नायजेल गेला. आला होता तसाच.. अगदी एकटा. एक घरटे होते त्याचे. इटुकले. प्रेयसीसाठी बांधलेले. तेही सुटले आता. पण खरे तर ती प्रेयसीही त्याची कधीच नव्हती. सिमेन्ट काँक्रीटची बनलेली होती ती. कवितेत सांगायचे तर पत्थर के सनमच ती.  तिच्या दगडी डोळ्यांतून अश्रूच्या एका टिपूसाचीही अपेक्षा करणे चूकच. पण जग मात्र हळहळले त्या एकल्या प्रेमवीराच्या मृत्यूने. न्यूझीलंडच्या त्या माना बेटावर तर दुखवटा पाळण्यात आला त्याचा. तो शोक नायजेलच्या निधनाचा होताच, पण त्याहून अधिक त्याच्या एकलेपणाबद्दलचा होता. त्या बेटावर गेल्या कित्येक वर्षांपासून तो एकटाच तर पक्षी होता. होय, नायजेल हा पक्षी होता. समुद्री कावळ्याच्या कुळातला. पांढरा रंग, पिवळसर मान, काळे डोळे, बदकासारखी लांब चोच. मोठय़ा बदकासारखा.. गॅनेट म्हणतात त्याला. माना बेटवासीयांनी आपल्याकडे हे गॅनेट पक्षी यावेत म्हणून किती तरी प्रयत्न केले. पण हे पक्षीही असे विचित्र की आपले जातबांधव राहात असतात आधीपासून तेथेच उतरतात ते. तेव्हा मानामधल्या पक्षीमित्रांनी सिमेन्ट काँक्रीटचे समुद्री काक तयार करून घेतले. हुबेहूब. बेटावर ठिकठिकाणी ते पुतळे ठेवले. ते पाहून तरी एखादा समुद्री काक उतरेल ही आशा. २०१३ मध्ये ती पूर्ण झाली. एके दिवशी निळ्या आकाशातून हा समुद्री काक – नायजेल – तेथे उतरला. अख्ख्या बेटावरचा हा एकमेव समुद्री काक. वेडाच होता तो काहीसा. तेथील एका पुतळ्याच्या, खरे तर पुतळीच्या प्रेमात पडला. तासन् तास तिच्याभोवती पिंगा घालायचा. गुलुगुलु बोलायचा. तिचे पंख सावरायचा. तिच्याकडून प्रतिसाद कसा येणार? पण त्याला त्याची पर्वा नव्हती. खरे प्रेम हे असे देवाणघेवाणीच्या तत्त्वावर चालत नसते. तिच्यासाठी त्याने एक घरटेही बांधले होते. कधी तरी तिच्याकडून प्रेमाची साद येईल या आशेवर गेली चार-पाच वर्षे त्याने काढली . साधनाच होती ती प्रेमाची.

भोवती सारे सिमेन्ट काँक्रीटचे पुतळे. ना संवेदना, ना भावना. ते पुतळे बोलायचे तसे. आत ध्वनिक्षेपक बसविले होते. त्यातून आवाज येई. पण कृत्रिमच तो. दुसऱ्याच कोणाची तरी बोली ती. बोलायचे ते. त्या गोड हाकांनी, घोषध्वनींनी नायजेल फसत राहिला. आज ना उद्या आपले नशीब उजाडेल, आपल्याही जीवनात चंद्र उगवेल असे वाटत असावे त्याला. कदाचित असेही वाटत असेल की, आपण जरा जास्तच अपेक्षा करतोय आयुष्यापासून. बाजूचे सगळे पुतळे तर कसे गपगार आहेत. एका सुरात, एका तालात बोलताहेत. आपापल्या जागी उभे आहेत. पुतळ्यासारखे. ते कुठे काही मागताहेत आयुष्याकडून? नायजेल हळूहळू हरत चालला होता. पुतळ्यांच्या जगात एकटेच कोणी जिवंत असले, की असेच होते. थकतो तो. काही जण तरीही लढत राहतात. त्यांना वाटते या पुतळ्यांना वाचा फुटेल. तेही बोलू लागतील. पण तसे होत नसते. पुतळ्यांच्या जगात आवाज येतो तो ध्वनिक्षेपकांचा. कोणी तरी आधीच मुद्रित करून भरवलेला. अशा आवाजांनी एकटेपण अधिकच गडद होत असते नायजेलसारख्यांचे. कदाचित त्यातूनच त्याने प्राण सोडले असतील. तरुवरावरून पान गळावे तसा तो काक अकेला गळून पडला मृत्यूच्या खाईत.

पुतळ्यावर प्रेम केल्याचे प्रायश्चित्त घेतले त्याने की पुतळ्यांच्या जगातल्या एकटेपणाला कंटाळून जीव सोडला त्याने? कसे कळणार? बालकवी, सानेगुरुजी यांच्यासारखे काही हंस अकेले गेले तेव्हा तरी कुठे काय कळले होते आपल्याला?