आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्व सर्मा हे सध्याच्या काळात फोफावलेल्या आध्यात्मिक विज्ञानवादी आणि पुराणमतवादी पुरोगाम्यांच्या पंक्तीतील एक आघाडीचे युगपुरुष आहेत. पुराणकथा सांगून भक्तांची मने रिझविण्याची प्राचीन परंपरा पुनरुज्जीवित झाल्यापासून, अशा परंपरेच्या मांदियाळीत आपलाही समावेश व्हावा व या परंपरेच्या महागुरूची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठी लागलेल्या चढाओढीत आता हेमंत बिस्व यांना आपोआपच स्थान प्राप्त होणार आहे. कारण, एका दिव्य विचाराचा साक्षात्कार त्यांनादेखील झाला आहे. पण त्यांचा विनय असा की असा साक्षात्कार आपणांस झालाच नसून, आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला असे त्यांनी आता दिलगिरीपूर्वक म्हटले आहे. तरीही कर्करोग, अपघाती मृत्यू हे गेल्या जन्मीच्या पापाचे फळ असते, अशी जी आपल्या अक्कलवृक्षाची मुक्ताफळे त्यांनी राज्यातील शिक्षकांच्या परिषदेत उधळली, त्यामुळे असे नेते लाभणे हे आपल्या पूर्वजन्मीचे पुण्यच आहे, असे अवघ्या देशाला वाटू लागले असेल. आधुनिक विज्ञानाहून किंवा अद्ययावत वैद्यकशास्त्राहूनही एखाद्या धर्माच्या आध्यात्मिक कल्पना हाच  ज्यांच्या  विकासाच्या संकल्पनांचा पाया असेल, तर आपले भविष्य किती उज्जल आहे, या कल्पनेने अनेकांना उचंबळूनही येऊ लागले असेल. नव्या भारताची न्यायव्यवस्था कोणत्या पायावर आधारलेली असेल याचेही संकेत हेमंत बिस्व यांनी आपल्या आध्यात्मिक विचारधनातून दिले आहेत. न्यायसंस्था हा देशाच्या लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, असे आपण अभिमानाने सांगत आलो आहोत. अशा पुण्यात्मा नेत्यांच्या स्वप्नातील भोंदू आध्यात्माधारित नवभारताची न्यायव्यवस्था मात्र, दैवी न्यायाच्या पायावर उभारलेली असेल. सध्याच्या न्यायव्यवस्थेत कोणासही दोषी ठरविण्यासाठी, त्याच्यावरील आरोप पुरेशा पुराव्यानिशी सिद्ध करणे गरजेचे असते. बिस्व यांच्यासारख्यांच्या धारणाधिष्ठित नवभारताची न्यायव्यवस्था मात्र, पाप आणि पुण्याचे हिशेब मांडून निष्पाप व पापी अशी विभागणी करेल. या नवभारतात, तुरुंग नावाची संकल्पना नसेल, तर जागोजागी पापी लोकांकरिता नरक नावाची एक नवी व्यवस्था अमलात आणली जाईल. सध्याची राजकीय स्थिती पाहता, स्वर्ग नावाची दुसरी व्यवस्थादेखील अमलात आणली जावी, असा त्यांचा मानस असावा. दैवी न्यायानुसार या स्वर्गात कोणाची रवानगी करायची, याचा हिशेब ठेवणारी नवचित्रगुप्तांची भरती ही या नवनिर्मितीतील एक महामोहीम असेल. पाप-पुण्याचे हे निकष केवळ याच जन्मातील कर्मावरून निश्चित केले जावेत अशी अट नसल्याने, गतजन्मीच्या कृष्णकृत्यांचा हिशेबही आपला आपल्यालाच ठेवावा लागणार असून, ज्या अर्थी आपण कोणत्याही गंभीर आजारात किंवा वारंवार घडणाऱ्या रेल्वे अपघातासारख्या घटनांमध्ये बळी न पडता जिवंत आहोत, त्या अर्थी आपण पुण्यवानच आहोत, असा छातीठोक विश्वासही जिवंतांच्या विश्वातील प्रत्येकाला बाळगावा लागेल. तर, अशा या नवभारतात वावरण्यासाठी लागणारी पुण्याई गोळा करण्यासाठी, सज्जनहो, सारे सज्ज व्हा.