ही गोष्ट आहे एका बाबांची! पण बाबा कोण हे आम्ही सांगणार नाही. त्या बाबांचं नाव मोठं होतं. अगदी देशविदेशात त्यांचे अनुयायी होते. त्याला कारणही तसंच होतं. शून्यातून विश्व उभे केले होते त्यांनी!  बाबांच्या पूर्वायुष्याबद्दल फारसे कुणालाच काही माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्याविषयी असंख्य दंतकथा होत्या. ही गोष्ट म्हणजे त्यापैकीच एक दंतकथा! बाबांच्या लहानपणीची. पण लहानपण, तरुणपण, म्हातारपण या तुम्हीआम्ही सामान्यांच्या जगण्याच्या अवस्था झाल्या. बाबांचं तसं नव्हतं; पण तेव्हा बाबा मुलासारखे लहान दिसायचे म्हणून ते त्यांचं लहानपण म्हणायचं. तर, हिमालयातली घोर तपस्या आणि अमरबुटीचा शोध लावून बाबांचे गुरू आणि बाबा नुकतेच परतून आले होते. ही बुटी लोकांना देऊन त्यांना अमरत्व द्यावे, असा विचार गुरूंच्या मनी आला. त्यांनी तो बाबांना बोलून दाखविला आणि बाबा गुरुवचनाच्या बाहेर नसल्याने त्यांनी त्यास संमती दिली. मग बाबा आणि त्यांचे गुरू एका गावात गेले. चौकातली बऱ्यापैकी मोकळी जागा पाहून गुरूंनी चटई अंथरली आणि बुटीच्या बरण्या चटईवर मांडल्या. मग लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी गुरूंनी डमरू वाजविला आणि ते ओरडून बुटीचे महत्त्व सांगू लागले. ‘‘माझे वय किती असेल?’’ गुरूंनी विचारले आणि अवघी गर्दी अंदाज वर्तवायला लागली. सत्तर-ऐंशी-शंभर.. पण गुरू हसून नकार देत होते. अखेर गुरू म्हणाले, ‘‘मी तीनशे त्रेपन्न वर्षांचा आहे!’’ चकित गर्दीतील एका चाणाक्षाने हळूच बाबांना बाजूला घेऊन विचारले, ‘‘हे सांगतायत ते खरं आहे?’’ बाबांनी खांदे उडवले. ‘‘मला माहीत नाही. मी त्यांच्यासोबत आहे त्याला दोनशेच वर्षे झालीत!’’.. बाबांच्या या उत्तरानंतर बुटी खरेदीसाठी झुंबड उडाली. त्या दिवशी बाबांना मार्केटिंगचा गुरुमंत्र मिळाला, असे म्हणतात! ‘मी फक्त चांगल्याच गोष्टींचे मार्केटिंग करतो’ हा तो मंत्र. गुरूंनी अमरबुटीचे गुपित कुणालाच सांगितले नाही म्हणून काय झाले? मानवी शरीराची रचना ४०० वर्षे जगण्यासाठीच असते.. आणि आपणच आपले आयुर्मान चुकीच्या जीवनशैलीमुळे कमी करून घेतो. मग बिनचूक जीवनशैली कोणती? अर्थातच बाबा ज्या-ज्या उत्पादनांचा प्रचारप्रसार – म्हणजेच मार्केटिंग – करीत आहेत ती उत्पादने वापरणे ही योग्य जीवनशैली! पण तुमचा विश्वास पाहिजे आणि मेहनत घेण्याची तयारी पाहिजे. पाहा पाहा – याच गुणांमुळे त्या अमितभाईंचे वजन कसे ३८ किलोने कमी झाले.. पण अमितभाई अत्यंत लाजाळू आणि अबोल. म्हणून त्यांचे कौतुक बाबांनी सांगितले. काही नतद्रष्टांचा कशावरच विश्वास नसतो; त्यांना अमितभाई ‘‘सरकार २५ वर्षे टिकेल,’’ असे म्हणाले तेही जुमलाच वाटते. या नतद्रष्टांनी जर चारशे वर्षे जगायचे ठरवले, तर त्यांना लख्खपणे लक्षात येईल की, फार तर १०० वर्षे (म्हणजे ४०० भागिले चार वर्षे) जगणाऱ्यांचे सरकार जर पाच वर्षे टिकत असेल, तर ४०० वर्षे जगणाऱ्यांचे सरकार २५ वर्षे टिकणारच! त्यासाठी अमरबुटी नव्हे; मार्केटिंगची आणि विश्वासाची अधिक गरज आहे.