सुरपारंब्या, आटय़ापाटय़ा, असले जुने खेळ बंद करून तलाठीसाहेबांनी नवा खेळ मांडला. पूर्वी प्रशासनात खो द्यायचा खेळ सुरू असे. तसा पाठशिवणीचा प्रकारही होता. पण आता पंचनामा खेळाचे नियम बदलले आणि प्रकारही. त्यामुळे घोडदौडीचा दावा करणाऱ्या सरकारचे शिलेदार घोडय़ावर बसले. त्यांना सारे शिवार तपासायचे होते. पूर्वी कागदी घोडी नाचविणाऱ्या ‘तलाठीसाहेबांना’ आदेश आले, ‘करा खेळ सुरू’! पूर्वी एका जागी बसून पंचनाम्याचा खेळ रंगवला जायचा. आकडय़ांचा मेळ कोतवालच  पूर्ण करायचा. आता दुस्तुरखुद्द तलाठीसाहेब मैदानावर उतरणार म्हणून मोठी तयारी झाली. भाजप सरकारचे शिलेदार घोडय़ावर बसले. त्यांची तीक्ष्ण नजर कापसाच्या प्रत्येक बोंडावरुन फिरत होती. गुलाबी अळी दिसली की घोडय़ावर बसूनच त्याची ते नोंद घ्यायचे. मोठा उमदा घोडा होता तो. त्यावरुन बोंडअळीचे आकडे लिहिणे म्हणजे केवढे ते काम. पांढरे सोने ते. कापसाचे गुंजभर नुकसान होऊ नये म्हणून साहेबांनी रपेट केली. हा खेळ अलिकडे दरवर्षी खेळावाच लागतो. सरकारची घोडदौडसुद्धा या खेळाच्या वेगावर मोजली जाते म्हणे हल्ली. हे सरकार तर कमालीचे वेगवान. त्यामुळे पंचनाम्यासाठी अश्वशक्ती वापरुन मांडलेल्या आकडय़ाची मोठी चर्चा झाली. आता घोडय़ावरुन अळी दिसते का, असे आक्षेप घेणाऱ्यांना कावीळ झालेली असते. त्यांना चांगले काही दिसतच नाही. असा काय सरंजामी थाट दाखविला? तलाठी हा साहेब असतोच. त्याने रपेट मारली तर केवढा गहजब. आता गारपीट झाली, तेव्हा ज्याचे नुकसान झाले, त्याच्या हातात केवळ पाटी धरायला सांगितली.  किती नुकसान झाले आणि कोण माणूस याचे छायाचित्र उपग्रह काढतो. सगळे कसे ऑनलाईन झाले पाहिजे. खाक्याच तो सरकारचा. त्यामुळे शेतकऱ्याचे नाव आणि त्याचे झालेले नुकसान अशी पाटी धरायला सांगितली हातात. काय बिघडले?, मग आम्ही लगेच सरंजामदार काय? आता दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा, उमरगा या भागातले शेतकरी पिकवणार किती, खाणार काय आणि त्यांचे नुकसान तरी असे कितीसे असेल. दोनच तर आकडे लिहिले होते पाटीवर. आता सरकारला नुकसानीचा अभ्यास करायचा म्हटल्यावर तयारी तर करावीच लागणार. त्यात हे सरकार पारदर्शकतेचे. त्यांना कसे नुकसानग्रस्तांचे चेहरेही पहावे लागतात. गारपीट झाली म्हणजे चेहरे सुकून जातात. गारठून गेलेल्या व्यक्तींचे चेहरे नीट दिसावेत आणि त्यांचे नाव सरकारच्या लक्षात यावे असे वागणे गैर कसे ठरवता? एवढे सारे पिकवायचे, कमी भावात विकायचे. मग फास जवळ करायचा, या सगळया चुका करणाऱ्याच्या हातात पाटीच तर दिली. चूक  कशी म्हणता येईल. नुकसानभरपाई पाहिजे असेल तर थोडा वेळ पाटी धरली म्हणजे काय होते? कर्जमाफीत नाही का बायकोसह अर्ज भरले. लांबच लांब रांगा लावल्या. तसेच  आहे हे. पण भलता बाऊ करतात राव पंचनाम्याचा. हा खेळ पूर्वी कसा कोठे झाला कोठे नाही हे कळतसुद्धा नव्हता. आता किमान खानेसुमारी करताना तरी आम्ही तलाठी गावात जातो. हे काय कमी आहे का, पण चांगले काही बघायचेच नाही.