस्मिता योजनेत बचत गटांच्या नोंदी करणे, स्वच्छतागृहे मोजणे, पाणवठे मोजणे, चित्रपटांचा प्रचार करणे, शाळा समिती सदस्यांच्या नाकदुऱ्या काढणे, गणितपेटी आदी साहित्याचा वापर करण्यास शिकवणाऱ्या बिनसाहित्याच्या प्रशिक्षण शिबिरांमध्ये वेळ सत्कारणी लावण्याचे नियोजन शिक्षकांसाठी करण्यात आले आहे.  हे सारे सर्वानाच काही तरी मिळवल्याचे समाधान देणारे आहे. मात्र नवी कल्पना आली की हाणून पडणे या फोफावलेल्या खेकडा वृत्तीचा या योजनांबाबतही धोका आहे.  त्यामुळे माणसाचे पूर्वज (किमान महाराष्ट्रीय माणसाचे) हे माकडाऐवजी खेकडे असतील का याचा अभ्यास करून सत्य मुलांपर्यंत पोहोचण्यास समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे समजते. (समितीच्या अध्यक्षपदासाठी साक्षात्कारी बाबांचा शोध सुरू आहे.)