कोण म्हणतो या देशात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत आहे? येथे खुलेपणाने काही बोलण्याची सोय उरलेली नाही, आपले विचार मोकळेपणाने मांडण्याचे स्वातंत्र्य राहिलेले नाही, आणि विचार ऐकून घेण्याची समाजाची सहनशीलताही संपुष्टात येत असल्याने सहिष्णुतेचा अस्त होत चालला आहे, असे मानणाऱ्यांनी जरा पुण्याच्या बालेवाडीकडे पाहायला हवे. वक्तृत्व हा वस्तुत: क्रीडाप्रकार नाही. त्यामध्ये जिभेखेरीज काही वेळा मेंदूचा वापर करावा लागतो हे खरे असले, तरी वक्तृत्वाचा मेंदूशी संबंध असलाच पाहिजे असेही नाही. भाषणे झोडण्याच्या या खेळासाठी मैदान किंवा आखाडाच असावयास हवा, असेही नाही. एक माईक आणि एखादा मंच आणि समोर माणसांचा समुदाय, एवढे साहित्यही पुरेसे असते. त्यासाठी जागादेखील फारशी लागत नाही. असे असूनही, एखाद्या भव्य क्रीडागारात जेव्हा वक्तृत्वाचा खेळ सोसण्याची वेळ येते, (हो, सोसण्याचीच.. कारण प्रत्येक वक्ता जे काही बोलतो आपल्या कर्णसंपुटात साठवून ठेवावे एवढे मौलिक असतेच असे नाही) आणि हा वक्तृत्वाचा खेळ केवळ बंदिस्त अवस्थेमुळे याचि डोळा पाहावाच लागतो, तेव्हा काय अवस्था होत असेल, ते त्याचा अनुभव घेतल्याखेरीज समजणार नाही. तर, पुण्याच्या बालेवाडीतील क्रीडागारात असा वक्तृत्वाचा एक खेळ भलताच रंगला आणि मुख्य समारंभ कोणता या संभ्रमात श्रोते सापडले. त्यांना श्रोते असेच म्हणावयास हवे.. मुळात ते प्रेक्षक होते, आपल्या आवडीचा क्रीडाप्रकार पाहावयास, त्याचा आनंद लुटण्यास ते जमले होते, पण ‘पाहण्या’ऐवजी, तेथे जे काही सुरू होते, ते ‘ऐकावे’ लागले. तसेही मध्यरात्रीच्या स्वातंत्र्याचे आपणास फारसे वावडे वाटणार नाही. भारतास स्वातंत्र्य मिळाले तो मुहूर्तही मध्यरात्रीचाच होता, असे सांगतात. त्यामुळे बालेवाडीच्या क्रीडागारात रंगलेला सोहळा हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा, म्हणजे मध्यरात्रीच्याच स्वातंत्र्याचा असल्याने, त्याचे वेगळेपण उठून दिसते. भारत श्री नावाच्या शरीरसौष्ठव स्पर्धेच्या निमित्ताने बालेवाडीच्या त्या क्रीडागारात जमलेल्या हजारो क्रीडाप्रेमींवर भाषणांचा मारा करून त्यांची तहानभूक मारून टाकण्याचा एक भीषण खेळ त्या क्रीडागारात खेळताना, जबडय़ात पकडलेल्या उंदरास मारण्यापूर्वी त्याच्याशी खेळणाऱ्या मांजरास होणाऱ्या आनंदाची अनुभूती त्यांना मिळत असावी. खेळ हा एक शारीरिक व्यायामाचा प्रकार असला तरी त्यातून एक मानसिक आनंदही मिळतच असतो. त्यामुळे, ज्यातून मानसिक आनंदाची अनुभूती मिळते, असा कोणताही प्रकार हा क्रीडाप्रकार मानला, तर त्या मध्यरात्री आभारप्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक वक्त्यांनी आपल्या जिभांना व्यायाम देत अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आगळा आयाम अनुभवला, त्यामुळे तोदेखील एक क्रीडाप्रकारच म्हटला पाहिजे. बालेवाडी क्रीडागारातील शरीरसौष्ठव स्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना अनपेक्षितपणे कर्णसुखाचा अनोखा आनंद मिळाल्याने, खरे तर साऱ्या प्रेक्षकांची तहानभूक हरपली होती. वक्तृत्वाचे अमोघ मोती कर्णसंपुटात साठविताना मध्यरात्र कधी उलटून गेली, पहाटेचे अडीच कधी वाजले आणि आपण ‘प्रेक्षका’चे ‘श्रोते’ कधी होऊन गेलो, हेच त्यांच्या लक्षातही आले नाही. अशा तहानभूक हरपलेल्या अवस्थेत श्रोते असताना, माध्यमांनी मात्र खोडसाळपणाच केला. कार्यक्रम संपल्यावर श्रोत्यांना आपल्या तहानेची जाणीव झाली हे वास्तव असताना, कार्यक्रम लांबल्याने त्यांना पाणीदेखील मिळाले नाही, अशा बातम्या दिल्या गेल्या. पण आयोजकांनी अशा बातम्यांकडे लक्ष देऊ नये. त्यांनी एकाच वेळी दोन कामे केली आहेत. मुख्य म्हणजे, अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आगळा आविष्कार घडवून त्यांनी सध्या असहिष्णुतेच्या नावाने गळा काढणाऱ्यांना चोख उत्तर दिले आहे, हे महत्त्वाचे!