आम्ही डोंबिवलीकर तर कायमच त्यांच्या पाठीशी उभे राहिलो होतो.. आता तर, काश्मीरची समस्या सोडविण्यासाठी त्यांनी पावलेही टाकली आणि आमचे मत वाया जात नाही या भावनेने आमचा ऊरही भरून आला. आज देशात सगळीकडे उत्साहाला उधाण आल्याच्या बातम्या आम्हास पाहावयास आणि ऐकावयासही मिळत आहेत. वर्षांनुवर्षे उराशी बाळगलेल्या स्वप्नपूर्तीचा क्षण उत्साहात साजरा होत असताना, अंगणातल्या गुडघाभर पाण्यात प्लास्टिकच्या खुर्च्या टाकून अर्धाअर्धा चहा चाखण्याची वेळ आमच्यावर येणे हा आमच्या दैवाचा दुर्विलास नव्हे काय?. या आनंदाच्या क्षणी, आपणही या उधाणात झोकून देऊन उत्सव साजरा करावा, असे वाटणे हा तर आमचा पहिला हक्क आहे, पण आमचा नाइलाज आहे. अंगणात आणि घरांमध्येही गुडघाभर पाणी साचले आहे. ‘नाचता येईना’ अशीच आमची स्थिती झाली आहे. हातावर हात घेऊन पाण्यात बसून राहण्यापलीकडे आम्ही काहीही करू शकत नाही, त्यामुळे आनंदापासून आम्ही मात्र आज पारखेच राहिलो आहोत. सत्तर वर्षे लोंबकळत राहिलेला काश्मीरचा प्रश्न मोदी-शहांनी सोडविल्यामुळे आता तरी आमच्याही समस्यांकडे लक्ष जाईल व त्या सुटतील अशी आशा आम्हा डोंबिवलीकरांमध्ये दुणावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने डोंबिवलीची पार दैना उडविली आहे. विकासाची रूपे म्हणून गावाबाहेरच काही अंतरावर उभ्या राहिलेल्या आलिशान इमारती खुणावू लागल्यावर अनेक जणांनी तेथे आपली बिऱ्हाडे हलविली आणि आज, वरच्या मजल्यांवरून जमिनीवरचा हाहाकार न्याहाळण्याची वेळ त्यांच्यावर आली. चहूकडे साचलेल्या पाण्यात अधूनमधून डोकावणाऱ्या मोटारींच्या अस्तित्वाचा खुणांनी आम्हाला विकासाच्या चटक्यांची पुरती जाणीव झालीच, पण या ‘महा-जलादेशा’चा एक धडाही मिळाला. आमच्या विकासाच्या संकल्पना मूलभूत आहेत. आम्हाला चांगले रस्ते हवेत, मुंबईला जाण्या-येण्याकरिता असलेल्या लोकल गाडय़ांमध्ये किमान पावलापुरती हक्काची जागा मिळाली पाहिजे आणि पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळाले पाहिजे, या आमच्या अपेक्षा आहेत. आज तर, चहूकडे पसरलेल्या पाण्यातून पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा शोध घेण्याची वेळ डोंबिवलीकरांवर ओढवली आहे. काश्मीरचा प्रश्न ज्या तडफेने मोदी-शहा यांनी सोडविला, तसाच निर्णय घेऊन डोंबिवली-कल्याणच्या प्रश्नांचीही एक दिवस तड लागून जाऊ दे, अशी आम्हा डोंबिवलीकरांची फडणवीस-पाटील यांच्याकडे मागणी आहे. आता मोटारी आणि स्कूटरबरोबर एकएक होडीदेखील घरोघरी असावी असेही आम्हाला वाटू लागले असून, होडय़ा पार्किंगसाठी इमारतीच्या आवारात सुविधा देण्याची सक्ती बिल्डरांवर करावी अशीही आमची माफक अपेक्षा आहे. काल रविवार म्हणून किती तरी नातेवाईकांकडे जाण्याची इच्छा असूनही ते शक्य झालेच नाही. होडय़ांची कमतरता हे त्याचे कारण! पुढच्या पावसाळ्याआधी ती सुविधा उपलब्ध झाली, तर योग्य हाती सत्ता देण्याच्या आमच्या कृतीचे सोने झाले असेच आम्ही समजू.. आज काश्मीर समस्यामुक्तीकडे वाटचाल करू लागल्यामुळे उद्या कधी तरी डोंबिवलीकरांनाही समस्यामुक्तीचा मार्ग मिळेल अशी आमची खात्री आहे.. जलशुद्धीकरण केंद्रे पाण्याखाली गेल्याने आज आम्हास पिण्याचे पाणी मिळाले नसले, तरी आमच्या तोंडचे पाणी पळालेले नाही. काश्मीर झाले, आता तरी डोंबिवलीचा प्रश्न हाती घ्या, एवढीच विनंती!