हॉस्पिटलमध्ये मुलगा मला म्हणे, ‘तू आमचं बोलणं ऐकतेसच कशाला?’.. आता तुम्हीच सांगा.. मुलगा आणि सून यांचं बोलणं काय चोरून ऐकलं का मी? एरवी तशी त्यांचंच बोलणं ऐकत बसणारी आहे का मी? जेवताना मुलानं सुनेला सांगितलेलं माझ्यासमक्षच कानी पडलं म्हणून कोलमडले. तेही हल्ली वयपरत्वे जेवण कमी झालंय ना माझं, म्हणून हात धुवायला उभी राहिलेली पडले. झालं असं की, थांबा सांगतेच हकीगत.. डायनिंग टेबलावरून आपल्या नेहमीच्या बिसलेरी बाटल्यांसारखीच पण पिवळ्या बुचाची बाटली सुनेच्या हातून खाली पडली. पिवळ्या बुचाची बरं का! आमच्या वेळी नव्हत्या असल्या बाटल्या. सरळ तांब्याभांडय़ातनं पाणी प्यायचो. तांबेसुद्धा तेव्हा पितळेचे असायचे. तसा एक चांदीचा होता.. तो फक्त सासऱ्यांचा. सासूबाई सांगायच्या ते अज्जून लक्षात आहे, सत्तर रुपयांना त्या वेळी आणलेला तांब्या तो. अस्सा जडच्या जड. तर वाटण्यांच्या वेळी आमच्या ह्य़ांनी तांब्या पुतण्याला देऊन टाकला.. सासऱ्यांची आठवण ज्येष्ठ नातवाकडे हवी म्हणून. ह्य़ांना व्यवहार म्हणून कधी कळला नाही. आमचा श्री होताच ना कनिष्ठ नातू? मी म्हणून ह्य़ांचा संसार केला टुकीनं. श्रीला इंजिनीअरिंगला घातलं तेव्हा फीया भरायला बांगडय़ापाटल्या नाही मोडल्या. साठवलेन् होते बँकेत पै-पै करून. सोसायटीतल्या बायका ‘भाजीला चला’ अशी हाक मुद्दाम मारायच्या. नाही जमत एकेकीला नीट भाव करणं, मला जमायचं. अज्जून जमतं. फार बाहेर नाही पडत मी. ही मुलं मॉलमध्ये वगैरे फिरायला नेतात तेव्हा चष्म्याबरोबर भिंगसुद्धा घेऊन जाते. एमआरपी लपवून भलत्या किमती लावतात हो! तिथं एक बार्बीडॉलचं स्टिकर लावलेली वॉटरबॉटल होती तर नातीनं हट्ट केलान घेऊ या म्हणून. मी सर्रळ बोलून दाखवलं.. दिवाळीत इथंच आलो होतो तेव्हा हीच बाटली इथे डिस्काऊंट म्हणून ३५ रुपयांना देत होते, आता ८० कशी? आपली साधी प्लास्टिकच्या बाटलीसारखी बाटली. रेलनीर घेतलं तर पंधरा रुपयांत पाण्यासकट मिळते. तिच्यावर बार्बीचं स्टिकर लावलं तर एवढे पैसे? श्री माझ्यावर गेलाय. त्यानं काढली समजूत पोरीची. नाही केला छचोर खर्च. तर हो, काय सांगत होते, पिवळ्या बुचाची बाटली.. अस्सं होतं हल्ली. ही पिवळ्या बुचाची बाटली खाली पडली. सुनेच्या हातनं. पोचा आला. यायचाच तो. तर मुलगा हिला म्हणतो कसा.. ‘अगं अगं काय करतेस.. भुवनेश्वरच्या टूरवरून मी मुद्दाम आणलेली सत्तर रुपयांची बाटली आहे ती.. फुटेल ना..’ म्हणजे हा कंपनीच्या खर्चानं जातो, हॉटेलात राहतो, तिथं सत्तर रुपये पाण्यावारी घालवतो? ऐकून कोलमडल्यावर फ्रॅक्चर झालंय त्याचा खर्च पुन्हा श्रीनंच केला बिचाऱ्यानं. पण खरं सांगते.. त्या हॉस्पिटलातला पेपर वाचून जरा मनाला तकवा आला.. त्यात होती ना बातमी.. ‘मोठय़ा हॉटेलांमध्ये पाण्याच्या बाटल्यांना छापील किमतींचा धरबंध नाही’ असं कोर्टच म्हणतंय आता. म्हणजे एमआरपीचा कायदासुद्धा कोलमडलेला आहे. मग मी काय, वयपरत्वे होणारच असं!