‘परत या, परत या’ ही घोषणा कानी पडताच, सकाळी फिरायला निघालेले भुजंगराव थबकले. आवाजाच्या दिशेने बघितले तर बोरिवली शाखेचे कार्यालय दिसले. साहेब जाऊन तर बरीच वर्षे झाली, मग आता घोषणा का, या प्रश्नात ते गुरफटले असतानाच पुन्हा घोषणा सुरू झाली ‘परत या, परत या, गुजराती बांधवांनो परत या’. मागोमाग ‘पाछा आवो, पाछा आवो, गुजराती लोगो पाछा आवो’ असे ऐकल्याबरोबर त्यांना सर्व गोष्टींचा उलगडा झाला. थोडे पुढे गेल्यावर त्यांनी मागे वळून बघितले तर शाखेत जमलेले सैनिक पतंगांचे गठ्ठे व जिलबी, फाफडाचे डबे वाटत असल्याचे त्यांना दिसले. संक्रांतीला ऐकू येणाऱ्या ‘कायपो छे’च्या आरोळ्या आठवून त्यांना वाटले, आपण पक्षाच्या कामातून निवृत्ती घेतली हे बरेच झाले. जनतेची स्मरणशक्ती फारच अल्प असते यावर पक्षाचा फारच विश्वास! ‘जलेबी’ वाटणाऱ्या या सैनिकांना कुणी तरी आता तिळगुळाचे काय करणार असे विचारायला पाहिजे. पुढल्या आठवडय़ात थोरल्या किंवा धाकल्या पातीचा पतंग उडवतानाचा फोटो नक्की झळकेल.. म्हणजे यंदा वाण, हळदीकुंकवाला फाटा की काय? हे सुचताच भुजंगरावांना हसू आले. ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण अशी हाळी देणारा हा पक्ष सर्वाधिक रंग बदलणाराही आहे. मोठय़ा साहेबांची तऱ्हाच न्यारी होती. त्यांच्या मराठीच्या मुद्दय़ावर आपण पक्षाशी जोडले गेलो. कधी खस्ता तर कधी मार खात पक्ष वाढवला. नंतर धोरणांची गाडी जी घसरली ती परत कधी रुळावर आलीच नाही. मराठीची जागा हिंदुत्वाने घेतली. मग छठपूजेचा घाट काय घातला गेला, तोही कशासाठी तर घरातूनच उगवलेल्या वेगळ्या फांदीने बिहारींना झोडपणे सुरू केले म्हणून! तरीही हाती काहीच लागले नाही. मग ‘मी मुंबईकर’ मोहीम सुरू झाली. त्यातूनही ‘मी’ गवसलाच नाही. आणि आता हे गुजरातींना चुचकारणे. कारण काय तर मराठीच्या विभाजनासाठी त्या फांदीला भाजपकडून हिरवेगार ठेवण्याचा प्रयत्न होतोय म्हणून! एवढा जुना पक्ष. स्वत:ही ‘ब’ संघ म्हणूनच वावरतो व ‘ब’वाल्यांशीच स्पर्धा करतो. अरे, कधी तरी ‘अ’ व्हा ना! इतकी वर्षे भाजपसोबत राहून त्यांच्यासारखे वाढता आले नाही. मुंबईच काय पण अख्ख्या देशातले गुर्जर बांधव दिल्लीतील जोडीच्या प्रेमात आहेत. त्यांना तिथून तोडण्याचे काम एवढे सोपे वाटते की काय तुम्हाला? काय तर म्हणे भाजप नेतृत्व हटवादी, मराठीला संधी न देणारे. अशी टीका केल्यावर खरेच जवळ येतील का ते बांधव? ते पक्के व्यापारी.. भावनेच्या भरात न वाहणारे. देण्या-घेण्याच्या कृतीला महत्त्व देणारे. दिली का त्यांना कधी महत्त्वाची पदे? नाही ना! मग कशाच्या बळावर जिलेबीची भाषा करता? प्रश्नांचे मोहोळ डोक्यात घेऊन चालत असलेले भुजंगराव कांदिवली शाखेजवळ पोहोचले तर तिथून ‘आवाज कोनो’ अशी घोषणा त्यांच्या कानावर पडली. फार डोके न चालवता निष्ठेने पक्षकार्य करणाऱ्या सैनिकांचे त्यांना कौतुक वाटले. कधीकाळी आपणच दुकानांच्या गुजराती पाटय़ा फोडल्या हे या सैनिकांच्या गावीही नसेल का, या प्रश्नाला भिडत ते घरी पोहोचले. माणसे प्रेमानेच जोडता येतात. मोठे साहेब हे काम मोठय़ा खुबीने करायचे. नाही तर यांचे बघा.. आधी दिल्या झापडा व आता म्हणे फाफडा!