चार-पाच र्वष झाली. साहेबांना बरं वाटत नव्हतं. कुठे तरी एक वेदना कमालीची ठुसठुसत होती. सुरुवातीला त्यांनी खूप सहन केलं. पण दुखणं वाढतच होतं. आणि घुसमट सुरू होती. पण नेमकं दुखतंय कुठं हेही कळत नव्हतं. कुणी तरी अनुभवी वैद्याकडून मात्रा घेतल्याशिवाय दुखरी जागा सापडणार नाही, असं कुणी तरी कानात सांगितलं, आणि साहेब राजी झाले. तिकडे वैद्य वाटच पाहात होते. घरचाच वैद्य असल्याने साहेबांच्या दुखण्याची नेमकी कल्पना त्यांना होती. आपल्यालाच त्यांच्यावर इलाज करावा लागणार हेही त्यांना माहीत होतं. त्यांनी आजाराची माहिती गोळा केली, एका फायलीत उपचाराचे कागद एकत्र केले. अपेक्षेप्रमाणे साहेबांचा सांगावा आला. फाइल काखोटीस मारून वैद्यराज वेळेआधीच बंगल्यावर पोहोचले. साहेबही आलेच होते. दोघांनी किंचित झुकून एकमेकांना नमस्कार केला. लगोलग साहेबांसोबतच्या सर्वानी फोटोबिटो काढले. मग घरच्या वैद्याने इशारा केला, आणि साहेबांना घेऊन घरचा वैद्य बाजूच्याच दिवाणखान्यात गेला. दरवाजा बंद झाला. साहेबांना तपासणं हा केवळ उपचार होता. वैद्यास त्यांचं नेमकं दुखणं माहीत होतं. त्यांनी उगीचच एक नस दाबली. पण साहेबांना दुखलंच नाही. ‘हे दुखणं बरं झालेलं दिसतंय’.. घरचा वैद्य मनातच बोलला, आणि त्याने दुसरी नस दाबली. तिथेही साहेबांना काहीच दुखणं जाणवत नव्हतं. ते दुखणं तर जुनं होतं. साहेबांनी वैद्यांकडे पाहिलं. ‘ते जुनं दुखणं गेलं खड्डय़ात.. नव्या दुखण्यावर उपचार करा’.. साहेब त्राग्यानं बोलले, आणि घरच्या वैद्याने त्याचं ठेवणीतलं हास्य केलं. त्याला दुखरी नस नेमकी माहीत होती. तरीही त्याने एक जुनीच नस पुन्हा दाबली.. तिथंही आता दुखण्याचं नामोनिशाण नव्हतं. घरच्या वैद्यास जुन्या दुखण्याच्या साऱ्या नसा आठवल्या, तेवढय़ात त्याची नजर शेजारच्या टेबलावरच्या वर्तमानपत्रावर पडली. राम मंदिर, शेतकऱ्यांचं हित अशा काही बातम्या समोरच दिसत होत्या. ‘कुणाचं दुखणं काय असतं बघा’.. घरचा वैद्य मनातल्या मनात म्हणाला, आणि अखेर त्याने काखोटीची फाइल हातात घेतली. हसतमुखानं साहेबांसमोर उघडली. त्यातील कागदावर उपचाराचा सारा तपशील होता. साहेबांचे डोळे चमकले, आणि दुखरी नस सापडल्याच्या आनंदात घरचा वैद्यही खूश झाला. साहेबांनी फाइल पाहिली.

‘आता कामाला लागा’.. घरच्या वैद्याने साहेबांना आपुलकीचा सल्ला दिला, आणि साहेबांनी अवघडतच मान हलविली. जुन्या दुखण्याच्या आठवणी पुसल्या गेल्याच होत्या, आता नव्या दुखण्यावरही औषध मिळालं होतं. फाइल हातात पडताच साहेबांना तरतरी आली. आता सारी दुखणी संपली होती. इकडे साहेबांच्या अनुयायांना काळजी वाटत होती. दुखणं बरं होणार की नाही, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. साहेबांनी बाहेर येऊन हात हलविला. ‘दुखण्याचं मी पाहतो, तुम्ही कामाला लागा’.. साहेबांनी अनुयायांना सल्ला दिला, आणि साहेबांचं दुखणं संपल्याच्या आनंदात सारे कामाला लागले. घरच्या वैद्याच्या हातात हात घालून साहेब बंद खोलीच्या बाहेर आले, आणि नेहमीच्या सवयीने अनुयायी ओरडले, ‘आवाज कुणाचा’! .. घरच्या वैद्याने काहीसे नाखुशीने साहेबांकडे पाहिले, पण साहेबांनी वैद्याचा हात हलकेच दाबला.

‘मी पाहतो’.. ते पुटपुटले, आणि घरचा वैद्य खूश झाला. अनुयायांनाही आनंद झाला होता. बाहेर पडता पडता एक जण समाधानाने म्हणाला, ‘जमलं एकदाचं’!