एक होतं आटपाट नगर. सगळे जण त्याला राष्ट्रीय राजधानी असंही म्हणायचे. ती नगरी छोटय़ा राजाच्या ताब्यात. मात्र, त्या नगरीसह सभोवतालच्या विशाल साम्राज्यावर मोठय़ा राजाची जरब. मागे एकदा मोठा फड लागला होता. मोठय़ा राज्याकडे धनदौलत, ऐश्वर्य सर्व काही ओसंडून वाहत होतं. पण छोटय़ा राजानं त्याला अशी काय मात दिली की.. १५ हजार सीसीटीव्ही बसवितो, मोफत वाय-फाय देतो, पाणीही मोफत देतो अन् वीज बिल निम्म्यानं कमी करतो.. या भाषेवर आटपाट नगरी भाळली आणि बघता बघता तिनं मोठय़ा राजाला डच्चू दिला. तेव्हापासून या मोठय़ा राजाच्या डोक्यात छोटा राजा बसलेला. खाऊ की गिळू, असंच रागानं टकामका त्याच्याकडे बघायचा. पण छोटा राजादेखील तसाच. उठता बसता मोठय़ा राजाच्या नावानं शिमग्याला सदैव तयार. मोठा राजा स्वत बोलायचा नाही; पण नुसता इशारा केला की त्याचे भालदार-चोपदार छोटय़ा राजावर तुटून पडायचे. त्याच्या शिलेदारांना तर या ना त्या आरोपाखाली तुरुंगातच टाकायचे मग राज्य सोडून सगळे नळावर भांडत बसायचे. रयत बिच्चारी. कंटाळली. अच्छे दिन तर नाहीच अन् मोफत वाय-फाय नाही, सीसीटीव्ही नाही, मोफत पाणी नाही. मग जायचं कुठं? मोठय़ा राजाकडे जायची सोय नाही. छोटय़ा राजाकडे जाता यायचं, पण त्याचं बोट सदैव मोठय़ा राजाकडे. अखेर आभाळातल्या पर्जन्यराजानंच दोघाही राजांना दणका दिला.. आटपाट नगरातल्या तीन्ही महापालिकांवर मोठय़ा राजाच्या पक्षाची सत्ता आहे.. अगदी छोटय़ा राजाचं नावही कुणाला माहीत नव्हतं, तेव्हापासून!  पण त्या महापालिकांच्या राजवटीत कधीही पडला नव्हता, असा पाऊस छोटय़ा राजाकडे राज्याचा कारभार येताच दीड वर्षांनं कोसळला.  जिकडे तिकडे पाणीच पाणी. रयत बेहाल. रस्त्यांवरून चाललोय की नदीमध्ये तरंगत असल्याच्या भासामध्ये ती बुडून गेलेली.. या आकाशकंपानं छोटय़ा राजाला वाटलं काही तरी काळंबेरं दिसतंय. मला बुडवून मारण्याचा मोठय़ा राजाचा डाव दिसतोय. त्याने  टाहो फोडला. मला काम करू देत नाही, माझा जीव घेईल.. असे काही तो बोलत होता. शेवटी रयतेला दया आली. छोटय़ा राजाची अवस्था तिला पाहवेना. शेवटी ती स्वतहूनच छोटय़ा राजाकडे आली अन् म्हणाली.. आम्हाला मोफत वाय-फाय नको..१५ हजार सीसीटीव्ही नको.. मोफत पाणीही नको.. जमलं तर फक्त १५०० होडय़ा द्या.. होडीत बसून ऐटीत शहर पाहू. इंडिया गेटवर जाऊ, राजपथवर जलविहार करू, मोठय़ा राजाचा महाल पाहू, तुम्ही आमच्यासाठी केलेल्या कामांना पाहू.. तुम्ही त्याची जाहिरात देशोदेशी करू शकाल. त्यासाठी कोटय़वधी रुपये उधळू शकाल..  मग रयत गेली मोठय़ा राजाकडे.. तिथंही रयतेनं मागणी केलीच : जमलं तर आटपाट नगरीचं नाव बदला. स्वतला गुरुग्राम म्हणत गुरगाव नाही का झालं आधुनिक शहर? राष्ट्रीय राजधानी असं काही बोजड म्हणण्यापेक्षा राष्ट्रीय जलशहर असं नाव पक्कं शोभेल.. आवडलं तर नाव जरूर बदला. विकास करण्यापेक्षा नावं बदलणं सोप्पं आहेच!