मा. श्री. निवडणूक आयोगाचे आयुक्तसो. यांस विनंती अर्ज की सध्या गुजरातमध्ये आमदारकीची निवडणूक असून, तेथे प्रचाराचे काम जोरात सुरू आहे. या निवडणुकीला आपला आशीर्वाद असल्याचे आम्हांला माहीत आहे. म्हणून तर आम्ही हे पत्र लिहीत आहोत. साहेब, आजवर आपण निवडणुकीला चांगली मदत केली, तशी ती यापुढेही मिळत राहील अशी आशा होती. परंतु आपला ताजा निर्णय पाहून भरवशाच्या म्हशीस टोणगा झाल्यासारखेच वाटले. कारण की आपण पप्पू शब्दावर बंदी आणली. भाजपच्या लोकांनी दिवसरात्र खपून प्रचारासाठी काही सीडय़ा बनवल्या होत्या. तर त्या जाहिरातीतला पप्पूच तुम्ही काढून टाकायला सांगितला. आता त्या जाहिराती मतदार बंधुभगिनींना अगदीच पप्पू वाटल्या तर त्याला जबाबदार कोण? गेल्या काही दिवसांपासून आम्ही या जाहिरातींची आतुरतेने वाट पाहत होतो. हार्दिकची सीडी चालली तोवर काही वाटले नाही. पण त्या क्लिपा किती दिवस पुरणार? वाटले होते, की आता भाजपवाले पप्पूच्या सीडय़ा आणतील, जिथे म्हणून पडदा आहे तिथे त्या दाखवतील. चार दिवस मजेत जातील. पण कसले काय? तुम्ही त्या जाहिराती पार पुचाट करून टाकल्या. तुम्हांला कात्री लावायला बाकी एवढय़ा पिक्चरांच्या सीडय़ा पडलेल्या असताना तुम्ही हा चोंबडा उद्योग का केला? तुम्ही हे असे कात्री घेऊन पिक्चर कापाकापी करायला लागले तर सेन्सॉरवाल्यांनी उद्या स्मृती इराणीजींना कोणते तोंड दाखवायचे? निवडणूक आयोगाचे आयुक्तसाहेब, अशाने जन्तेचा लोकशाही प्रक्रियेवर विश्वास राहील का हा आमचा मुद्देसूद सवाल आहे. निवडणुका हा लोकशाहीचा आधारस्तंभ आहे. म्हणून तर माननीय नरेंद्र मोदीजीसाहेब तो आधारस्तंभ सतत भक्कम करीत बसलेले दिसतात. परवा ते परदेशात भाषण करताना दिसले, तर आमच्या एका मित्राने विचारले, की तिकडेपण निवडणूक आहे की काय? असे असताना तुम्ही निवडणुका पोकळ करण्याचे काम चालवले आहे. आता तुम्ही म्हणाल, की ते कसे? तर साहेब, तुम्हीच सांगा, आम्हाला निवडणुका का आवडतात? तर त्यातून कार्यकर्त्यांची अर्थव्यवस्था सुधारते आणि सगळ्यांत महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे साऊथचा डब पिक्चर पाह्य़ल्याचा फील येतो. मज्जा येते. टिंगलटवाळी, चिखलफेक, लाथाळ्या, दुगाण्या, शिमगा, तूतूमैंमैं हे म्हणजेच खरा निवडणूक प्रचार. आता तेही करायचे नाही? तर मग प्रचारसभेत नेत्यांनी भाषणांत काय बोलायचे? साहेब, आम्हांला प्रचार कसा पाहिजे, तर चाळीतल्या भांडणासारखा. टॅक्स वसूल झाल्यासारखे वाटले पाहिजे. हा सारा टॅक्स आम्ही मनोरंजन कर म्हणून तर भरत असतो. आता मनोरंजनच झाले नाही, तर मग आम्हांला त्याचा अन्य विचार करावा लागेल. काय?