News Flash

संस्काराचे मोती!

महाजन यांच्या महान उपदेशामृतामुळे राज्यातील दारू उद्योगाला नवी झळाळी प्राप्त होणार असे दिसू लागले आहे

गिरीश महाजन

महाराष्ट्राच्या संस्कारी सरकारमधील मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या महान उपदेशामृतामुळे राज्यातील दारू उद्योगाला नवी झळाळी प्राप्त होणार असे दिसू लागले आहे. महाजन हे जरी दारू खात्याचे- (पक्षी) उत्पादन शुल्क खात्याचे- मंत्री नसले, तरी आपण दारू या क्षेत्रातही चमकदार कामगिरी करून दारूला ‘अच्छे दिन’ दाखवू शकतो, हे त्यांनी आपल्या अचाट कल्पनाशक्तीने महाराष्ट्राला दाखवून दिल्याने आता तमाम दारू उत्पादकांचे डोळे खाडक्न उघडले असतील यात शंका नाही. दारूला स्त्रियांची नावे दिली की दारूचा धंदा जोरदार चालतो, हे ‘शोधामृत’ जनतेच्या गळी उतरविण्याआधी महाजन यांना बराच वैचारिक व्यायाम करावा लागला असणार हे उघड आहे. असे विचारांचे मोती समाजमनावर उधळण्यासाठी आधी स्वत:वर विचारांचे संस्कार घडवून घ्यावे लागतात. महाजन हे महाराष्ट्राच्या ‘संघ संस्कारी’ मंत्रिमंडळाचे ज्येष्ठ सदस्य असल्याने व संस्कृतिपूजक संघपरिवाराचे पाईक असलेल्या पक्षातून सरकारात दाखल झालेले असल्याने साहजिकच त्यांच्या विचाराला व वक्तृत्वाला संस्काराचे मोती लगडलेले असणार हे ओघानेच येते. याआधी याच मंत्रिमंडळाचे गिरीश बापट यांनीही एकदा आपल्या संस्काराचे मोती राज्यातील तरुणाईवर उधळले होते, तेव्हा त्यांच्या अंगी भिनलेल्या दिव्य संस्कृतीच्या दर्शनाने महाराष्ट्राचे डोळे दिपले होते. आता तसेच संस्कृतिदर्शन गिरीश महाजन यांनी घडविले. ‘यत्र नार्यस्तु पूज्यन्ते..’ अशी महाजनांच्या ‘मातृसंस्थे’ची शिकवण असल्याने, तसेच, समस्त स्त्रीवर्गाविषयी कमालीची आदरभावना व महिलेला मातृस्थानी मानण्याचे संस्कार कळत्या वयापासून मनावर घडत असल्याने, दारूला स्त्रीचे नाव देण्याच्या त्यांच्या सल्ल्यातील त्यांचे अध्यात्म सामान्य समाजाला आकळण्यापलीकडचे आहे. एखाद्या खात्याचे मंत्रिपद मिळाले, की समाजाला सल्ल्याचे बोधामृत पाजण्याचा हक्क लाभला अशी सामान्यत: मंत्र्याची समजूत असते. त्यातही, जलसंपदा खात्याच्या मंत्र्याने तर असला काही सल्ला दिला नाही तर जणू मंत्रिपद व्यर्थ ठरावे अशी परंपरा या खात्याच्या मंत्र्यांनी अगोदरपासूनच प्रस्थापित करून ठेवलेली असल्याने, पुढील प्रत्येकानेच त्या परंपरेचे आपल्या वाचाळतेने चीज करायलाच हवे असा जणू पायंडाच पडला असावा. गिरीश महाजन यांनी तो प्रामाणिकपणे पाळला, एवढेच. जलसंपदा खात्याचे मंत्री असताना आधीच्या सरकारमधील अजितदादा पवार यांनी पाण्याच्या प्रश्नावरून घडविलेले आपल्या संस्काराचे दर्शन त्यांना प्रायश्चित्त घेण्यास भाग पाडणारे ठरले. गिरीश महाजन यांनी दारूच्या प्रश्नावरून आपल्या संस्काराचे दर्शन घडविले. आता त्यांनाही पश्चात्ताप झाला आहे, असे म्हणतात. आपण विनोदाने बोललो, असा खुलासा त्यांनी केला आहे; पण एवढय़ा लगेचच महाजनांनी अशी माघार घेऊ नये. महाराष्ट्र त्यांच्याकडे अपेक्षेने पाहतो आहे.. ‘महाजनो येन गत: स पंथ:’ ही आपली संस्कृतीच आहे. तुम्ही पाऊलवाट आखून द्या, आणखी अनेक जण त्यावरून पुढे वाटचाल करण्यास उत्सुक असतील.. कारण, तुम्ही ‘महाजन’ आहात, याचा विसर पडू देऊ नका!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2017 1:01 am

Web Title: girish mahajan suggesting female names to liquor for increasing sale
टॅग : Girish Mahajan
Next Stories
1 खिचडी संस्कृतीचा विजय असो..
2 वंदे पुलकिस्तान!
3 पाहुण्याच्या काठीने..
Just Now!
X