‘काय झालं?’.. ‘पेंग्विळलेले’ डोळे किलकिले करीत कूस बदलत मॉल्टने फ्लिपरला विचारलं.. फ्लिपरचं लक्षच नव्हतं. तिने बाळाला उचलून कुशीत घेतलं.. कालच डॉक्टर येऊन तपासूनही गेले होते. पिल्लू छान टुणटुणीत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. इथं मुंबईत आल्यापासून रोज कानावर पडणारी मराठी आताशा फ्लिपर आणि मॉल्टलाही समजू लागली होती.

मॉल्टला आठवले, ..त्या दिवशी फ्लिपरने मॉल्टच्या कानात ती ‘गोड बातमी’ सांगितल्यापासून तर तो आनंदाने मोहरून गेला होता. तो तिच्या सरबराईत गुंतलेला पाहून बाकीचे पेंग्विनही फ्लिपरकडे पाहून कुजबुजू लागले होते. एव्हाना ती गोड बातमी त्यांना कळलीही होती. आपल्या मायभूमीपासून दूरदेशी, कुठल्या तरी अज्ञात जागी असल्याने फ्लिपरच्या पोटात वाढणाऱ्या बाळाची काळजी सर्वानी मिळून घ्यायची असे एका रात्री सर्वानी ठरविले.. इथे दर बारा तासांनी रात्र होते. ते आपल्या सवयीचे नाही. सहा महिने जागण्याची सवय असल्याने, रात्र होते म्हणून उगीच झोपा काढायच्या नाहीत असेही सर्वानी ठरविले.. आपल्या येणाऱ्या बाळाच्या कौतुकात काहीच कमी पडणार नाहीये हे ओळखून फ्लिपरइतकाच मॉल्टही सुखावला होता.. आणि तो क्षण आला! .. फ्लिपरला बाळंतवेणा सुरू झाल्या. मॉल्ट उगीचच धास्तावून इकडेतिकडे येरझारा घालू लागला.  मायदेशापासून दूर, भारताच्या महानगरात जन्माला येऊन पेंग्विनच्या जगात इतिहास घडवणारं बाळ म्हणून साऱ्यांनाच प्रचंड कौतुक, कुतूहल आणि कमालीची उत्सुकताही होती.. अशातच फ्लिपरने अंडे घातले आणि पेंग्विनच्या टोळक्याने आनंदाने चीत्कारून उत्सवच साजरा केला. पुढे चाळीस दिवसांपर्यंत अंडय़ातल्या पिल्लाची निगुतीने देखभाल करायची होती. कधीतरी बाहेरही ही बातमी पसरली.  आता फ्लिपरचं हे गोंडस बाळ पाच दिवसांचं झालं होतं.. आईच्या कुशीतूनच, नव्या जगाला सरावण्याची सवय करू लागलं होतं. बाळाच्या लोभस हालचाली न्याहाळत बाप मॉल्ट दिवसभर फ्लिपरच्या आसपासच बसून असायचा.. तिने बाहेर जाऊ  नये, बाळास बाहेरची हवा बाधू नये, यासाठी जणू मॉल्टची राखणच सुरू होती.. काल रात्री बाळ जरासं कुरबुरत होतं..  फ्लिपरने काय झालं ते ओळखलं आणि बाळाला आपल्या कुशीत घट्ट लपेटून घेतलं.. मॉल्टबाबा हे सारं पाहात होता. मध्येच कधीतरी त्याचा डोळा लागला, आणि बाळाचं कुरबुरणं ऐकून तो जागा झाला.. ‘काही नाही, बाळ रडत होतं!’.. बाळाला पुन्हा कुशीत घेऊन कुरवाळत फ्लिपर म्हणाली.. दुपारी डॉक्टर तपासून गेले होते. फ्लिपरला आठवलं.. आता आणखी काही दिवसांनी बाळाच्या कौतुकासाठी मुंबईकरांची रीघ लागेल.. भारताच्या भूमीवर, स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जन्माला आलेल्या आपल्या बाळाला फ्लिपरने पुन्हा कुशीत घेऊन घट्ट कुरवाळले. आपल्या इवल्या डोळ्यांनी त्याने आईकडे पाहिले, आणि नुकते फुटू लागलेल्या इवल्या पंखांची हलकीशी फडफडही केली. मॉल्टने ते पाहिले, आणि तो खूश झाला.. ‘आपलं बाळ मोठं हुशार आहे’.. तो फ्लिपरकडे पाहून हसत म्हणाला.. ‘मग?.. आहेच ते आपली फ्रीडम बेबी!’.. कौतुकाने त्याला पुन्हा कुरवाळत फ्लिपर म्हणाली.. ते बाळ खुदकन हसले आणि फ्लिपरचे ‘आईपण’ मोहरून गेले..