नाण्याला दोन बाजू असल्या तरी एक बाजू खोटी आणि ‘दुसरी बाजू’ आपली, म्हणजेच ‘खरी’ असते, असा काहींचा ठाम दावा असतो. भाजपची मातृसंस्था असलेल्या रा.स्व. संघात सध्या अशा नाण्यांची चलती आहे. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकरांच्या कर्मभूमीत हे नाणे जोरात आहे. संघाची पहिली शाखा सुरू झाली, तेव्हा सुभाष वेलिंगकर तेरा वर्षांचे होते. आज ६८ वर्षांचे असलेले वेलिंगकर कालपर्यंत संघाचे गोवा प्रांतप्रमुख होते आणि भाजपलाच आजवर मदत करणाऱ्या ‘भारतीय भाषा सुरक्षा मंचा’चे कामही २०१० पासून करीत होते. तब्बल पंचावन्न वर्षे स्वयंसेवकत्वाचे व्रत वाहिलेल्या वेलिंगकरांना भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या कामासाठी पदमुक्त केल्याचे सोज्वळ कारण देत संघाने त्यांना प्रांतप्रमुखपदावरून मुक्त करून टाकले. वेलिंगकरांच्या भाषाभिमान आंदोलनास संघाचा पाठिंबाच आहे, असेही संघाने जाहीर करून टाकले. ही झाली नाण्याची संघाच्या दृष्टीने ‘खरी’ असलेली ‘दुसरी बाजू’! इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे अनुदान बंद करून मातृभाषेला शैक्षणिक माध्यमाचा दर्जा देण्याच्या निवडणूकपूर्व आश्वासनास मनोहर पर्रिकरांनी व भाजपने हरताळ फासल्याचा वेलिंगकरांचा आरोप, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांचे काळ्या झेंडय़ांनी स्वागत आणि भारतीय भाषा सुरक्षा मंचाचे राजकीय पक्षात रूपांतर करून आगामी निवडणुकीत भाजपला आव्हान देण्याचा वेलिंगकरांचा पवित्रा ही ‘पहिली बाजू’! सारे राजकीय पक्ष संघासाठी समानच आहेत, असे खुद्द सरसंघचालकच म्हणत असल्याने, भाजपला संघाचेच पिल्लू म्हणणे, ही संघाच्या दृष्टीने नाण्याची खोटी बाजू असते. ‘कोणत्याही राजकीय पक्षाला मार्गदर्शन करावयास संघ तयार असतो, काँग्रेसने मागितली तर त्यांनाही योग्य त्या मुद्दय़ावर मदत करण्याची संघाची तयारी असते,’ हे सरसंघचालकांचे म्हणणे ही या नाण्याची आणखी एक, पण दुसरीच बाजू. कारण नाण्याला तीन बाजू नसतातच. गोव्यातल्या नाण्याला मात्र, अचानक तिसरी बाजू तयार झाली. परिवारातला पक्ष असलेल्या भाजपलाच आव्हान द्यायला निघालेल्या वेलिंगकरांना बाजूला काढून भाजपचा मार्ग निधरेक करण्याचा संघाचा पवित्रा ही गोव्यातील नाण्याची तिसरीच बाजू आहे. केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर शाखाविस्तार करण्याचे संघाचे मनोरे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात भाजप पोहोचवूनच ‘काँग्रेसमुक्त भारत’ करण्याचे भाजपचे नारे परिवारात घुमत असताना, गोव्यात मात्र ‘वेलिंगकरांविना संघ नाही’, असा पवित्रा स्थानिक स्वयंसेवकांनी घेतल्याने, ‘बुरखा’ कोणता आणि ‘चेहरा’ कोणता हेही ओळखू येईनासे झाले आहे. पर्रिकरांवर विश्वासघाताचा आरोप करून निवडणुकीत आव्हान देणाऱ्या वेलिंगकरांना पदमुक्त करणारा संघ खरा, की वेलिंगकरांच्या भाषालढय़ास पाठिंबा देणारा संघ खरा, असा संभ्रम संघ स्वयंसेवकांच्या मनात माजला असला, तरी संघाची बाजू हीच नाण्याची ‘दुसरी बाजू’ असणार, ही संघनिष्ठांची भावना असणार! पण ‘एक बाजू खोटी असलेले नाणेच खोटे असते’, हा व्यवहारवाद त्याआधी त्यांना ‘आठवणीने’ विसरावा लागेल.