X

पैल तो गे काऊ..

माणूस हा या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे

माणूस हा या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, आणि देशोदेशीच्या माणसांची त्याच्या स्थळकाळानुसार स्वभाववैशिष्टय़े असतात, हे वास्तव आता तमाम जीवसृष्टीने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच, माणसाच्या वागण्याचालण्यावर, त्याच्या सवयींवर आणि हालचालींवर प्राणिसृष्टीतील मानवेतरांचे लक्ष लागून राहिले असावे. माणसाप्रमाणेच, प्राण्यांमध्येही संशोधनाची प्रवृत्ती असली पाहिजे, आणि त्यातून नवनवे धडे घेऊन ते आपल्या जीवनशैलीतही बदल घडवून आणत असले पाहिजेत. माणसाच्या दृष्टीने अलीकडे हा संशोधनाचा नवा विषय झाला असून माणसाच्या सहवासात राहणारे पक्षी-प्राणी माणसाचे अनुकरण करून माणसाची जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असावेत या समजुतीस एका बातमीमुळे बळकटी मिळू लागली आहे.

फ्रान्सच्या पश्चिमेकडील एका शहरातील बगीचामध्ये संध्याकाळच्या वेळी अनेक लोक विरंगुळ्याचा वेळ घालविण्यासाठी येतात, आणि साहजिकच, सोबत खाद्यपदार्थ आणतात. खाऊन झाले की कागदी वेष्टने तिथेच टाकून देतात. याच  माणसांना परिसर मात्र स्वच्छच हवा असल्याने, तेथे स्वच्छता राखण्याची व कचरा उचलण्याची कायमस्वरूपी खर्चिक यंत्रणा  पोसावी लागते. यावर बगीच्याच्या अधिकाऱ्यांनी एक युक्ती केली, आणि कुठून तरी सहा कावळे स्वच्छ बगीचा मोहिमेसाठी निवडले. या सहा कावळ्यांना कचरा उचलून बाजूच्या कचरापेटीत टाकण्याचे खास प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण मिळूनही हे कावळे मनासारखे काम करीत नसल्याचे लक्षात आल्यावर, कामाच्या मोबदल्यात दाम देण्याची कल्पना एकास सुचली आणि उचलून कचरापेटीत टाकलेल्या प्रत्येक नगासाठी एक पावाचा तुकडा देण्याचे ठरले. मग कावळे जोमाने कामाला लागले. काही कावळ्यांनी लबाडी सुरू केली. एकमेकांच्या पेटीतील कचरा उचलून आपल्या पेटीत आणून ठेवण्याची शक्कल त्यांनी लढविली. मग काही गरीब कावळे उपाशी राहू लागले, तर काही कावळे कमी श्रमात जास्त खाऊ  मिळवून गलेलठ्ठ होऊ  लागले. कर्मचाऱ्यांना ही लबाडी समजली, पण त्याचे त्यांना काही विशेष वाटले नाही. आता कावळ्यांची ही लबाडी पाहण्यासाठी माणसांची मोठी गर्दी त्या बगिच्यातच होऊ  लागली आहे, असेही समजते. माणसाला धन्य वाटावे, अशीच ही गोष्ट.. ही बातमी जगभरातल्या काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर व्हायरल झाली. दाम मिळत नसेल तर काम होणार नाही, असा रोखठोक हिशेब करणारा आणि दुसऱ्या कावळ्याचे काम आपल्या नावावर खपवून कमी श्रमात जास्त खाद्य मिळविणारा हा कावळा मूळचा कोणत्या देशातला असावा याचा शोध घेण्याची गरज आहे. अफाट निरीक्षणशक्ती असलेला कावळा नावाचा पक्षी माणसाच्या सहवासात वावरत असतो, त्यामुळे फ्रान्सच्या बगिच्यातील प्रशिक्षित कावळ्याने ही शक्कल कोणत्या माणसाकडून उचलली, याचा शोध घेतला पाहिजे, असे काही जणांना वाटू लागल्याचे समजते. फ्रान्समधील हा कावळा आपल्याकडे अधिक लवकर रुळण्याची शक्यता असून सध्या सुरू असलेल्या कंत्राटी पद्धतीत अधिक उपयुक्त ठरू शकतो. कामाच्या मोबदल्यात कावळ्यांना पावाचे तुकडे खाऊ  घालण्यात काहीच गैर नाही. तसेही, या कावळ्यांपैकी काही कावळ्यांनी आपल्या कचरापेटय़ा भरण्यासाठी दुसऱ्या कावळ्याच्या पेटीतील कचरा आपल्या पेटीत आणून पावाचा जादा मोबदला लाटला, तरी ते पाहण्यासाठी गर्दी करावी, असे आपल्याला वाटणारही नाही.

कावळा हा माणसाच्या सर्वाधिक सहवासात राहणारा पक्षी आहे आणि त्याची निरीक्षणशक्ती अफाट आहे, एवढे आतापर्यंतच्या संशोधनातून स्पष्ट झालेलेच आहे..