21 October 2018

News Flash

एक सूर, अलग ताल..

बापटांनी वेगळ्या तालात काकडेंचाच सूर आळविल्याने आता दानवे पुन्हा गुप्त बैठक घेणार अशी चर्चा आहे.

भाजपचे नेते गिरीश बापट. (संग्रहित छायाचित्र)

तीनएक आठवडे झाले असतील. गुजरात निवडणुकीचे निकाल लागायचे होते, सगळीकडे भाजपची हवा दाटली असतानाच, गुजरातमध्ये भाजपला एकहाती सत्ता मिळविणे शक्य नाही असे भाकीत पुण्याचे भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी वर्तविले. साहजिकच पुण्यातील निष्ठावंतांचे पित्त खवळले. काकडेंवर कारवाई करण्याच्या मागणीचा महापूर पुण्यातून लोटला आणि एवढय़ा मान्यवर आयारामाचे करायचे काय असा प्रश्न प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंना पडला. मग दानवेंनी बापट-काकडे यांची एक गुप्त बैठक घेतली. दानवे-बापट यांना काकडेंचे मत फारसे मान्य नव्हते असे सांगितले जात असले तरी ते त्यांच्याशी शंभर टक्के असहमत होते असे म्हणता येणार नाही अशीही कुजबुज पक्षात सुरू झाली. तोवर गुजरातचे निकालही बाहेर पडले. काकडेंचे भाकीत शंभर टक्के सत्य ठरले नसले तरी सत्याच्या जवळपास पोहोचल्याने काकडे हे भाजपचे सहयोगी निवडणूक विश्लेषणतज्ज्ञ ठरून गेले. काकडेंच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेल्याने, पुण्याच्या भाजपचे मूळचे पालक, जे की गिरीशभाऊ  बापट यांना कसेसेच वाटणे ओघानेच येत असल्याने, आपणही आपल्या शिरपेचात एखादा असाच तुरा खोवून घेतला नाही तर काकडे आपल्याहून उंच दिसू लागतील असे त्यांना वाटू लागले असावे. मुळात बापट आणि काकडे यांचे एकमेकांशी काही वाकडे असावे यावर अनेकांचा विश्वास नाही असेही म्हणतात. तसे असते, तर काकडेंच्या सुरात बापटांचा सूर कधीच मिळणे शक्य नाही असे कुणीही छातीठोकपणे सांगितले असते. पण बापटांच्या बाबतीत छातीठोक विधान करणे म्हणजे स्वत:हून अडचणीत येणे हे अनेकांना माहीत असल्याने बापट कधीही काहीही बोलले तरी त्यावर पक्षाची अधिकृत प्रतिक्रिया देण्याचे धाडस प्रवक्ते फारसे करीत नाहीत. मुळात बापट हे पुण्याचे असल्याने पक्षात त्यांची एक वेगळी प्रतिमा असल्याचे अनेक जण सांगतात. भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या स्थापनेच्या वेळीही, संघाचे मुख्यालय पुण्यात ठेवावे का यावर बराच खल झाला होता असे म्हणतात. पण तेव्हा कुणीतरी त्याला विरोध केला आणि पुण्यातील मुख्यालय बारगळले होते. कारण ‘आमची कुठेही शाखा नाही’ असे म्हणता येणार नाही, असा युक्तिवाद त्या वेळी केला गेला. तरीही उपमुख्यालयाचा मान पुण्याच्या मोतीबागेला मिळत असल्याने, पुण्याच्या बापटांना नागपूरच्या फडणवीसांच्या खालोखाल पक्षात मानतात, असे भाजपमध्ये खासगीत बोलले जाते. ते खरे असेल तर काकडे यांच्या ज्या विधानाबद्दल त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी केली गेली होती, तशी मागणी बापटांच्या कोणत्याही विधानाबद्दल होणे शक्य नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे. काकडे यांनी तर गुजरातच्या निकालाचे भविष्य वर्तविले होते. आता बापटांना महाराष्ट्रातील भाजपच्या यशाची चिंता सतावते आहे. काकडे यांच्या त्या विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप होत होता. पण ‘महाराष्ट्रात पुढचे सरकार कुणाचे असेल माहीत नाही’ असे गंभीर विधान करून बापट यांनी मात्र, भाजपला चिंतनाची गरज असल्याचेच अधोरेखित केले आहे. बापटांनी वेगळ्या तालात काकडेंचाच सूर आळविल्याने आता दानवे पुन्हा गुप्त बैठक घेणार अशी चर्चा आहे.

First Published on January 8, 2018 12:57 am

Web Title: girish bapat controversial statement on maharashtra government