आपल्या देशातील तमाम लाल दिवे यंदाच्या कामगारदिनी विझले. त्या विझलेल्या लाल दिव्यांच्या खालची अनेक मंडळी, ‘सारेच (लाल) दीप कसे मंदावले आता’, असे उसासे टाकत असतील कदाचित. पण हा असा निर्णय घेणे आवश्यकच होते. का, ते आपल्या प्रधानसेवकांनी दिवे विझण्याच्या आदल्या दिवशी सांगितले. या लखलख दिव्यांचा उजेड एकसारखा डोक्यात पडल्याने अनेकांच्या डोक्यात त्यासोबत हवाही गेली होती. आम्ही बुवा व्हीआयपी, अशा भावनेने त्यांचीही छाती छप्पन्न इंची झालेली होती. ती हवा प्रधानसेवकांनी एका झटक्यात काढून टाकली ते बरेच झाले. आता आपल्या देशात ‘व्हीआयपी’ नव्हे, तर ‘ईपीआय’ संस्कृती येईल. ‘ईपीआय’ म्हणजे ‘एव्हरी पर्सन इज इंपॉर्टंट’ याचे लघुरूप. या अशा लघुरूपीकरणात, तसेच भाषेमध्ये नवनव्या शब्दांची भर टाकण्यात आपल्या प्रधानसेवकांचा हात कुणी धरू शकत नाही. तर ते एक असो. पण लाल दिवे विझल्याने देशात येऊ घातलेली ‘ईपीआय’ संस्कृती म्हणजे एक क्रांतीच आहे हे मान्य करायला हवे. या क्रांतीमुळे देशातील १२५ कोटी नागरिक समान पातळीवर आले आहेत. ‘ना छोटा कुणी, ना मोठा कुणी.. आपुल्या या देशी सारेच समगुणी’ हा या नव्या क्रांतीचा नारा आहे. काही नतद्रष्ट लोकांना नेमक्या अशा वेळी त्या जॉर्ज ऑर्वेल यांचे, ‘सारेच जण समान असतात, मात्र काही जण इतरांपेक्षा अधिक समान असतात’, हे अगदी गुळगुळीत झालेले वाक्य स्मरते. इतरांना त्याचे स्मरण करून देत हे नतद्रष्ट लोक काही जणांकडे बोट दाखवून, ‘हे इतरांपेक्षा अधिक समान आहेत’, असे म्हणतात. किती हा छिद्रान्वेषीपणा. आणि मुळात ते ज्या लोकांना ‘अधिक समान’ असलेले लोक असे म्हणतात ते कुणी ऐरेगैरे नाहीत. साक्षात गोमातेचे रक्षणकर्ते आहेत ते. म्हणजेच नीतिमूल्यांचे तारणहार आहेत ते. म्हणजेच भारतीय संस्कृतीची पुनस्र्थापना करण्यासाठी अहोरात्र झटणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत ते. त्यांच्या डोक्यावर भले नसेल लाल वा भगवा दिवा, मात्र त्यांचे कर्तृत्वतेजच इतके लखलखीत की काय विचारता. कर्तव्यपथावर निरंतर चालणाऱ्या या दिव्यजनांकडून कुठलाही प्रमाद घडणे कधीच शक्यच नाही. आता कुठेकुठे, कुणीकुणी खोडसाळपणा करून त्यांच्यावर आरोपांचे शिंतोडे उडवतात म्हणे, ते मारहाणच करतात, कधी कुणाच्या प्राणांवरही उठतात. आता जी मंडळी वत्सल व करुणानिधी अशा गोमातेचे भक्त आहेत, ते इतके हिंसक होऊच शकत नाहीत. तर ते असो. पण या कर्तृत्ववान लोकांनी अशा आरोपांमुळे स्वतच्या काळजाला घरे पाडून घेऊ नयेत. मोहम्मद अखलाक, पहलू खान किंवा आसामातले अबू हनीफा आणि रियाझुद्दीन अली ही नावे प्रधानसेवकांकडील ‘ईपीआय’ यादीत नाहीत, असे गृहीत धरून चालावे. त्यातच ‘ईपीआय’ संस्कृतीचे सौख्य सामावले आहे.