गोष्ट खासगी नाही, म्हणूनच सांगतो: रविवारी सकाळचे साडेनऊ झाले तरीही परिपाठ काही पार पडला नाही. आमचे शेजारधर्मी परमस्नेही रा. रा. लेले यांच्याकडून आम्हाला शुभ सकाळ चिंतणारा संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर येतो, हा परिपाठ. रविवारी तो आलाच नाही. थरथरत्या हातांनी आम्ही आमचे व्हॉट्सअ‍ॅप उघडले. लेले यांच्याशी झालेला अखेरचा संवाद पाहिला. शनिवार ४ ऑगस्ट, रात्री दहा वाजून ३१ मिनिटे. कुणीशी पाठवलेली त्या सुरजेवालांच्या बोलण्याची क्लिप आम्ही लेलेंकडे धाडली होती. तीखालच्या ‘बरोबर’च्या दोन निळ्या खुणा सांगत होत्या की, लेलेंनी दहा वाजून ३३ मिनिटांनी ती पाहिलीसुद्धा होती. म्हणजे तोपर्यंत धुगधुगी होती तर! आता तपासाचा दुसरा टप्पा. लेले यांच्या प्रोफाइलवर क्लिक करणे. पाहतो तो काय, लेले ऑनलाइनच आहेत. आता मजल्यावरच दोन पावले चालून, त्यांच्या दाराची घंटा वाजवावी काय? हा विचार मनी आल्याक्षणी आमच्याच दाराची घंटा वाजली. दारात अमित! लेले यांचे चिरंजीव. लेले मात्र त्याचा उल्लेख आवर्जून ‘सुपुत्र’ असाच करतात. आम्ही सहिष्णुता बाळगतो. मतभेद गाडून टाका असे मोदींनी एकदा नव्हे, अनेकदा  सांगितलेले आहे. ते आम्ही ऐकतो. बाहुबलीने हत्तीवर चढून मांड ठोकण्याची अभिनव पद्धत अमितच्या ज्या जुन्याच रीतीवरून उचलली, तीस अंतर न देता लेले-चिरंजीव आमच्या सोफ्यावर आरूढ झाले. ‘‘काका, गणित आहे एक.’’ लेले-चिरंजीव कशालाही काहीही म्हणू शकतात, याची पुरेशी कल्पना असलेला कोणीही सभ्य माणूस जितकी सावध प्रतिक्रिया देईल, तितकीच आम्ही दिली-  ‘‘हो का?’’. ‘‘हो ना, काका. डॅड म्हणाले. काकांनाच विचार..’’ अमितला गणित मुखोद्गत होतं. त्यानं आम्हाला प्रश्न केला.. ‘‘काका ८२ हजार म्हणजे चाळीस लाखाच्या किती टक्के?’’ – अं.. अं..  हे बघ बेटा ४० हजार म्हणजे चार लाखांचा  एक टक्का.. हां, हो.. एक टक्का.. तर म्हणजे दोन पॉइंट एक टक्का वगैरे येईल उत्तर. का रे, तुझ्या बाबांचा मोबाइल बिघडलाय का? त्यात असतो ना कॅल्क्युलेटर.. अशा प्रकारे आल्या संकटाला सामोरं जाऊन मुद्दय़ावर येण्याचा आमचा प्रयत्न अमितनं हाणून पाडला. त्यानं थेट जमिनीवर उडी मारली आणि म्हणाला, ‘‘काका, तुम्हाला माहित्याय? डॅड म्हणाले त्याला माहीत नसेल!’’ ‘‘हो का? असं म्हणाले का रे बाबा तुझे?’’ ‘‘हो ना, काका, डॅड खूप चिडून म्हणाले- त्याला ८२ हजार म्हणजे चाळीस लाखाचे किती टक्के विचार माहित्याय का!’’ धाडकन् दार आपटल्याचा आवाज. अमितची हीसुद्धा सवयच. आता हे लोकप्रतिनिधींना पडणाऱ्या लाखा-लाखांच्या टक्केवारीचे प्रश्न लेलेंना कसे काय पडले, एवढे तरी विचारावे म्हणून व्हॉट्सअ‍ॅप उघडला आणि तो उघडताच लख्खकन प्रकाश पडला डोक्यात! त्या क्लिपमधल्या सुरजेवालांनी, काँग्रेसनं प्रत्यक्ष किती घुसखोर देशाबाहेर पाठवले याचा दिलेला आकडा होता ८२ हजार!! लेलेंच्या- पर्यायानं आमच्याही- पक्षानं घुसखोर ठरवलेल्यांची संख्या ४० लाख. अमितमार्फत गणित घालणं, ही गर्वहरणाची एक रीत होती तर! मन मोठं करून आम्ही लेलेंना लिहिलं-  ‘काल रात्री माझा मोबाइल आणि व्हॉट्सअ‍ॅप बहुतेक हॅक झाला होता..  तुम्हीही काळजी घ्या..’