अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण का करण्यात आले नाही? ते करायचे नव्हते, तर त्या सभेचा माहितीपट का बनविण्यात आला नाही? आता साधारणत: पाडव्यापासून गावोगावी यात्रा-जत्रांचा हंगाम सुरू होईल. असा माहितीपट बनवला असता, तर तेथे तंबूंमध्ये तो प्रदर्शित करता आला असता. त्यास लोकांनी कनातफाड गर्दी केली असती. त्यातून सरकारला एवढा करमणूक कर मिळाला असता की, त्यापुढे महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्याकडील १३ लाखांची देय रक्कम म्हणजे कोण्या झाडाची पत्ती! आपले धडाडीचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे हे गेल्या काही दिवसांत विपश्यनेत गेले आहेत की काय, अशी शंका या निमित्ताने आम्हांस येत आहे. याचे कारण म्हणजे गेल्या काही दिवसांत त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक पातळीवर कोणतीही नवीन घोषणा केलेली नाही. यापुढे चित्रपट महामंडळाच्या सभांचा चित्तचक्षुप्रक्षोभक थरारपट सह्य़ाद्री वाहिनीवरून दाखविला जाईल, अशी घोषणा करून त्यांनी बहुदिसांचा घोषणा उपास सोडावा. त्या सभेत जे घडले ते सारांशाने बातम्यांतून आले असले, तरी त्यातील संवादबाजी, नाटय़मयता, थरार, ती ढिश्शूम ढिश्शूम, मग धावून येणारे पोलीस याचे छायांकन त्या नीरस बातम्यांतून होणे शक्यच नव्हते. ती सभा म्हणजे अक्षरश: कौटुंबिक जिव्हाळ्याचा, सामाजिक, राजकीय (आणि अर्थातच आर्थिक!) असा मारधाडपटच म्हणावा लागेल. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यात मराठी प्रेक्षकांना मन:पूर्वक भावणारा, असा ग्रामीण विरुद्ध शहरी असा वादही होता. कोल्हापूर, मुंबई, पुणे अशा तीन शहरांच्या अस्मितांचा तो संघर्षपट होता. या संघर्षांतून मध्यंतरी महामंडळाचे त्रिभाजन करावे आणि प्रत्येक शहरातील कार्यालयात एकेका अध्यक्षाला बसवावे, अशी आयडियाची कल्पना आली होती. पण ती काही मूर्त झाली नाही आणि विजयभाऊ पाटकर यांच्या एकटय़ाकडे अध्यक्षपद आले. पण ते पडले मुंबईकर. कोल्हापूरकरांनी त्यांना किती काळ सहन करायचे. त्यामुळे सुर्वे या मुंबईगटकराच्या आर्थिक घोटाळ्याआडून त्यांनी थेट पाटकरांवरच नेम साधला. त्यातून गदारोळ झाला. थोडे धक्काबुक्कीचे सीनही येऊन गेले. क्लायमॅक्सच्या सीनला पाटकर, अलकाताई कुबल, सुर्वे आदी मंडळींना एका खोलीत कोंडून घ्यावे लागले. त्यानंतर हळूहळू ‘समाप्त’ची पाटी पडली. तर या सगळ्या दिग्दर्शक- कोल्हापूरकर, सहायक दिग्दर्शक- पुणेकर असलेल्या आणि तिन्ही शहरांतील कलाकारांच्या अभिनयाने नटलेल्या चित्तरखेळाची निर्मिती झाली ती कशासाठी, असा प्रश्न अनेकांच्या मनी येथवर आला असेल. तर त्याचे उत्तर साधे आहे. या सगळ्या मंडळींना मराठी चित्रपटसृष्टीची सेवा करायची आहे. त्यातील अनेकांना ही चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षक धड सेवाही करू देत नाहीत. तेव्हा त्यांनी सेवेचा दुसरा मार्ग धरला. महामंडळाच्या सत्तेचा. आता त्या मार्गाची टोलवसुली आपल्याच हाती असावी, असे कोणास वाटले तर त्यात काय वाईट?