20 April 2019

News Flash

चुटकीसरशी..

सुतासारखे सरळ करेन’ हे वाक्य ऐकले, की आता आणखीही काही चेहरे नजरेसमोर येतात आणि हसू फुटते.

हेमा मालिनी व पंकजा मुंडें

साहेब, अलीकडे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचताना, बातम्या पाहताना, आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुमचे ते शब्द आमच्या कानात घुमू लागतात.. आम्हाला आठवतंय, जमलेल्या तमाम माता, बंधूभगिनींना नेहमी एक आवाहन करून तुमच्या प्रत्येक सभेचा समारोप व्हायचा. ‘माझ्या हाती संपूर्ण सत्ता द्या, सगळ्यांना सुतासारखे सरळ करून टाकेन!’.. तुमची ती गर्जना मैदानात घुमली की लाखो माताबांधवांच्या टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि अंगावर रोमांच दाटलेल्या अवस्थेत, भारावलेला श्रोतृसमुदाय घरोघरी परतायचा.. त्या शब्दांत जादू होती, पण तुमचे आवाहन कधी कुणी मनावर घेतलेच नाही. आजही, तुमचाच वारसा एकहाती सत्तेची प्रतीक्षा करतोच आहे; पण काही असो, ते शब्द तुमच्याच तोंडी शोभत असत. तशा घोषणा त्यानंतर किती तरी नेत्यांनी केल्या. ‘सुतासारखे सरळ करेन’ हे वाक्य ऐकले, की आता आणखीही काही चेहरे नजरेसमोर येतात आणि हसू फुटते. शेवटी, नक्कल करायलाही अक्कल लागतेच की.. तरीही, फुकाच्या घोषणा देणारे आजकाल सर्वत्र सारखेच दिसत असतात. म्हणूनच, त्यांचे शब्द ऐकले, की आम्हाला तुमची आठवण येते. परवा त्या, एके काळच्या स्वप्नसुंदरीने, आपले असेच एक सुंदर स्वप्न बोलून दाखविले. मनात आणले तर म्हणे, एका मिनिटात मी मुख्यमंत्री होईन.. असे डायलॉग चित्रपटात चांगले शोभतात हे आता जनतेला माहीत असल्याने तिचे ते महत्त्वाकांक्षी विचार फारसे कुणी मनावर घेतले नाहीत, हे बरे झाले. एक तर, ती पडद्यावरची घोषणा नसते आणि वास्तवात असे काही कधीच होत नसते हे सगळ्यांनाच माहीत असल्याने करमणूकही होत नाही; पण अशा घोषणा राजकारणात मुरलेल्यांनाच शोभतात. त्यांच्या अकलेचे विश्व किती विस्तृत आहे, हे त्यातून दिसू लागले, की नेहमीच आशेने सरकारकडे डोळे लावून बसलेल्यांचे डोळे काही क्षणांकरिता तरी विस्फारतात आणि आपला मसीहा आता जन्म घेतोय, अशा समजुतीने समाजात समाधानाचे वारे वाहू लागतात. काही दिवसांत जनताही ते सारे विसरून जाते. नाही तर, जीन्स आणि टी शर्ट घालून नांगरणी करणारा शेतकरी गेल्या दहा वर्षांत देशात जन्माला आला नसता का? पण आपले दैव कुठे तरी पेंड खात असणार.. अशा, चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्यांना कुठे तरी कोपऱ्यात उभे राहून अशा उत्तुंग घोषणा देण्याची वेळ यावी, हे आपले दुर्दैव नव्हे काय?.. मराठा आरक्षणाचा प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळलाय, किती नेते आले आणि सत्तेवरून पायउतार झाले, तरी त्या प्रश्नाची धग कमी झालेली नाही. अशा वेळी, तो प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याची धमक दाखविणाऱ्या पंकजा मुंडेंना एक तासाचे मुख्यमंत्रिपद देऊन बघायला काय हरकत आहे, हा उद्धवजींचा प्रश्न आम्हास तरी रास्तच वाटतो. शेवटी, त्या चुटकीत नेमकी कोणती जादू असते, ते जनतेला एकदा कळावयासच हवे. चुटकीसरशी प्रश्न सोडविणारे एवढे तमाम नेते राज्यात असताना, अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळत का पडतात, हा मुळातच एक गहन प्रश्न आहे. म्हणूनच, आजकाल प्रश्नाचे उत्तर शोधण्याऐवजी, ‘इतके दिवस काय केलेत’, असा प्रश्न समोरच्यास विचारण्यातच आवेश दाखविला जातो, हे साहजिकच आहे. आसपास सर्वत्र असे प्रश्न विचारणाऱ्यांचा पसारा माजलेला असताना, चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याच्या करमणूकप्रधान वाक्यांची या राज्यात कदर व्हायला हवी असे आम्हाला वाटते. तुमचं मत काय?

First Published on July 30, 2018 2:54 am

Web Title: hema malini pankaja munde controversial statement