News Flash

दारुण आणि दाहक..

आपल्या सुखाचे माप जिथे भरेल अशा जागी जाऊन राहण्यास प्रत्येकासच आवडत असते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

तर मित्रों, परप्रांतीय आणि भूमिपुत्र यांच्यातील जगण्याच्या हक्कांचा कितीही संघर्ष जागोजागी सुरू असला, तरी सुखाने जगण्याचा हक्क प्रत्येकासच असल्याने, आपल्या सुखाचे माप जिथे भरेल अशा जागी जाऊन राहण्यास प्रत्येकासच आवडत असते.  यात काहीच गैर नाही. मुंबईत किंवा महाराष्ट्रात मिळणाऱ्या सुखसुविधा जागोजागी मिळू लागल्या, तर स्थलांतराची वेळच कुणावर येणार नाही, हे खरे आहे. पण तसे शक्य नाही हे एक दारुण वास्तव आहे. अनेकजण दु:खे विसरण्यासाठी, तर काहीजण अधिक सुख मिळविण्यासाठी, ज्या काही सुखसंकल्पनांची स्वप्ने पाहात असतात, त्यामध्ये दारू हे एक असेच, दारुण वास्तव आहे. दारूमुळे संसाराचा सत्यानाश होतो, घरेदारे उद्ध्वस्त होतात, गरिबी अधिक वाढते आणि आरोग्यही बिघडते असे समजणारा एक वर्ग या दारुण वास्तवाच्या वाटेलाही जात नसल्याने, दारू असली किंवा नसली तरी त्याला त्याचा काहीच फरक पडत नाही. पण ती नसली तरीही फरक पडणारा एक मोठा वर्ग समाजात आहे, हेही वास्तव आहे. न्यायालयाच्या आदेशामुळे हमरस्त्यांवरील दारूच्या दुकानांना टाळे लागल्यावर राज्याच्या अर्थव्यवस्थेला जबर हादरा बसला. त्यातच, पेट्रोलवरील करात सवलत दिल्याने तर राज्यकर्त्यांची झोपच उडून गेली. दारूमुळे संसारांची धूळधाण होत असली, माणसाला आपला तोल सावरता येत नसला, तरी तिजोरीचा गाडा मात्र दारूच्या जोरावरच व्यवस्थित तोल सांभाळतो हे सत्य महाराष्ट्रास उशिरा का होईना, उमगले आहे.  हमरस्त्यावरील दारूबंदी आणि पेट्रोलवरील करमाफीमुळे कोलमडलेला डोलारा सावरण्यासाठी दारूचाच आधार घ्यावा लागेल, हे दारुण वास्तव महाराष्ट्रास उमगले आणि ‘घरपोच दारू’ची व्यवस्था करण्याचा विचार राज्य सरकार करू लागले. आता ज्यांना दारू हे आपल्या सुखसमाधानाचे निधान आहे असे वाटते, त्यांना दिवसाच्या कोणत्याही वेळी, घरपोच दारू मिळावी अशी व्यवस्था महाराष्ट्राचे भाजप सरकार करणार आहे. राज्याच्या खंगलेल्या तिजोरीला एव्हाना सरकारचा हा निर्णय कळला असेल, तर केवळ अशक्तपणामुळे झोकांडय़ा खाण्याची वेळ आलेली तिजोरी या बातमीमुळेदेखील ताजीतवानी झाली असेल. पण एवढय़ावरून सत्ताधीश भाजपच्या समजूतदारपणाची स्तुती करण्यात अर्थ नाही. महाराष्ट्राला दारू सावरणार असेल, तर तिकडे निवडणुकांच्या तोंडावर तेलंगणातील भाजपला मात्र, दारूच्या दुष्परिणामांच्या चिंतेने ग्रासले आहे. उद्या तिकडे भाजपची सत्ता आलीच, तर संध्याकाळी सातनंतर दारूविक्री पूर्ण बंद करण्याचे आणि आठवडाअखेरीच्या दिवशी पूर्ण दिवस दारूबंदी करण्याची घोषणा भाजपने केली आहे. तिजोरीला बसणाऱ्या फटक्यांची आम्हाला चिंता नाही, तर दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतात हे अधिक चिंतेचे आहे, असे तेथील भाजपचे नेते म्हणतात. महाराष्ट्र असो किंवा तेलंगणा असो.. भाजप श्रेष्ठींना दोन्ही राज्यांतील पक्षाच्या भूमिका रास्त वाटतात आणि त्यांच्या त्यांच्या भूमिकांनुसार निर्णय घेण्याची मुभा श्रेष्ठींकडून मिळते, हे या पक्षाचे वेगळेपण म्हटले पाहिजे. तर मित्रहो, सुखाच्या संकल्पनेत दारूचा समावेश असलेल्यांनी कोठे राहावे? घरपोच दारू मिळणाऱ्या महाराष्ट्रात, की दारूबंदीच्या दिशेने जाणाऱ्या तेलंगणात?

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 15, 2018 3:04 am

Web Title: free home delivery alcohol
Next Stories
1 गुरुजी, गण्या आणि सहकार..
2 दुष्काळाशी दोन हात!
3 सर्वात पुढे आहे..
Just Now!
X