21 November 2017

News Flash

राजनाथ सिंह यांचे १-अ

केंद्रीय गृहमंत्री ठाकूर राजनाथ सिंह हे तमाम भारतीयांच्या दोन ‘अ’चे हक्कदार आहेत यात शंकाच

लोकसत्ता टीम | Updated: September 13, 2017 2:13 AM

केंद्रीय गृहमंत्री ठाकूर राजनाथ सिंह हे तमाम भारतीयांच्या दोन ‘अ’चे हक्कदार आहेत यात शंकाच नाही. हे २-अ म्हणजे अभिनंदन आणि आभार. ते यासाठी की गृहमंत्री म्हणजे घरात बसणारा असा ग्रह झाला होता अनेकांचा. तो त्यांनी दूर केला आहे व त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री हे ३-प्र आहेत, म्हणजे प्रधानमंत्री व प्रधानसेवक यांच्याप्रमाणे आहेत, याबाबत आता कोणाच्याही मनात शंका राहिलेली नाही. यावर काही प्रधानभक्त संतापतील. म्हणतील, की प्रधानसेवक अतुलनीय आहेत. परंतु त्यांना हे सांगितलेच पाहिजे, की ठाकूरसाहेबांनी एका बाबतीत नमोशैली तंतोतंत आत्मसात केली आहे. ती म्हणजे शब्दक्रीडा. या खेळात आपल्या २-प्रंचे तोंड कोणी धरू शकणार नाही. बोलता बोलता ते जी काही शब्दक्रीडा करतात, घोषवाक्ये तयार करतात, लघुरूपे बनवितात ती पाहून भल्या भल्या जाहिरातमरतडांनीही अहाहा करून तोंडात हाताची बोटे घातल्याचे सांगण्यात येते. अर्थात हा इतिहास नवा असल्याने ज्याने त्याने आपल्या जबाबदारीवर यावर विश्वास ठेवावा. भारतातील अनेक जाहिरातगुरू तर म्हणे हल्ली अशी प्रार्थनाच करीत असतात, की आपले २-प्र कायम राजकारणातच राहोत. त्यांनी राजकारण सोडले, तर येथील जाहिरात कंपन्यांना दोन ग करावा लागेल. म्हणजे गाशा गुंडाळावा लागेल. हेच आदर्श गुण आता ठाकूरसाहेबांनी ३-‘अ’अंती, म्हणजे अत्यंत व अविरत अभ्यासाच्या अंती आपल्यात बाणविले आहेत. परवा काश्मीरप्रश्नी बोलताना देशवासीयांना याचा प्रत्यय आला. वस्तुत: ठाकूरसाहेब काश्मीर समस्या कायमस्वरूपी सुटल्यानंतरच त्यावर भाष्य करतील असा राजकीय अभ्यासकांचा होरा होता. नोटाबंदीनंतर हा प्रश्न सुटणारच होता. आपल्या लाडक्या २-प्रंनी तसे सूचित केलेच होते. आता ही नोटाबंदी फसली असली, तरी काश्मिरात मात्र राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि मंडळींनी तेथील अनेक फुटीरतावादी नेत्यांची वेगळीच ‘नोटाबंदी’ केली आहे. यानंतर या नेत्यांची मानवी ढाल करून दहशतवाद संपविणे असे ध्येय असते, तर ते नव्या भारतात स्वाभाविक ठरले असते. आपले रासुस हे ‘डोव्ह’ नसून ‘डोवल’ आहेत हे पाकिस्तानला समजले असते. परंतु आता मध्येच हा चर्चेचा आखाडा तयार करण्यात आला व त्यात ठाकूरसाहेबांना उतरविण्यात आले. तेथे शब्दशड्डू ठोकताना ठाकूरजी म्हणाले, या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ५-सवर आधारित असेल. ते म्हणजे सहानुभूती, संवाद, साहचर्य, सातत्य आणि सुविश्वासाची बांधणी. हे ऐकले आणि वाटले, ठाकूरजी आमच्या २-प्रंप्रमाणेच रसवंतीला तेल लावलेले शब्दपैलवानच आहेत. तेव्हा त्यांचे १-अ, म्हणजे अभिनंदन करणे क्रमप्राप्तच ठरते.

First Published on September 13, 2017 2:13 am

Web Title: home minister rajnath singh kashmir conflict