पाठीवर पडलेल्या पानाला आभाळ समजून सैरावैरा धावत सुटलेल्या सशासारखे अवघे जग झाले आहे. लांडगा आला रे आला म्हणता म्हणता लांडगा कधी येतो, कधी येत नाही, पण त्याचे भय कायम काळजात ठेवून वावरणाऱ्या कोकरांसारखी जगाची अवस्था झाली आहे. हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे दहशत माजविणे हाच अनेकांचा जीवनमार्ग झाला आहे की काय असे वाटावे अशी सार्वत्रिक परिस्थिती आहे. परवाच्या विमान अपहरणाच्या चित्तरकथेने ही परिस्थिती धादांत दिगंबरावस्थेत आपल्यासमोर मांडली आहे. तिच्याकडे कसे पाहायचे? उलटय़ा चष्म्याने की सुलटय़ा हा प्रश्नच नाही. हे सगळे चालले आहे ते जणू एखाद्या जादूई वास्तववादाचा किंवा वैश्विक मॅट्रिक्सचाच भाग आहे. मॅट्रिक्स या त्रिचित्रधारेने भारतीय तत्त्वज्ञानातील मायावादच तर मांडला होता. आपण पाहतो, जगतो ते जग खरोखरच ‘असते’ का? म्हणजे ‘मिथ्या साचासारिखे देखिले’ अशी तर आपली गत नसते? इजिप्तच्या विमान अपहरणाच्या घटनेने नेमके असेच नाना प्रश्न समोर आले आहेत. वास्तव आणि वास्तवातीततेच्या सीमारेषेवर रेंगाळणारी ती घटनाच तशी विचित्र होती. पुन्हा म्हटली तर भयकारी, मानली तर विनोदी. एक सामान्य मध्यमवयीन गृहस्थ इजिप्तच्या विमानात बसतो. विमानाने उड्डाण केल्यावर पोटाला बांधलेला बॉम्बचा पट्टा दाखवतो. विमानाचे अपहरण करतो आणि हे सगळे कशासाठी? तर सायप्रसमध्ये राहणाऱ्या आपल्या पूर्वपत्नीला एक चिठ्ठी द्यावी यासाठी, तिच्याशी बोलण्यासाठी. आता एवढेच करायचे तर इजिप्तमध्ये टपाल खाते नाही की तेथील तमाम दूरध्वनी यंत्रे सरकारने फासावर चढविली आहेत? पण या गृहस्थाने हा अवघड नि धोक्याचा मार्ग पत्करला. बरे विमान अपहरणाचे एवढे सगळे नाटक केल्यानंतर उघड काय झाले? तर त्याच्याकडील बॉम्ब हे खोटे होते. मोबाइलची रिकामी कव्हरे आणि काही वायरींच्या साहय़ाने त्याने दहशत निर्माण केली होती. हीच कहाणी समजा एखाद्याने कादंबरीकाराने लिहिली असती तर? काय सांगावे, काफ्कानुसारी जादूई वास्तववाद मांडणारी नॉव्हेल म्हणून ती सहज खपूनही गेली असती. काफ्काच्या कथांत असेच तर काही घडत असते, की एखादा मध्यमवर्गीय कारकून एका सकाळी जागा होतो आणि पाहतो तो त्याचे एका कीटकात रूपांतर झाले आहे. आपल्या या प्रेमवीराचे रूपांतर असेच एका दहशतवाद्यात झाले आहे. हे कशामुळे घडले असावे? जो खरोखरीचा कोणत्याही रंगाचा दहशतवादी नाही तो अशा फालतू कारणासाठी विमान अपहरण करावयास कसा धजावला असेल? टाळकेफिरलेले असेल त्याचे. जसे ते एखाद्या स्थळी बॉम्ब ठेवला आहे असे खोटे फोन करून यंत्रणांची तारांबळ करणाऱ्या आणि माजलेल्या दहशतीची मौज लुटणाऱ्या माणसांचेही फिरलेले असते. प्रश्न आहे तो ही माथी फिरावीत असे वास्तव आपल्या आजूबाजूलाच निर्माण झाले आहे त्याचा. सैफ एल्दिन मुस्तफा हा अपहरणकर्ता त्या वास्तवाचाच बळी आहे. गरज आहे ती हे मॅट्रिक्स समजून घेण्याची.