News Flash

खिचडी संस्कृतीचा विजय असो..

मोठी स्वप्ने पाहिली की कधी तरी स्वप्नपूर्तीच्या समीप पोहोचता येते.

मोठी स्वप्ने पाहिली की कधी तरी स्वप्नपूर्तीच्या समीप पोहोचता येते. फार पूर्वी, बिरबलाने एवढय़ाशा भांडय़ात खिचडी शिजवली होती, त्याच काळात कधी तरी जहांगीराच्या जमान्यात अजमेरच्या दग्र्यातील भाविकांसाठी तब्बल १८०० किलो खिचडी शिजली, पण तो विक्रमही पुसला गेला. त्या खिचडीला तेव्हापासून विक्रमाची आस लागली होती. देशात आणीबाणी आली आणि गेली. मोरारजीभाईंचे पहिलेवहिले बिगरकाँग्रेसी सरकार सत्तेवर आले आणि देशाला आपली आठवण आहे या भावनेने खिचडी प्रथमच सुखावली. ‘पहिले खिचडी सरकार’ असा त्या सरकारला बहुमान मिळाला आणि आपले नाव थेट सत्तेशी जोडले गेले या जाणिवेने खिचडी सुखावली. नंतर खिचडी सरकारांची परंपराच देशात सुरू झाली. काही जण त्याला ‘कडबोळे सरकार’ही म्हणू लागले, पण पचावयास हलकी असल्याने, खिचडीलाच मान्यता मिळाली. पुलोद, रालोआ, संपुआ, तिसरी आघाडी, चौथी आघाडी अशी उपनावे घेऊन राजकीय पक्षांची खिचडी बनविण्याचे प्रयोग सुरू झाले आणि ती शिजविण्यासाठी सत्तेची आच लाभावी याकरिता धावाधाव सुरू झाली. अशा रीतीने, खिचडी हा शब्द देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून गेला आणि राजकीय अर्थ लाभलेला हा अनोखा पदार्थ वेगळ्या विक्रमाचा मानकरी ठरला. आजवर केवळ नावापुरत्या असलेल्या खिचडी पक्षांनी पुढे भक्कम सत्ता मिळविली आणि जिच्यामुळे आपण सत्तेपर्यंत पोहोचलो, तिचे ऋण फेडले पाहिजे, अशी सुप्त जाणीव सत्ताधीशांना होऊ  लागली. खिचडीचे ऋणभान खदखदू लागले. खिचडीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आता खरीखुरी खिचडी शिजविणे हाच मार्ग आहे हे ओळखून रालोआ नावाच्या खिचडी सरकारने अखेर महाकाय कढई चुलीवर चढविली आणि पतंजली नामे आपला देशी व्यवसायविस्तार करू पाहणाऱ्या बाबांनी पुढाकार घेऊन संजीव कपूरच्या खांद्यास खांदा लावत ती शिजविण्याचा घाटही घातला. चारशे-पाचशे वर्षांपूर्वी कधी तरी शिजल्यामुळे स्थापित झालेल्या विक्रमाशी बरोबरी होणार या आनंदाने ती खिचडी कढईतल्या कढईत खदखदू लागली आणि साऱ्या देशाला खाद्यसंस्कृती प्रेमाच्या अनोख्या उकळ्या फुटू लागल्या. भुकेच्या जागतिक स्तरावर भारताचा क्रमांक ५५ वरून १०० वर पोहोचल्याचा विसर पडला आणि जागतिक विक्रम प्रस्थापित करणाऱ्या या सर्वान्नाची पाकिटे देश-विदेशातील राजनैतिक प्रतिनिधींना पाठवून विक्रम साजरा करण्यात आला. खिचडी हा केवळ सत्ताकारणाशी संबंध जडलेला पदार्थ खऱ्या अर्थाने कढईत शिजल्याने, भारताच्या भूकसमस्येवर आता मात झाली आहे. या देशाची खिचडी संस्कृती आता जगभर या पदार्थाच्या रूपाने पोहोचणार आहे आणि देशाच्या कानाकोपऱ्यात खिचडी संस्कृतीचा प्रसार होणार आहे. सत्तेचा मार्ग दाखविणारा हा पदार्थ राजकीय संस्कृतीचे प्रतीक केव्हाच बनला होता, आता तो देशाची ओळख ठरणार आहे. खिचडी संस्कृतीचा विजय असो..

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 6, 2017 2:30 am

Web Title: india enters guinness world records with over 918kg khichdi dish
Next Stories
1 वंदे पुलकिस्तान!
2 पाहुण्याच्या काठीने..
3 एक यांत्रिक भाषण
Just Now!
X