आपल्या श्रुती आणि दिठी दोन्हीही रोजच्या रोज, साती दिवस चोवीस तास धन्यच होत राहाव्यात असे थोर कार्य आपल्या तमाम वृत्तवाहिन्या करीत असताना, त्यांच्याविरोधात रान उठविण्याचा नतद्रष्टपण या देशी अव्याहत सुरू असल्याचे पाहून आमचे मन तीव्र वेदनेने भरून गेले आहे. वृत्तवाहिन्यांवरील टीकेचा हा सल आमच्या मनात एवढा रुतलेला असूनही आजवर आम्ही तो व्यक्त केलेला नाही, म्हणून बरे. अन्यथा आजवर कोणत्या ना कोणत्या वृत्तवाहिनीवर हा सल, त्याची कारणे, परिणाम याबाबत एखाद्या डॉक्टरांची मुलाखत वा गेलाबाजार चर्चेचा कार्यक्रम तर नक्कीच झाला असता. परंतु आता हे दुखणे लपवून ठेवणे काही योग्य नाही. अखेर ‘पब्लिक इंट्रेस्ट’ अर्थात लोकहित नावाची काही चीज असतेच आणि ‘नेशनही वॉन्ट्स टू नो’ अर्थात देशालाही हे जाणून घ्यायचे आहे, हे जाणून आम्हांस ते देशासमोर मांडलेच पाहिजे. मुद्दा अत्यंत मूलभूत असा आहे. तो म्हणजे लोक स्वत:च्या खिशातून, जीएसटी वगैरे भरून दूरचित्रवाणी संच का खरेदी करतात? साधी गोष्ट आहे, की त्यांना माहिती आणि रंजन हे दोन्हीही हवे असते. वृत्तपत्रांतील ती भाषा, ते लेख, त्या बातम्या.. मेंदू शिणतो त्याने वाचकांचा. याउलट वृत्तवाहिन्या. अगदी – करी मनोरंजन जो प्रेक्षकांचे, जडेल नाते टीआरपी नामक प्रभूशी तयाशी – या तत्त्वाने वृत्तवाहिन्यांचे काम चाललेले असते. म्हणजे बघा, चित्रपट अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू ‘बाथटब’मध्ये पडून झाला म्हटल्यावर, श्रीदेवी म्हणजे कोण वगैरे सांगून झाल्यावर बाथटब म्हणजे काय, याचे प्रबोधन करणे आवश्यकच असते की नाही? असतेच. आणि एकदा बाथटब दाखवायचा म्हटल्यानंतर न्हाणीघर दाखवायला हवे की नको? हवेच. कारण की या देशातील अनेकांस बाथटब, बाथरूम अशा गोष्टींची माहिती असेलच असे नाही. तेव्हा ती देणे, त्याकरिता थेट न्हाणीघराचा सेट लावून बातमी देणे हे आवश्यकच ठरते. अन्यथा प्रेक्षकांना त्या ज्ञानापासून वंचित ठेवल्यासारखे होते. परंतु वाईट याचेच वाटते, की हे असे केले, म्हणजे श्रीदेवी यांच्या निधनानंतर असे थेट स्टुडिओतच न्हाणीघर दाखविले किंवा त्यांच्या निधनानंतर दुबईतील डॉक्टर  आणि पोलीस वगैरे लोक निधनाचे कारण  वगैरेचा  तपास करणारच, परंतु समजा लोकहिताची बाब म्हणून वाहिन्यांच्या प्रतिनिधींनीच जर थोडी डिटेक्टिव्हगिरी  केली,  तर लगेच हे टीकाकार त्यावर तुटून पडतात. वस्तुत: माहिती-रंजनाचा  हा मागणी  तसा पुरवठाच, हे साधे बाजारचे  तंत्रही त्या टीकाकारांना समजत नसते. परंतु  आता हे सांगितलेच पाहिजे की, वृत्तवाहिन्या करतात ते लोक ते मिटक्या मारत पाहतात म्हणूनच. आणि लोक ते चवीचवीने पाहतात ते वृत्तवाहिन्या ते दाखवतात म्हणूनच. त्या परस्पर गरजेतूनच आपल्या देशी बातम्यांचा हा नवा प्रकार सुरू झाला आहे. त्याला म्हणतात लोकनाटय़वृत्त – लोकांना हव्या तशा नाटय़मय पद्धतीने बातम्या देणे. आता या बातम्यांच्या फडामुळे कोणास  पोटदुखी, मेंदूदुखी होत असेल, तर त्याने त्याबद्दल आमच्या वाहिन्यांना दोष देण्याचा नतद्रष्टपणा करू नये. वाहिनीस्वातंत्र्यावर तो घाला ठरेल हे त्यांनी लक्षात घ्यावे.