खंडणी कुणाकडून घ्यावी? खंडणी कुणाकडूनही घ्यावी. खंडणी कशासाठी घ्यावी? खंडणी कशासाठीही घ्यावी. एखाद्याला घरात ठेवायचे असेल तर त्याच्याकडून घ्यावी. एखाद्याला घरातून काढायचे असेल तर काढणाऱ्याकडून घ्यावी. एखाद्याला नोकरी मिळवून द्यायची असेल तर त्यासाठी घ्यावी. एखाद्याची नोकरी घालवायची असेल तर त्यासाठीही घ्यावी. एखाद्याला कंपनी काढायची असेल तर खंडणी त्याच्याकडून घ्यावी. एखाद्याला दुकान टाकायचे असेल तर त्याच्याकडून घ्यावी. एखाद्याला वडापावची गाडी टाकायची असेल तर त्याच्याकडून घ्यावी खंडणी, आणि खावेत वडापाव त्याच्याच गाडीवर नित्यनेमाने. एखाद्याला चायनीजची गाडी टाकायची असेल तर त्याच्याकडूनही बिनदिक्कत घ्यावी खंडणी, आणि चिनी मालास बोल लावत रोजच खाव्यात त्याच्या गाडीवर चायनीज भाताच्या मसालेदार चविष्ट थाळ्या. खंडणी आदर देण्यासाठी घ्यावी. खंडणी आवाज चढवण्यासाठी घ्यावी.. आवाज उतरवण्यासाठी घ्यावी. खंडणी भाषांसाठी घ्यावी.. माशांसाठीही घ्यावी. खंडणी अस्मितेसाठी घ्यावी. खंडणी गायकाकडून घ्यावी.. नायकाकडून घ्यावी. खंडणी पडद्यावरील चित्रांसाठी घ्यावी.. मात्र पडद्याआड घ्यावी. खंडणी वाढदिवशी रांगा लावणाऱ्या भक्तांकडून घ्यावी. आपुला हात उंचावताच बेभान होणाऱ्या बडव्यांकडून घ्यावी. खंडणी खड्डय़ांसाठी घ्यावी.. खड्डे बुजवण्यासाठी वा न बुजवण्यासाठीही घ्यावी. खंडणी निवडणुकीसाठी घ्यावी.. निवडणुकीतील अडवणुकीसाठी घ्यावी. खंडणी प्रचारासाठी घ्यावी.. अपप्रचारासाठी घ्यावी. खंडणी भांडण्यासाठी घ्यावी.. गोडीगुलाबीसाठीही घ्यावी. खंडणी मते मिळवून देण्यासाठी घ्यावी.. मते फोडण्यासाठी घ्यावी. खंडणी सत्तेसाठी घ्यावी.. बिनसत्तेसाठीही घ्यावी. एखाद्याला जगू देण्यासाठी.. मरू न देण्यासाठी घ्यावी खंडणी. पाळावेत मात्र कायदे काही, राखावीत पथ्ये काही. घेताना खंडणी पुढे करू नये हात स्वतचा. हातकामाच्या लोकांवर सोपवून कार्य स्वत: राहावे निश्चळ, निश्च्िंात. त्यांच्या हातचे आपुल्या हाती अलगद पडू द्यावे मग खंडणीदान. फडकावीत झेंडे गगनस्पर्शी स्वत:चे खंडणी घ्यावी त्यांच्या आड. सावलीत बसून झेंडय़ांच्या मोजावे खंडणीचे मोल. त्यासोबत पाळावे एक मोलाचे पथ्य. फार जपून वापरावी भाषा खंडणीयोग साधताना. ठेवावे लक्ष बारीक दुसऱ्याच्या हातांकडे. करीत राहावा सातत्याने हिशेब आपुल्यांसोबत दुसऱ्यांच्या खंडणीचाही. थोडीही दिसली दुसऱ्याची ओंजळ भरलेली किंवा वहीम जरी आला किंचित खंडणीचा, तर उठवावे रान त्याविरोधात. दुसऱ्यास मिळणारी ती खंडणी, आपुल्यास मिळणारे ते प्रेममय, सत्पात्री दान ऐसा हिशेब मांडावा आणि बिंबवावा सातत्याने जनतेच्या मनावर. आपुली खंडणी गोळा करावी ती दानपेटीत आणि त्यास लावून टाकावे कुलूप बिनहिशेबाचे. कुणी मागितलाच हिशेब तर प्रोक्षण करावे खंडणीवर किंचितसे पवित्र जल आणि करावे निरुत्तर हिशेब मागणाऱ्यास. तर, अशी घ्यावी खंडणी समस्तांकडून, दाही दिशांतून. सदैव साधावा खंडणीयोग. कारण खंडणीच आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश. त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्यातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव..