शिमगा येऊन गेल्यावर चैत्रपालवीत कडुलिंबाच्या डहाळी आणि साखरेच्या गाठी गुढीला लावल्यानंतर जीवनात काही कडू आणि खूप काही गोड होणार, असं मनाला समजावत असताना, विक्रम वेताळाच्या गोष्टीतील वेताळाने विक्रमाच्या मानगुटीवर बसून गोष्ट चालू करावी तशी सकाळ झाली. त्या विषाणूच्या अमंगळ बातम्यांचा कोलाहल सुरूच आहे. अशा काळात ट्रम्प तात्या, जिंगपिंग काय म्हणाहेत, हे ऐकायचं, शांतपणे ते पचवायचं आणि एकटं बसायचं. पण काही झालं तरी गुढी उभी करायचीच असा आपला हट्ट. ती कशी उभी करावी?

विचारल्यावर शांतपणे गुरुजींनी पंचांग काढलं, ‘काही होणार नाही. या वर्षी सगळ्या जगावरच संकट आलं असलं, तरी आपण पुण्यवान  आहोत.’ सोसायटीतील अनेक जणींचा विश्वास बसला. कोणी तरी पसरवलं – घरातील सदस्यसंख्येएवढे कणकेचे दिवे करायला सांगा. पूर्व दिशेकडे दिव्याचे तोंड असेल असे ते पेटविले की करोना काही घरात येणार नाही. त्यावर ठाम विश्वास बसला अनेक जणींचा. सोसायटीभर कशी वार्ता पसरली कोण जाणे..

तिकडे ग्रामीण भागात गावात पोरं काही ऐकत नव्हती. त्यांना धास्ती होती, मुंबई-पुण्याहून येणारी मंडळी गावात अमंगळ घडवून आणणार. म्हणून त्यांनी ठरवलं, गावाच्या वेशीत काटे टाकायचे. आता कोण कसा येतो, यावर करडी नजर आहे. शहराच्या चौकात असले पोलीस तरी फिरल्याशिवाय भागत नाही हो. चौकात चक्कर हवीच, हे कोण सांगणार नेत्यांना? त्यात बुधवार गुढी पाडवा. वर्षांचा सण. गुढी उभी करायची म्हटल्यावर साखरेच्या किंवा खोबऱ्याच्या गाठी तर हव्यातच. आनंदाचा सण हा, त्याला म्लानपणा कसा चालेल? बातम्या विषाणूच्या असल्या तरी चालतील, पण तोंड गोड करायला हवंच! जगाची चिंता करत चिंतातुर जंतूसारखे नुसते बसू नका. भाजी निवडून द्या, लसूण सोलून द्या, अशी कामेही करून झाली आहेत. आता प्रत्येकीचा हट्ट आहे, उद्या काही झालं तरी गुढीला साखरेचा हार हवाच.

त्या टीव्हीवाल्यांकडे लक्ष देऊ नका हो, उद्या जा आणि हार तेवढा आणा, असा आदेश संचारबंदीपेक्षा महत्त्वाचाच असल्याने नाइलाजच आहे.. पण गर्दी झाली तर सरकार समजून घेईल?

तिकडे ट्रम्प, जिंगपिंग यांना कळणार आहे पाडव्याचं महत्त्व? काही झाले तरी गुढी उभारू, त्याला साखरेचे हार घालू. अशीही सुट्टी कुठे मिळते? त्यामुळे विषाणूच्या बातम्या विसरा. गुढी उभी करा. भाजी नाही मिळाली एखादी तरी चालेल, साखरेचे हारही नसतील तरी बेहत्तर. गर्दी झाली तर रुमाल बांधा, मास्क वापरा. पण गुढीसाठी सारे काही करू..

तिकडे इटलीमध्ये वगैरे असले सण समारंभ नसतात म्हणूनच माणसं मरू लागलीत.

बरेच इटालियन सुट्टी म्हणून एन्जॉय करत होते म्हणे.. आपल्याकडे असलं काही होणार नाही. गुढी उभारा, आनंदी ठेव म्हणावं जगाला, अशी प्रार्थना करा. गर्दीत सर्दी असतेच, हे मात्र लक्षात ठेवा..