एखादी बातमी इतकी स्फूर्तिदायक, प्रेरणादायक असते की तिच्याकडे उलटय़ा चष्म्यातून पाहायचं म्हटलं तरी सरळच दिसायला लागतं सगळं. हे चमत्कारिकच; पण कधी तरी, बहुधा ८ नोव्हेंबरला वगैरे- फैज सिद्दिकीनामक नावालाच भारतीय असलेल्या ब्रिटिश माणसानं ‘तो’ चमत्कार घडवून आणण्याचा निर्णय घेतला असणार! हा निर्णय होता सरळ लंडनच्या उच्च न्यायालयात ऑक्सफर्ड विद्यापीठावर खटला भरण्याचा. नुसता खटला नव्हे- १० लाख ब्रिटिश पौंडांची नुकसानभरपाई, तीही ‘शिकवण्याची पद्धत नीरस, कंटाळवाणी होती’ याबद्दल मागणारा हा खटला आहे. सोळा वर्षांपूर्वी ऑक्सफर्डमधून आंतरराष्ट्रीय कायद्याचे पदवीधारक झालेल्या फैज सिद्दिकी यांनी याच पदवीच्या अभ्यासक्रमात, ‘आधुनिक इतिहास’- म्हणजे ब्रिटिशांच्याच वसाहतवादाचा इतिहास- हा विषय अवांतर विषय म्हणून निवडला होता. इतिहास शिकवणाऱ्या सातपैकी चार प्राध्यापक नेमके त्याच वर्षी अभ्यास-रजेवर होते. उरले प्रा. डेव्हिड वॉशब्रुक.. त्यांचं शिकवणं इतकं नीरस, की त्यामुळेच या सिद्दिकींना कमी गुण पडले. पदवी प्रमाणपत्रातला ‘दर्जा’ खालावल्यानं पुढल्या आयुष्यात नुकसानच झालं. त्यातून सिद्दिकींना सौम्य मनोविकारही जडले. सिद्दिकींनी गुदरलेला खटला मात्र अत्यंत गांभीर्यानंच लंडनच्या न्यायालयात सुरू आहे, ही बातमी स्फूर्तिदायक नाही, असं कोण म्हणेल? म्हणालंच कुणी, तर आपण एवढंच गृहीत धरायचं की ‘‘स्फूर्तिदायक’ नाही, ‘प्रेरणादायक’ म्हणा..’ असला काही तरी मराठीच्या प्राध्यापकांसारखा शब्दच्छल करायचाय या नकारात्मक लोकांना. ‘प्रेरणादायक’ तरी आहेच की नाही बातमी? एरवीच आपल्याकडले किती तरी जण प्राध्यापकांच्या आणि शिक्षकांच्या नावानं खडे फोडत असतात.. असे शिक्षक नसते, प्राध्यापकांनी नीरस- रटाळ – कंटाळवाणं शिकवण्याऐवजी विषयाची गोडी लावली असती, तर आज ‘करिअर’ नक्की पुढे गेलं असतं म्हणतात.. पण खासगीत! कोणाची टाप आहे का मराठीत शिक्षक-प्राध्यापकांच्या विरुद्ध जाहीरपणे बोलायची? संघटना किती आहेत, आहे ना माहीत? चारचारदा प्रवेशफेऱ्याच घेणारी सरकारी विधि-महाविद्यालयं, चित्रकार-शिल्पकार घडवू म्हणणाऱ्या पण प्रत्यक्षात एकाच छापाच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना कोंबू पाहणाऱ्या कलाशाळा, प्रश्न विचारू नकोस- थिअरी वाच म्हणणारे आणि महाविद्यालयापेक्षा ‘क्लासेस’ कडे लक्ष पुरवणारे विज्ञानविषयाचेही प्राध्यापक, अशा किती तरी जणांवर (जाहीरपणे काहीही न बोलता, संघटनांना गाफीलच ठेवून) खटले भरण्याची सोय असू शकते, ही त्या बातमीची प्रेरणाच की! प्रेरणेतला अडथळा एवढाच की, सध्या फक्त लंडनचंच उच्च न्यायालय असे खटले स्वीकारून जलदगतीनं चालवत आहे.