स्थळ – बराक क्रमांक सहा.

पहिला म्हणाला – चोक्सी पुन्हा पळाला. काय नशीब घेऊन जन्माला येतात लोक. नाही तर मी. बायकोला गरज होती म्हणून बँकेच्या कॅशमधले ५० हजार काढून दिले. वाटले, महिनाभर याच काऊंटरवर आहोत, गुपचूप टाकू परत! पण अखेरच्या टॅलीपर्यंत नाही जमले. शेवटी झाली तक्रार व आता बसलो इथे सडत. चौकशी झाली तेव्हा खरे काय ते सांगून टाकले तरी बँकेने ऐकले नाही. मी चोक्सी नव्हतो ना! आज सहा महिने होत आले. वकिलावर दीड लाख खर्च झाले. बायको रोज रडते ते वेगळेच. केवळ कायदा सर्वांसाठी समान असून काय उपयोग? या चोक्सी व मोदीच्या बातम्या ऐकल्या की माझ्या बुद्धीची मला कीव येते. ना पांढरपेशा ना सराईत. आपण मध्येच अडकलो!

दुसरा म्हणाला – तो पळाला म्हणणे हेच चूक. तो सापडलाच होता कुठे? कदाचित त्याचे पैसे संपत आले असतील म्हणून त्याने हे नाटक केले असेल. अँटिग्वासारखे लहान देश पैसेवाल्यांनाच आश्रय देतात म्हणे. त्याचा भाऊबंद नीरव आता भारतात धाडला जाणार हे ठरल्याने तो अस्वस्थ असेल कदाचित. काही तरी नवा गेम निश्चित असणार यामागे. हुशार लोक आहेत ते. नाही तर मी- पैसे कमावण्याच्या नादात एकच भूखंड दहा जणांना विकला आणि आलो इथे खडी फोडायला. घोटाळा कसा करावा हेही कळायला हवे यार! आणि तो केल्यावर केलाच नाही असे म्हणायलासुद्धा ताकद लागते. ती पैशानेच येते म्हणे! म्हणून तर गुंगारा देत मस्त फिरतोय तो तिकडे गेल्या तीन वर्षांपासून. पैसा, कुटुंब, वकील वगैरे कसे मॅनेज करत असतील हे लोक! मी इथे आल्यापासून बायको जी माहेरी गेली ती परतलीच नाही. तरीही पैशासाठी लोक बंद दारावर धडका देतच असतात. मीही पहिली तक्रार झाल्यावर पळून जाण्याचा विचार केला, पण तेवढे पैसेच शिलकीत नव्हते. अधिकच्या मोहापायी इतर ठिकाणच्या जमिनीत गुंतवणूक करून ठेवली होती. हेराफेरी करून पैसा कमावला, पण साले नियोजनच जमले नाही, त्या चोक्सीसारखे!

तिसरा म्हणाला – पण तिथे तर तो तसा सुरक्षित होता तरी गायब का झाला असेल? मोठ्या फ्लॅटमध्ये राहायचे, आलिशान कारमध्ये फिरायचे. उंची हॉटेलात जेवायचे. एखाद्या पत्रकाराने गाठलेच तर डोळ्यात अश्रू आणत निर्दोष असल्याचे सांगायचे… एवढे सुखासीन आयुष्य कुठल्या आरोपीला मिळते यार! तरीही तो सारे सोडून निसटला? आणि मी बँकेचे सीसी लिमिट वाढवून मिळावे म्हणून खोटी कागदपत्रे सादर केली व फसलो वर्षभरापासून इथे. छोटासा धंदा होता यार. आता तोही बुडाला. कदाचित त्याने तिथल्या बँकांना गंडा घालण्याचा प्रयत्न केला असेल व तो फसला म्हणून तर पळाला नसेल? (सारे हसतात) अशी माणसे राहू शकत नाही त्याशिवाय. काय डोकी चालतात राव यांची. नाही तर आपली बघा… खोकी! बसलो गजांची उंची मोजत.

तेवढ्यात शिपाई ओरडतो… चला ताटवाट्या घ्या, रांगेत लागा, जेवणाची वेळ झाली…

त्यासरशी तिघेही उठले. जेवण वाढून घेतल्यावर उकिडवे बसून खाताना पहिला म्हणाला, ‘‘त्या चोक्सीने लवकर इथे यायला हवे. अशा आरोपीसाठी भारतासारखा चांगला देश जगात दुसरा नाही. एकदा कोठडीतून बाहेर आले की मरेपर्यंत खटले लांबवता येतात आणि सुखात जगता येते’’

…हे ऐकताच तिघांचे डोळे चमकले!