माध्यमांतील पतंगबाजांना काय म्हणायचे ते म्हणून द्यात.. अर्थात त्यांच्यावर साक्षात कैचीकेसरी पहलाज निहलानी यांना आणून बसवले तरी ते म्हणायचे काय थांबणार आहेत? आताही ते म्हणतच आहेत की, मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी मंत्रिमंडळातील अनेक जींचे पंख कातरले. त्यात प्रमुख जी म्हणजे खडसेजी. खरे तर एखाद्याने आपल्याच दातांनी आपलीच नखे खावीत तशा प्रकारे खडसेजींनी आपल्याच हातांनी (काही यास कर्मानी असेही म्हणतात!) आपलेच पंख कातरले. त्यास देवेंद्रजी काय करणार? तेव्हा प्रश्न उरला अन्य दोन जींचा. त्यातील तावडेजी व मुंडेजी यांचे प्रत्येकी एकेक खाते मुख्यमंत्रीजींनी काढून घेतले. तर त्यातून बोरुबहाद्दरांनी एवढी बोंबाबोंब करायचे खरे तर काहीच कारण नाही. का की, या ठिकाणी मुख्यमंत्रीजींनी कचेरीकार्यव्यवहारकुशलतेचाच प्रत्यय आणून दिलेला आहे. आपल्या कचेरीत नाही का, वरिष्ठांना कमी काम असते. मुख्यमंत्रीजींनीही विनोदजी व पंकजाजी या वरिष्ठ मंत्र्यांवरील कार्यबाहुल्यांचे ओझे कमी केले. आता बोरुबहाद्दर म्हणतील की, पंकजाजींना कोणी सीनियॉरिटी दिली? तर मुख्यमंत्रीजींनीच ऐतवारी सकाळी केलेल्या ट्वीटातून ती बहाल केली आहे. त्याचे असे झाले, की पंकजाजी म्हणजे बाणेदारपणाची सेल्फीच. रविवारी त्यांनी सिंगापुरातून ट्वीट केले की, येथे कसल्या पाणी परिषदेस आपण आलो आहोत; पण आपल्याकडे काही आता जलसंपदा नाही. तेव्हा आपण काही तेथे जाणार नाही. बरोबरच आहे, रिकामा घडा घेऊन कोण पाणी परिषदेस जाईल? पण मुख्यमंत्रीजी त्यांना म्हणाले, की नाही नाही ताई, तुम्ही जाच. कारण तुम्ही वरिष्ठ मंत्री. आता मुख्यमंत्रीजींनी दिलेले हे वरिष्ठतेचे प्रमाणपत्र पंकजाजी त्यांच्या दालनात फ्रेम करून लावणार होत्या, तोच काही बोरुबहाद्दरांनी त्या नाराज असल्याची कंडी दिली उठवून. वस्तुत: मंत्रिमंडळ विस्तारामुळे जेथे उद्धवजीसुद्धा असंतुष्ट नाहीत, तेथे इतरांच्या नाराजीची काय बात? आणि एकदा एकदिलाने राष्ट्रहिताचे कार्य करायचे ठरविल्यावर मंत्रिमंडळात गटयुक्त शिवार ठेवून कसे चालेल? मुळात आता पक्षात गटच राहिलेले नाहीत हेच या विस्ताराने दाखवून दिले आहे. आता जामनेरी गिरीश महाजन, डोंबोलीचे रवींद्र चव्हाण वा नगरकर राम शिंदे यामुळे काही मुख्यमंत्रीजींचा गट तयार होत नसतो हे भान बोरुबहाद्दरांनी ठेवले पाहिजे; पण हे पोटावळे पत्रकार पेपरे चालविण्यासाठी अशा कंडय़ा पिकविणारच. काय तर म्हणे, मंत्रिमंडळात अनेक आरोपग्रस्त आहेत. साधी गोष्ट आहे की, हे सगळे विरोधकांचे कारस्थान असून, कमळ कोणत्याही चिखलातून आयात केलेले असले तरी ते अखेर बेदागच असते; पण या विरोधकांना आणि त्यांच्या तुकडय़ांवर जगणाऱ्या पोटावळ्या माध्यमांना हे सांगणार कोण? तेव्हा त्यांना काय म्हणायचे ते म्हणून द्या. देवेंद्रजींचा मंत्रिमंडळी ऐरावत असा बिनगटबाजीची अंबारी मिरवत ऐटीने चालणार आहे. पत्रसारमेयांना जे काही करायचे ते करू द्या..