17 December 2017

News Flash

जागते रहो.!

रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत झोपण्यास यापुढे तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही

लोकसत्ता टीम | Updated: September 19, 2017 2:13 AM

असा एक काळ होता, जेव्हा सुखाचा प्रवास म्हणजे ऐसपस झोप हेच समीकरण असायचे आणि अशा आरामशीर प्रवासासाठी रेल्वेशिवाय दुसरा पर्याय नसायचा. झोप नाही तर रेल्वे प्रवासात मजा नाही, असाही एक ऐषारामी विचार असायचा; पण तो भूतकाळ झाला. काळ हा रेल्वेसारखाच वेगाने पुढे जात असतो आणि अनेक गोष्टी मागे टाकत असतो. ऐषारामी झोप ही आता त्यातलीच एक, आता मागे पडलेली गोष्ट! आजकाल प्रचंड गर्दीमुळे आणि सगळ्यांच्याच समान हक्कांच्या जाणिवा जागृत असल्यामुळे, एखाद्याला प्रवासात चांगले ऐसपस झोपायचे असते आणि दुसऱ्या कुणाला तरी बसायचे असते. मुंबईच्या लोकल गाडय़ांत तर खिडकी पकडून झोप घेण्याचे कुणी ठरवावे तर शेजारच्याच प्रवाशांना पत्ते खेळत किंवा भजने गात प्रवास करायचा असतो. दोघांनाही आपापल्या परीने प्रवासाचा आनंदच लुटायचा असतो, पण यापकी एकाचा आनंद हे दुसऱ्याच्या आनंदावरचे विरजण ठरते. मग भांडय़ाला भांडे लागावे तशी भांडणे सुरू होतात आणि शांततेचा आनंद उपभोगू पाहणाऱ्या प्रवाशांचाही विरस होतो. या साऱ्यातून प्रवाशांना मुक्ती देण्यासाठी ‘नियम हाच उपाय’ असल्याचे एवढय़ा वर्षांनंतर जेव्हा रेल्वेच्या ध्यानी आले, तेव्हा आता लांब पल्ल्याच्या गाडय़ांपुरते तरी झोपण्याच्या हक्काचे समान वाटप करण्याचे रेल्वेने ठरविले. आता रात्रीचे दहा वाजले की आपापला ‘बर्थबिस्तरा’ तयार करून घोरण्याच्या हक्काला आता कुणाचेही आव्हान राहणार नाही, अशी सोय एका सुधारित नियमाद्वारे रेल्वे प्रशासनाने करून टाकली आहे. रात्री दहा वाजल्यापासून सकाळी सहा वाजेपर्यंत झोपण्यास यापुढे तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही; पण रेल्वे प्रवासात झोपण्याचा आनंद लुटण्यासाठी त्याआधीच बिस्तरा अंथरायचे ठरवलेत तर मात्र तुम्हाला नियमाचा बडगा दाखवला जाऊ शकतो. त्यापेक्षा, दहा वाजले की तुम्ही तुमच्या बर्थवर झोपू शकता, चालत्या गाडीचे झोके अनुभवत एखादे सुंदर स्वप्नही पाहू शकता; पण तेव्हाच एखाद्या खटय़ाळ तिकीट तपासनीसाने गदागदा हलवून तुम्हाला जागे करून तिकीट मागितले, तर निद्राभंग झाल्याच्या वेदना चेहऱ्यावर स्पष्ट उमटवूनही उपयोग होईलच असे नाही. कारण आता रात्री दहा वाजता सुरू होणारा तुमचा झोपण्याचा हक्क मध्यरात्री कधी तरी मोडून ‘हक्क-भंग’ करण्याचा त्या तपासनीसाचा अधिकार अबाधितच असेल का, हे नव्या नियमावलीतही स्पष्ट झालेले नसणारच! यापेक्षा, तो तपासनीस केव्हाही येईल या प्रतीक्षेत जागे राहिलेलेच बरे.. तसेही, रात्रीच्या प्रवासात चोऱ्यामाऱ्या किंवा गुन्हेगारांचेही फावत असल्याने, रेल्वे प्रवास ही आरामात झोपा काढण्याची जागा राहिलेलीच नाही. त्यात रेल्वे गाडय़ा कधी घसरतील, कधी त्याच रुळावरल्या दुसऱ्या गाडीवर जाऊन आदळतील, नेम नाही. रेल्वेमंत्रीच बदलले; तरी रूळ आणि चाके कुठे बदलली? म्हणूनच, झोपेची मर्यादित संधी असली तरी ‘जागते रहो’.. तेच बरे!

First Published on September 19, 2017 2:13 am

Web Title: indian railway railway passenger ticket checking