06 March 2021

News Flash

पाडव्याचा गोडवा..

पहाट झाली. कोंबडा आरवला. पलीकडच्या गोठय़ातून गाय हंबरली, आणि गोमातेचे स्मरण करून हात जोडत भैरू उठला.

पहाट झाली. कोंबडा आरवला. पलीकडच्या गोठय़ातून गाय हंबरली, आणि गोमातेचे स्मरण करून हात जोडत भैरू उठला. आकाशात भगव्या रंगाची उधळण सुरू होती. थोडय़ाच वेळात ऊन पडेल, आणि चांगला दिवस सुरू होईल, या आशेने पूर्वेला भगव्याकडे पाहत भैरू अंथरुणावरून उतरला. त्याला आठवले, आज पाडवा. त्याने आईला हाळी दिली. ती केव्हाचीच स्वयंपाकघरात खुडबुड करीत होती. तूरडाळ संपली होती. तेलही थोडंसंच शिल्लक होतं. तिला गॅसचा सिलिंडर आजच संपेल असं वाटत होतं. मग तिनं फडताळातली पैशाची पुरचुंडी सोडली. सिलिंडरपुरते पैसे शिल्लक होते. तिनं सुस्कारा सोडला, आणि चुलीत लाकडं कोंबून रॉकेलचा पेटता बोळा आत सरकवला. भैरू पाहतच होता. आईच्या चेहऱ्यावर भगवा उजेड पसरला आणि भारतमातेचे ते तेजस्वी चित्र आठवून त्याने हात जोडले. तोंडातला टुथपेस्टचा फेस आवरत तो पुटपुटला, ‘भारतमाता की जय!’.. तो बाहेर आला, चहा पिऊन त्याने गुढीची तयारी केली. कपाटातलं जुनं भगवं रेशमी कापड काढलं. कोपऱ्यातला बांबू बाहेर काढला. तो धुऊन घ्यायला हवा, असा विचार त्याच्या मनात आला, पण घरात पाणी नव्हतं. मग त्याने ओल्या फडक्यानं बांबू पुसला, रेशमी कापड गुंडाळून कडुनिंबाची माळ घातली, आणि ओटय़ावरचा एक रिकामा लोटा उलटा टाकून गुढी उभी केली.. अगरबत्ती लावून नमस्कार केला.. शेजारी मोरूच्या घरीही पाडव्याची तयारी सुरू होती. झेंडूची पाव किलो फुलं आणून मोरूने माळ तयार केली. त्याचे तोरण दारावर लटकवून मोरूने कपडे वाळत घालण्याच्या काठीची गुढी करून खिडकीवर उभी केली. एक अगरबत्ती लावली आणि वातावरणात सणासुदीचा सुगंध परिमळू लागला.. भैरू आणि मोरूच्या घरी गुढीपाडवा साजरा झाला.. मोरूची बायको काही तरी सोनंनाणं घ्यायच्या विचारात होती. मोरू मात्र ते सोयीस्कर विसरला होता. त्याने सहज पेपर चाळला.. सराफांचा बंद सुरूच होता. त्याने सरकारचे मनोमन आभार मानले. रेपो रेट उतरल्यावर घरासाठी कर्ज काढायचाही त्याचा विचार होता. पण नवे दर लागूच झाले नव्हते. पाडव्याच्या मुहूर्तावर तरी डोक्यावर कर्जाचा बोजा चढला नाही, या आनंदात मोरूने गुढीकडे पाहत हात जोडले आणि तो पुन्हा पेपर चाळू लागला. पानापानावर दुष्काळाच्या आणि पाणीटंचाईच्या बातम्या होत्या. मोरूने शेजारी भैरूच्या अंगणातल्या उंच गुढीकडे पाहिले. गुढीचे भगवे रेशमी कापड, वाऱ्याबरोबर आकाशात डौलाने फडकत होते. त्याच वाऱ्याने गुढीभोवतीच्या कडुनिंबाच्या माळेतली दोन-चार पानं गळून उडत मोरूच्या पायाशी आली. मोरूला आठवलं, पाडवा कडुनिंबाची पानं खाऊनच साजरा करायचा असतो. त्याने पानं तोंडात टाकली, तोंड काहीसं कडवट झालं, पण मोरू मनाशीच म्हणाला, ‘चला, पाडवा गोड झाला!’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2016 3:34 am

Web Title: gudi padwa celebration in maharashtra
Next Stories
1 ‘नैतिकतेचा शंखनाद’
2 गुणवत्तेची झाकली मूठ
3 समस्यामुक्तीचा सोपा मार्ग
Just Now!
X