हे मात्र फारच चांगले झाले. आमचे परमशेजारी रा. रा. लेले यांचे फार दिवसांपासूनचे स्वप्न होते, की त्यांना कोणीतरी स्वातंत्र्यसैनिक म्हणावे. परंतु नियतीने त्यांच्याबाबत फारच क्रूर खेळ खेळला. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात त्यांना जन्मच घेऊ दिला नाही नियतीने.  ते जन्मले तेव्हा स्वातंत्र्य मिळून चांगली तीसेक वर्षे निघून गेली होती. फार हळहळले ते.  म्हणायचे, तुमच्यामुळे देश एका महान स्वातंत्र्यसैनिकाला मुकला. आता लेलेंचा एकूण स्वभाव पाहता, त्यांनी फार फार तर आपल्या चाळीतल्या खोलीतल्या पोटमाळ्यावर जाऊन मनातल्या मनात वंदे मातरम्चा जयघोष केला असता. हे त्यांच्याही माता-पित्याला चांगलेच ठाऊक होते. परंतु स्वातंत्र्यसैनिक होण्यासाठी गोळ्या वा वेताच्या छडय़ाच खायच्या असतात हे कोणत्या कायद्यात लिहून ठेवले आहे? तर खरी मुद्दय़ाची गोष्ट अशी, की लेलेंचे आणि त्यांच्यासारख्या अनेकांचे स्वातंत्र्यसैनिक होण्याचे, त्याची पेन्शन खाण्याचे, एसटीतून मोफत प्रवास करण्याचे स्वप्न आता पूर्ण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. याचे कारण म्हणजे मायबाप सरकारचा ताजा निर्णय. त्यानुसार आता आणीबाणीच्या काळात एक महिन्यापेक्षा जास्त काळ कारावास भोगलेल्या व्यक्तीस दरमहा दहा हजार रुपयांचे आणि महिन्यापेक्षा कमी कारावास झालेल्यांना पाच हजारांचे निवृत्तिवेतन देण्यात येणार आहे. ही रक्कम म्हणजे तशी फूल ना फुलाची पाकळीच. आमच्या अंगणवाडी सेविकांनाही याहून चांगले म्हणजे दहा वर्षे सेवा झाली असेल, तर घसघशीत साडेसहा हजार रुपये एवढे मानधन मिळते. त्यामानाने या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या सैनिकांचे कार्य केवढे दांडगे? लोकशाहीसाठीची लढाई लढले होते ते! जगाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहावा असा तो लढा. त्या आणीबाणीला पाठिंबा देणाऱ्या काँग्रेस, शिवसेना, डांगेनिष्ठ कम्युनिस्ट आदींच्या विरोधातच नव्हे, तर आणीबाणीला समर्थन देण्याच्या चिठ्ठय़ा तुरुंगातून पाठविणाऱ्या काही आपल्याच लोकांच्या विरोधातही या स्वातंत्र्यसैनिकांनी तो संघर्ष केला होता. त्यातील अनेकांना तर आमरण संघर्ष करण्याची इच्छा होती. परंतु इंदिराबाई इतक्या क्रूर की त्यांनी आणीबाणीच उठवली. तर आपल्याच सरकारविरोधात लढणाऱ्या त्या दुसऱ्या स्वातंत्र्याच्या सैनिकांना आता सरकारी पेन्शनपट मिळणार आहे. म्हटल्यावर लेलेंच्या वठलेल्या स्वप्नांना बहर येणे स्वाभाविकच म्हणावे लागेल. याचे कारण लेलेंनी अण्णांच्या दुसऱ्या की तिसऱ्या स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात सरकारविरोधात एकदा व्हॉट्सअ‍ॅप संदेश लिहून आपल्या मेव्हण्याला पाठविण्याचे क्रांतीकार्य केले होते. झालेच तर एकदा मुलाच्या वाढदिवसाच्या केकवर मेणबत्तीसुद्धा लावून भ्रष्टाचाराचा निषेध केला होता. हे जे करणे आहे, सरकारविरोधात उभे राहणे आहे ती खऱ्या स्वातंत्र्यसैनिकांची निशाणी आहे. आजच्या काळातही ४७च्या स्वातंत्र्य चळवळीतील नवनवे स्वातंत्र्यसैनिक पेन्शनच्या यादीत दिसत असताना या स्वातंत्र्यसैनिकांना कसे विसरता येईल? आमची खात्री आहे, की सर्वच दयाळू सरकारे, विरोधी पक्षाच्या सरकारच्या विरोधात आंदोलने केलेल्या, चक्काजाम केलेल्या, झालेच तर मेणबत्त्या लावलेल्या सगळ्यांनाच स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शनीत जमा करील.