21 October 2018

News Flash

गोड बोल आणि हल्लाबोल…

राज्याचा कानाकोपरा ‘हल्लाबोल’ आंदोलनाने व्यापून टाकला, आणि संक्रांत खरेच जवळ आल्याची चुणूक सरकारला दाखविली.

 

आपण सुसंस्कृत आहोत, हेच खरे! एरवी एकमेकांशी कितीही भांडलो, परस्परांवर दगडांचा मारा केला, रस्ते अडविले, गाडय़ा रोखल्या, जनजीवनाचे बारा वाजविले, तरी काही शिष्टाचार आपण कसोशीने पाळतो. गेल्या आठवडय़ात या साऱ्याचा प्रत्यय आला. नव्या वर्षांच्या पूर्वसंध्येस आपण परस्परांना मनापासून शुभेच्छा दिल्या. नवे वर्ष आनंदाचे, सुखाचे जावो अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. कारण ती आपली संस्कृतीच आहे. दुसऱ्याच दिवशी राज्यात काही तरी अप्रिय घडले आणि असंतोषाची ठिणगी पडली. एकमेकांसमोर उभे राहून बाह्या सरसावल्या गेल्या. पण ते तर नैमित्तिक होते. कारण ती आपली संस्कृती नाही. ते वादळ शमल्यावर पुन्हा आपण एक झालो. आणखी काही दिवसांनी संक्रांतीचे वेध लागतील. प्रेमाचे, स्नेहाचे प्रतीक असलेला तिळगूळ घरोघरी वाटला जाईल, ‘गोड बोला’ अशा अपेक्षांसह एकमेकांना तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छांद्वारे आपण आपल्या संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडवू. त्या स्नेहाच्या गोडव्यात अगदी अलीकडचा कडवटपणा धुऊन निघेल. कारण तीच आपली संस्कृती!  आपल्या जीवनशैलीचे हे वेगवेगळे पदर उलगडून पाहताना नवख्यांची बोटे तोंडात जात असतील. पण परस्परांविषयी आदर, स्नेहाच्या प्रसंगांच्या प्रभावाखाली नकोसे ते सारे झाकोळून टाकणे ही संस्कृती अधिक गडद होत जाईल. सामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनशैलीतही हेच दिसते, समाजकारणातही हेच दिसते आणि अगदी राजकारणातही हेच दिसते. राजकीय मतभेदांतून एकमेकांवर तुटून पडणारी, प्रसंगी एकमेकांचे वाभाडे काढणारी नेतेमंडळीदेखील आपल्या या संस्कृतीचे अशा काही जबाबदार जाणिवेने पालन करतात, की हे सारे पाहून नवख्यांचा ऊरदेखील आदराने भरून यावा.. फडणवीस सरकार सध्या विरोधकांच्या तोफांना तोंड देत आहे, ही काही नवी बातमी नाही. कर्जमाफी आणि अन्य आंदोलनांमुळे वरवर पाहता राज्यात सारे काही आलबेल नाही असे दिसावे, असंतोषांच्या लाटांमुळे सरकारवर संक्रांत आल्यासारखे भासावे, अशी परिस्थिती होती, पण यातही संस्कृतीची जपणूक करण्याचा सुसंस्कृतपणा नेतेमंडळीनी किती आस्थेने जपला आहे पाहा! काही आठवडय़ांपूर्वी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी सरकारला जेरीस आणण्यासाठी कंबर कसली. राज्याचा कानाकोपरा ‘हल्लाबोल’ आंदोलनाने व्यापून टाकला, आणि संक्रांत खरेच जवळ आल्याची चुणूक सरकारला दाखविली. त्यानंतर हवा काहीशी पालटली. राज्याला नव्या आंदोलनाची धग जाणवू लागली, पण ती धगदेखील शमली. पुन्हा सारे शांत झाले, तेव्हाच हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्याची आखणी सुरू झाली. १४ जानेवारीस, संक्रांतीला तिळगूळ देऊन, ‘गोड बोला’ असा संदेश परस्परांना देऊन त्याची गोडी जिभेवर असेतोवर राज्यात खरोखरीच स्नेह आणि संस्कृती हातात हात घालून वावरणार आहे. किंक्रांत पार पडेल, आणि त्यानंतरच्या दिवशी पुन्हा ‘हल्लाबोल’ आंदोलन पेटेल.. आठवडाभर राज्यात पुन्हा आंदोलनाची धग जाणवू लागेल, पण त्यातही संस्कृतीचा विसर पडणार नाही. कारण, पुढे प्रजासत्ताकदिनी, २६ जानेवारीस आपण सारे ‘सारे जहाँसे अच्छा, हिंदोस्ता हमारा’ हे प्रेरणागीत सुरात सूर मिसळून म्हणूच. प्रजासत्ताकदिनी या संस्कृतीचे अभूतपूर्व दर्शन घडविणार आहोत. सुसंस्कृततेचे ते वारे शमले, की पुन्हा आंदोलनाचे वारे वाहू लागतील. त्याची धग जाणवू लागेल. पण ती आपली संस्कृती नाही हे आपल्याला पक्के ठाऊक असेल.. एखादा नवा सण येईल, आणि पुन्हा शुभेच्छा संदेशांचीच देवाणघेवाण होईल. तीच आपली संस्कृती आहे..

First Published on January 9, 2018 1:14 am

Web Title: halla bol andolan in maharashtra congress ncp