ते ‘अ‍ॅनिमल फार्म’वाले जॉर्ज ऑर्वेल म्हणून गेले आहेत, की सगळेच समान असतात, पण काही जण अधिक समान असतात. त्रिकालाबाधित सत्यच हे. ते आपल्या लोकशाही व्यवस्थेत सदोदित उपस्थित आहे हे दाखविण्यासाठी तर आपण त्यावर एक कायमचा लाल दिवा देऊन ठेवला होता. म्हणजे लोकांनाही समजण्यास सोपे जाते, की डोक्यावर लाल दिवा असलेले हे खरे लोकशाहीतील सूर्य आहेत. त्यात पुन्हा त्या सत्ताप्रकाशी सूर्याचीही छान सोय होऊन जाते. आदर, मान, सन्मान सारे कसे त्या दिव्याने आपोआप प्रकाशमान होते त्यांच्या जीवनात. किती छान आहे ही संस्कृती. तिच्या कौतुकास आमच्याकडील शब्दभांडारही कमी पडत असताना, अचानक कानी वृत्त आले की ही संस्कृती आता नामशेष होणार. लाल दिवे विझणार. तेव्हा आम्हांस समजेनाच, की बोवा, याद्वारे सगळेच समान होणार असतील, तर काही जण जे अधिक समान आहेत ते सगळेच अधिक समान होणार की काय? गोंधळच हा सारा. त्याबाबत आम्ही ठिकठिकाणी चौकशी केली. तेव्हा या संस्कृतिविरामाच्या वार्तेने सारेच आमच्यासारखे गोंधळल्याचे आढळले. एकाने तर आम्हांस सांगितले की, आपणांस काहीच कळेनासे झाल्यास सगळे काही आपणांस कळाले आहे असा आव आणून निमूट बसावे व ज्यांना काही कळाले आहे त्यांच्याकडे पाहून टीकाखोर हसावे. ही भक्तीची पहिला पायरी उत्तीर्ण केली, मग आयुष्यात पुढे आपणांस न समजण्यासारखे काही उरतच नाही. ते ऐकून काहीच न कळल्याने आम्ही आणखी एकास विचारले, तर त्याने हातातील झाडू आमच्या मस्तकावरून मोरपिसाऱ्यासारखा फिरवला. हा अज्ञानहरणाचा सेक्युलर मार्ग असावा. तो म्हणाला, लाल दिवा संस्कृतीचा विनाश हे अखेरीस समाजवादाकडे नेणारे पाऊल. ते तर आम्ही केव्हाच उचलले होते. म्हणजे गेल्या पावणेतीन वर्षांपासून पाहा आमचे सारे केजरीवाली मंत्री कसे बिनदिव्याचे फिरतात. तेव्हा आम्हीच सर्वात आधी समान! त्यावर आमच्या मनात शंका आली, की बिनदिव्याच्या संस्कृतीचाही दर्प असतो नि त्यामुळेही डोळ्यांपुढे अंधार येऊ शकतो की काय? कारण कापे जाऊन भोके उरावीत त्याप्रमाणे दिवे गेले तरी सत्तेची ती ऐट कायमच राहते, हे काही कोणी पाहण्यास तयारच नाही. थोडक्यात वरचे दिवे काढले, तरी त्यामुळे आमच्या या अधिक समानांच्या गाडय़ांचे ताफे काही कमी होत नाहीत की त्यामुळे वाहतूक थांबविणे वगैरे प्रकार काही बंद होत नाहीत. ते तमाच्या तळातले दिवे तसेच पेटलेले राहतात. ते विझतील तेव्हा खरे. तोवर आपण दिवे काढल्याच्या प्रचारी प्रकाशात या अधिक समानांनी स्वतभोवती ओवाळलेले दिवे पाहात बसावेत. दुसरे काय?